नवीन लेखन...

जगण्याची कला शिकवणारे विद्यापीठ

।। राम-कृष्ण हरी ।।

शतकानुशतके ना कोणी आमंत्रण पत्रिका छापते, ना कुणी कोणाला एकत्र येण्याचे आवाहन करते, ना कोणाला एकत्र येण्याचे, काम करण्याचे मानधन मिळते, तरीही बरोबर ज्या त्या तिथीला, जो तो आपापल्या ठरलेल्या ठिकाणी पोहोचतोच….

हे वैशिष्ठय कोणत्या सभेचे किंवा उपक्रमाचे नाही तर ही आहे आपली पंढरीची वारी….

वारी …..

या दोन अक्षरांमध्ये एवढी जबरदस्त शक्ती आहे कि केवळ या दोन शब्दांचा महामंत्र, लाखो भाविकांना शेकडो किलोमीटर चालण्याची ऊर्जा, शक्ती देतो.

जात, पंथ,वर्ण, वंश, आपले समाजातील स्थान, आर्थिक परिस्थिती, कौटुंबिक प्रश्न, हे सगळे बाजूला सारून विठू नामाचा गजर करीत वारकरी अखंड चालत असतो.

जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात ” विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ

भेदभाव, रागलोभ, मद-मत्सर विसरून एकरूप होणे म्हणजे नेमके काय ते वारीतच कळते.
वारीमध्ये खऱ्या अर्थाने समरसता प्रत्यक्षात उतरते आणि शेकडोचा जनसागर एकरूप-समरस करून दिंडी पुढे पुढे चालते.

दिंडीमध्ये गेल्यावर, मला पोटाला अन्न मिळेल का ? झोपायला जागा मिळेल का ? परगावात माझे कसे होईल ?
पाऊस आला तर कसं ? हे असले प्रश्न कधीच कोणत्याही वारकऱ्याला भेडसावत नाहीत.

त्याला एवढेच कळते कि ” जो चोच देतो, तोच दाणाहि देतो “.

समर्थांनीही म्हटलेच आहे कि ” रघुवीर सुखदाता सोडवी अंतकाळी “.

वारीमध्ये भुकेल्याला अन्न मिळते, तहानलेल्याला पाणी मिळते, एकटेपणा वाटणाऱ्याला सखे सोबती मिळतात,
हौश्याची हौस फिटते, नवश्याचा नवस फिटतो तर गावश्याला हवे ते गवसतेच, व्यावसायिकांना उद्योग मिळतो,
तर समाजसेवकांना सेवेचे समाधान मिळते.

भागवताची परम पवित्र भगवी ध्वजा खांद्यावर तर आरोग्यदायी, मंगलकारी तुळस डोईवर घेऊन लहान-थोर, महिला-पुरुष, युवती-युवक, वयस्कर सगळे सगळे त्या सावळ्या विठुरायाच्या ओढीने अहोरात्र प्रवास करत असतात.

कोणी आळंदी वरून येतं, कोणी देहूवरुन येतं, कोणी शेगाववरून येतं, कोणी सासवड वरून येतं तर कोणी आणखी कोठून तरी दिंड्यासोबत येतं.

वाखरीला ही ईंश्वरनिष्ठांची मांदियाळी एकत्र जमते, हरिनामाचा गजर करते, विठ्ठल-रखुमाईच्या भक्तीत आकंठ बुडून जाते,
भक्तीच्या सागराला अशी काही भरती येते की; माणसेच नव्हे तर दिंडीतले प्राणी सुद्धा भक्तीचा फेर धरून रिंगण करतात…

पुढे एकादशीला तर चंद्रभागेच्या तीरावर ईश्वरनिष्ठ भागवतांची गंगाच नव्हे तर महासागर लोटतो ……

कोणी तासं-तास रांगेत थांबून विठ्ठलाच्या चरणी लागतो तर कोणी नामदेव पायरीचे दर्शन घेतो, तर कोणी केवळ कळसाचे दर्शन घेऊन आपल्या वारीची पूर्तता करतो.

वारीमध्ये छोट्या मोठ्या कुरबुरी होतही असतील परंतु मान-पान, मोठेपणा यांवरून कधीच वाद होताना निदान मला तरी दिसले नाहीत. उलट वारीमध्ये एक-मेकांच्या पाया पडण्याची पद्धत आहे.

स्वतःच्या मोठेपणाचा फुका अभिमान गळून पडतो तो फक्त वारीतच.

म्हणूनच जगद्गुरू तुकोबारायांनी म्हटले आहे कि,

पंढरीसी नाही फुका अभिमान, पाया पडे जन एकमेका …… ”

आजकाल ज्याला ” डाऊन टु अर्थ ऍटिट्यूड ” वगैरे म्हणतात त्यालाच वारकरी मंडळी ” विनम्रता ” म्हणतात.
” ऍनिमल हजबंडरी ” हा प्रकार, भूतदया, जीवदया या माध्यमातून आमच्या संतांनीच सांगितला आहे.

त्याच्याही पुढे जाऊन सांगायचे झाले तर झाडे लावा झाडे जगवा, ग्रीन सिटी वगैरे संदेश देखील,

” वृक्षवल्ली आम्हा सोयरे ” याच संतवचनाने जनमानसांत केंव्हाच रुजवला आहे.

जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी ईश्वराचा अंश पाहण्याची शिकवण देणारी परंपरा याच वारीतून सर्वव्यापी होत असते.

आणखी काय वर्णावा या वारीचा महिमा, कुठेही अनाठायी न रमता, अति चिंता-विवंचना न करता, न थकता, कोणाचाही द्वेष, मत्सर न करता, ईश्वराचे गुणगान करीत, अविरतपणे आपल्या अंतिम ध्येयाकडे चालत राहणे, पुन्हा पुन्हा चालत राहणे हिच या वारीची सर्वात मोठी शिकवण आहे असेच मला वाटते.

वारीचा ढोबळ मानाने जरी विचार केला तरी अगदी स्पष्ट समजते की; वारी म्हणजे जगण्याची कला शिकवणारे विद्यापीठच होय.

या विद्यापीठाचे कुलपती आहेत विठ्ठल-रखुमाई तर आमची संतमंडळी ही कुलगुरू आहेत, तर सर्व कीर्तनकार, प्रवचनकार, हरि भक्त परायण मंडळी हे आमचे गुरूच आहेत.

देहू आणि आळंदीच्या संतश्रेष्ठांच्या पालख्या आपल्या पुण्यात दरवर्षी मुक्कामी असतात,
जमलं तर जरूर दर्शन घ्या आणि आयुष्यात किमान एकदातरी पंढरीचा वारकरी व्हाच !!!

पांडुरंग हरी वासुदेव हरी …. नित्य घडावी तुझीच वारी !

— श्रीपाद श्रीकांत रामदासी
धायरी पुणे -४१

Avatar
About श्रीपाद श्रीकांत रामदासी 12 Articles
मी, श्रीपाद श्रीकांत रामदासी [ मेथवडेकर ], मूळचा सोलापूर येथील असून; इ. स. २००५ पासून, पुणे येथे वास्तव्यास आहे. सध्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये, एका खासगी कंपनीत नोकरी करत आहे. गेली काही वर्षे सोलापूर, संभाजी नगर, पुणे, आदी जिल्ह्यातून, छ. शिवराय, स्वा. सावरकर, डॉ. आंबेडकर, हिंदुत्व या विषयांवर व्याख्याने, भाषणे दिली आहेत; देत आहे. मराठीसृष्टी, प्रगतिपर्व अश्या नियतकालिकांतून विविध विषयांवर लेखन देखील करत असतो. डॉ. आंबेडकर आणि स्वा. सावरकर यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करत, विविध सामाजिक, राजकीय प्रश्नांवर भाष्य करणारे लेख सोशल मीडियावर, ब्लॉग वर लिहिण्याचा अल्पसा प्रयत्न सुरु आहे. माझे आत्तापर्यंत ५५ हुन अधिक लेख विविध माध्यमांतून प्रसिद्ध झाले असून ही संख्या १०१ पर्यंत नेण्याचा मानस आहे. व्याख्याने, लेखमाला, याकरिता आपण मला इ-मेल द्वारे संपर्क करू शकता. इ-मेल : shripad.ramdasi [ at ] outlook [ डॉट ] [ कॉम ] आमचे लेख, कविता याबद्दल आपला अभिप्राय अवश्य कळवावा.

1 Comment on जगण्याची कला शिकवणारे विद्यापीठ

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..