जागतिक तापमानवाढ, वितळणारे हिमनग, कार्बन-डाय-ऑक्साइडचे वाढते प्रमाण, समुद्राच्या पाण्याच्या पातळीतील वाढ या व इतर अनेक गरमागरम बाबींवर पर्यावरणवादी अतिरेकी जो गहजब माजवतात, तो किती खरा, किती खोटा? विकसित देश विकसनशील देशांची कशी दिशाभूल करतात, त्यामुळे ‘जागतिक तापमानवाढ’ हे खरोखरीचे एक महासंकट आहे, की ही एक महाफसवणूक आहे, हे आता आपल्यालाच ठरवायचे आहे…..
नुकताच मायकेल क्रिख्टन यांच्या ‘स्टेट ऑफ फिअर’ या कादंबरीचा डॉ. प्रमोद जोगळकर यांनी केलेला उत्कृष्ट अनुवाद वाचण्यात आला. ही कादंबरी ‘थरारक गुन्हेगारी’ (क्राइम थ्रिलर) या स्वरूपाची असल्यामुळे त्यात खून, मारामार्या, पाठलाग, गोळीबार, उत्तान शृंगार असा सर्व मसाला असला, तरी त्यामध्ये जागतिक तापमानवाढ, कार्बन-डाय-ऑक्साइडचे वाढते प्रमाण, वितळणारे हिमनग, अशाही गरमागरम विषयांवर अत्यंत शास्त्रीय पद्धतीने, वैज्ञानिक आधार देऊन केलेले गंभीर विवेचन आहे. विशेषतः, शेवटच्या प्रकरणात हे विश्लेषण आले आहे. हे वाचून माझ्या मनात उद्भवलेले काही विचार या लेखात मांडत आहे.आपल्या मतांच्या पृष्ट्यर्थ क्रिख्टनने आधार म्हणून गेल्या सुमारे सत्तर ते दोनशे वर्षांतील तापमानाची आकडेवारी दिली आहे, (टेबल टाकणे)
वाढती लोकसंख्या व सिमेंटच्या इमारती
खुद्द न्यूयॉर्क शहराचे तापमान २.२ अंश से. एवढे १८२२ ते २००० या कालावधीत वाढले; पण यातला बहुतांश भाग १९३२पूर्वीच वाढलेला होता. (म्हणजे मोटारींची भरमसाट वाढ होण्यापूर्वी), त्यामुळे ही वाढ वाढती लोकसंख्या व सिमेंटच्या इमारती यांमुळे झाली असावी, असा अंदाज आहे. कारण न्यूयॉर्क राज्यातीलच सिरॅक्युज, अल्बानी, ओस्वेगो, वेस्ट पॉइंट अशा इतर लहान गावांत तापमान न वाढता उलट कमी होत आहे, असे दिसून येते.
युरोपमध्ये तर मोठ्या शहरांतही प्रदीर्घ काळात तापमानात वाढ झालेली नाही, असेच दिसते. (टेबल टाकणे)
आशिया खंडात मात्र टोकियो, लाहोर अशा शहरांत थोडी वाढ झालेली आहे. (टेबल टाकणे)(आधार : giss.nass.gov)
म्हणजेच ‘जागतिक तापमानवाढ’ ही कल्पनाच चुकीची किंवा अतिरंजित आहे. मोठ्या शहरांत तापमानवाढीची बेटे आढळतात, त्याची कारणे अनेक आहेत; पण पर्यावरणवादी मंडळींचे लाडके कारण आहे, वातावरणातील कार्बन-डाय-ऑक्साइडचे वाढते प्रमाण आणि हे प्रमाण वाढण्याचे लाडके कारण म्हणजे मोटारींची वाढती संख्या.
कार्बन-डाय-ऑक्साइडचे वाढते प्रमाण
आता कार्बन-डाय-ऑक्साइडचे वातावरणातील प्रमाण वाढत आहे, हे मात्र नक्की. याची १९५७पासूनची आकडेवारी उपलब्ध आहे. त्यानुसार दक्षिण ध्रुव, सेचेलिस बेट, अशा विरोधी हवामानाच्या ठिकाणीही या वायूचे प्रमाण ३१५ पीपीएम होते, ते २००२ साली ३७० एवढे झाले. ही आकडेवारी पाहिल्यावर असे वाटते, की केवढी ही प्रचंड वाढ! पण हे आकडे पाट्र्स पर मिलिअनचे आहेत. म्हणजे शेकडा वाढ किती? तर ५५ शतांश! सुमारे अर्धा टक्का, तीही ४५ वर्षांत!! आणि ही वाढ होताना अनेक ठिकाणचे तापमान कमी होत होते, हेही आपण पाहिले. याचा अर्थ सर्व जगभर तापमानवाढ होत आहे, हेही खरे नाही आणि वातावरणातील कार्बन-डाय-ऑक्साइड अफाट वाढल्यामुळे ते वाढते आहे, हेही खरे नाही.
गेल्या वर्षी अमेरिकेत दोन मोठी चक्रीवादळे (हरिकेन) येऊन गेली. लगेचच हा वाढत्या जागतिक तापमानाचा परिणाम आहे, अशी हाकाटी सुरू झाली. आता अशा वादळांचा अमेरिकेतीलच गेल्या शंभर वर्षांतील इतिहास पाहू या. (तक्ता पाहा.) (टेबल टाकणे)
जागतिक तापमानवाढीमुळे समुद्राच्या पातळीत वाढ होत आहे, काही वर्षांतच जगातील बरीचशी बेटे पाण्याखाली जाणार, बांगलादेश निम्मा अर्धा जलसमाधी घेणार, अशी भीती सर्वत्र पसरवण्यात आली. पण याला काडीचाही आधार नाही. समुद्राच्या पातळीत दर वर्षी दीड ते अडीच मिलिमीटरने वाढ होत आहे, पण ती जागतिक तापमानवाढीमुळे नाही, कारण ही वाढ गेली सहा हजार वर्षे चालू आहे. या हिशेबाने आणखी १०० वर्षांनी बांगलादेशातील भरतीचे पाणी एक पायरी वर चढलेले असेल.
अतिरंजित दावे
जगातील प्रजाती वेगाने नष्ट होत आहेत, सहारा वाळवंट झपाट्याने विस्तारत आहे, मलेरिया युरोप-अमेरिकेत पसरू लागला आहे, हिमखंड वेगाने वितळत आहेत, पिके नष्ट होत आहेत, नवे रोग पसरत आहेत, हे सर्व असेच अतिरंजित दावे आहेत. यांपैकी एकही वैज्ञानिक पातळीवर सिद्ध झालेला नाही. १९७० साली, कोणी दहा लाख तर कोणी, आहेत त्याच्या निम्म्या प्रजाती २००० सालापर्यंत नष्ट होतील, अशी मते व्यक्त केली होती. तसे काहीही झालेले नाही. १९८०नंतर सहारा वाळवंटाची व्याप्ती कमी होत आहे. आणि आक्र्टिक खंडात तर बर्फाची जाडी वाढत आहे. कारण, ही सर्व मते होती. मते, अंदाज, भाकीत, कॉम्प्यूटर मॉडेलचे निष्कर्ष यांना शास्त्रीय सिद्धान्तांचे रूप देऊन पर्यावरणवाद्यांनी भीती फैलावण्याचे काम मनोभावे केले. त्यांना अनेक सेवाभावी संस्थांनी, अगदी युनोनेही साहाय्य केले. त्यामुळे आपण म्हणू तेच खरे असा दंभ त्यांच्यामध्ये निर्माण झाला आणि हे दुष्टचक्र सुरू झाले.
क्रिख्टन यांच्या मते राजकारण, कायदेकानू व प्रसिद्धिमाध्यमे यांच्या अभद्र युतीमुळे हे घडते आहे. त्याकरिता त्यांनी अनेक उदाहरणे देऊन हे स्पष्ट केले आहे. जिज्ञासूंनी ते मुळातून वाचावे.
क्रिख्टन यांचे म्हणणे मांडल्यावर आता माझे या बाबतीतले विचार मांडतो.
प्राण्यांची वाढती संख्या
कार्बन-डाय-ऑक्साइडचे प्रमाण वाढण्याकरिता आणखी एक कारण म्हणजे जगात वाढणारी प्राण्यांची प्रचंड संख्या. परवाच स्वाइन फ्लू जिथे सुरू झाला, त्या मेक्सिको देशाची कहाणी वाचली. अमेरिकेतील कडक कायदे टाळण्याकरिता तिथले वराहपालक मेक्सिकोत वराहपालन केंद्रे काढतात. तिथे एकेका केंद्रावर काही लाख प्राणी असतात. अमेरिकेतील नुसत्या कॅलिफोर्निया या राज्यामध्ये दशलक्षावधी गाई आहेत. न्यूझीलंडमध्ये लोकसंख्येचा अनेकपट मेंढ्या आहेत. जगातील कोंबड्यांची तर गणतीच करता येणार नाही. हे सर्व प्राणी श्वासावाटे ऑक्सिजन घेतात आणि कार्बन-डाय-ऑक्साइड बाहेर टाकतात. शिवाय मलमार्गावाटे मेथेन हा कार्बन-डाय-ऑक्साइडपेक्षा
अनेक पट घातक हरितगृह परिणाम घडवून आणणारा वायू बाहेर टाकतात. जगातील लोक बहुतांश शाकाहारी झाले तर ही समस्या सहज सुटेल.
कार्बन-डाय-ऑक्साइड कमी करण्याचे एक अत्यंत कार्यक्षम, अतिशय कमी खर्चाचे, फारशी देखभाल न लागणारे, परदेशी तंत्रज्ञान न लागणारे, निसर्गाला अजिबात हानी न पोहोचवणारे असे सयंत्र उपलब्ध आहे. ते म्हणजे वृक्ष. फर्ग्युसन रस्त्यावरची झाडे तोडली जाणार म्हणून आक्रोश करणार्या पर्यावरणवाद्यांनी जवळच्या उजाड फर्ग्युसन टेकडीवर पाच-पाच झाडे लावली असती तरी कार्बन-डाय-ऑक्साइड हटण्याचे प्रमाण कायम राहिले असते.
पाश्चात्त्य देशांचा मानभावीपणा
पण माझ्या मते, यामागे आणखी एक कारण असावे. ज्या तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन पाश्चात्त्य देश प्रगत झाले, ते तंत्रज्ञान आता विकसनशील देश वापरू लागताच, ‘अरे, अरे, हे फार धोक्याचे आहे, यापासून दूर राहा’, असे मानभावीपणाने सांगण्यात येते आणि आमचे भोळसट पर्यावरणवादी त्याला बळी पडतात. शक्य असेल त्या इंच आणि इंच जागेवर धरणे बांधून झाल्यावर मोठी धरणे कशी ‘वैट्ट’ असतात हे आम्हांला शिकवले जाते. रस्त्यावर चालणारा माणूस सहसा कधी भेटतही नाही अशी अवस्था असणार्या अमेरिकेकडून ‘मोटारी वाईट, त्यापासून प्रदूषण होते’ असे सांगितले जाते. अणुऊर्जा वापरून अजीर्ण झालेले देश, ऊर्जेसाठी भुकेल्या भारताला हे तंत्रज्ञान देत नाहीत, आणि कोळसा जाळून ऊर्जा मिळवणे कसे पर्यावरणाला धोक्याचे असते, ते शिकवत राहतात. ‘जेनेटिकली मॉडिफाइड’ बियाणे वापरून आम्ही पिके दुप्पट घेणार, तुम्ही मात्र ऑरगॅनिक शेती करा, तुमच्याकडून अधूनमधून आठ-बारा आण्याची भाजी घेऊ आम्ही, असा सगळा मामला!
हे म्हणजे भरपेट जेवण केलेल्या माणसाने दाराबाहेरील भिकार्याला ‘अरे लाडू मागू नकोस; त्याने कोलेस्टेरॉल वाढते,’ असे सांगण्यासारखे आहे. याचा अर्थ पर्यावरणाकडे दुर्लक्ष करावे, प्रदूषण वाढू द्यावे असा अजिबात नाही. पण हे करताना सारासारबुद्धी, चिकित्सक वैज्ञानिक दृष्टी, आणि कोणी आपल्याला फसवत तर नाही ना, याबद्दल जागरूकता आवश्यक आहे.
अतिशयोक्तिपूर्ण दावे
परवाच पार्लमेंटमध्ये पचौरी यांच्या हिमालयातील हिमनद्यांच्या भाकिताचा पचका झाला आणि अगदी नोबेल समिती आणि युनो पातळीपर्यंतही या विषयाच्या बाबतीत किती अतिशयोक्तिपूर्ण दावे केले जातात, हे सर्वांच्या लक्षात आले.
पर्यावरणवादी अतिरेक्यांच्या (प.अ.) हट्टापायी आपण आपलेच किती नुकसान करून घेतो, याची शेकडो उदाहरणे दाखवता येतील. नमुन्यादाखल थोडी सादर करतो.
पर्यावरणवादी अतिरेकी
मुंबईच्या उत्तरेस डहाणूजवळ मोठे बंदर सहज उभारता येईल अशी जागा आहे. मोठी जहाजे येण्याकरिता समुद्राचे पाणी खूप खोल असावे लागते. तसे ते इथे होते. भारताच्या वैशिष्ट्यपूर्ण किनार्यामुळे अशा जागा फारच थोड्या उपलब्ध आहेत. या ठिकाणी बंदर झाले असते, तर मुंबई बंदरावरचा असह्य ताण कमी झाला असता. पण या प्रकल्पाला प्रचंड विरोध झाला. का, तर इथले चिकूचे पीक धोक्यात येईल म्हणून! हे ठरवले कोणी? तर या ‘प.अ.’ लोकांनी!
कोकण रेल्वे हवी, असे फार पूर्वीपासून कोकणच्या जनतेवर ठसवले असल्यामुळे या प्रकल्पाला विरोध झाला नाही. हाच प्रकल्प जर काही वर्षांपूर्वी प्रस्तावित करण्यात आला असता, तर ‘प.अ.’ मंडळींनी तो कधीच होऊ दिला नसता. तरी गोव्यातील ‘प.अ.’ लोकांनी त्यात कोलदांडा घातलाच.
स्टर्लाइट, अॅल्युमिना असे मोठे प्रकल्पकोकणातून पिटाळून लावण्यात आले. आताही अणुऊर्जा आणि औष्णिक ऊर्जा प्रकल्पकोकणात येऊ देणार नाही, असा दम तिथले नेते प.अ. टोळ्यांच्या पाठिंब्याने देत आहेत. कारण काय, तर तिथली आंबे आणि काजूची लागवड धोक्यात येईल. याला पुरावा मात्र कोणीच देत नाही.
पूर्वी आपल्या भागात नवीन मोठा प्रकल्प आणणार्या माणसाला नेता समजत असत; आता असा प्रकल्प बंद पाडणार्याला समजतात.
नेत्यांची समाजसेवा?
आमच्या भागातले एक नेते दर काही दिवसांनी सातारा-पुणे हायवेचे काम बंद पाडत असत. त्यांचे मित्र सांगत, ‘याच्याजवळचे पैसे संपले, की हा हायवेचे काम बंद पाडतो.’ कारण उघड आहे. एखादा प्रकल्प उभा करणे अत्यंत कष्टाचे असते; तो बंद पाडणे मात्र अगदी सोपे असते. पाच-पंचवीस धटिंगण मंडळी रास्ता रोको करून किंवा धरणाचे काम बंद पाडून करोडो रुपयांचे नुकसान सहज करू शकतात. शिवाय, समाजसेवा केल्याचा टेंभा मिरवता येतो आणि फुकटची प्रसिद्धी मिळते.
पवनचक्क्यांमुळे पाऊस दूर पळतो, असा जावई शोध लावणारे एक दीडशहाणे प्राध्यापक, त्यांना उचलून धरणारे एक डॉक्टर आमदार आणि एक डॉक्टरेट मिळवणार्या पुढारीणबाई यांनी सातारा जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी अशीच डॉन क्विक्झोटगिरी करून धुमाकूळ घातला होता. पुरावा म्हणून तीन वर्षांतले पावसाचे प्रमाण आणि पवनचक्क्यांची संख्या याची कोष्टके, पवनचक्क्यांच्या पात्यांमुळे ढग कसे न बरसता उंच जातात याच्या आकृत्या, असा ‘शास्त्रशुद्ध’ अभ्यास सादर केला होता. यांतील आमदारांशी चर्चा करण्याचा मी प्रयत्न केला; पण त्यांनी, ‘‘ते विज्ञान, स्टॅटिस्टिक-बिटिस्टिक मला माहीत नाही. पवनचक्क्यांच्यामुळे पाऊस पडत नाही. त्या बंद झाल्या पाहिजेत हीच आमची मागणी आहे,’’ असे ठणकावून सांगितले. पुढच्याच वर्षी पवनचक्क्या चालू असूनही प्रचंड पाऊस कोसळला. (या तिघांच्याही पदव्या खरे तर विद्यापीठांनी परत घ्यायला पाहिजेत.)‘आजचे धरण म्हणजे उद्याचे मरण’, ‘हे विकास करणे नसून भकास करणे होय’, अशा आरोळ्या देत, नर्मदा धरण होऊ नये म्हणून प.अ. गटाने सर्वोच्च न्यायालयापर्यंत वारंवार पी.आय.एल. (पब्लिसिटी इंटरेस्ट लिटिगेशन) लढवून देशाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान कसे केले होते, तो इतिहास ताजा आहे.
विकास हवा की नको?
म्हणजे, आपल्याला वीज हवी असते; चांगले रस्ते हवे असतात; बंदरे, विमानतळ, उद्योगधंदे, पिण्याचे पाणी सर्व हवे असते; मात्र हे सर्व जमीन न घेता, धरण न बांधता, एकही झाड न तोडता, कुणालाही विस्थापित न करता व्हावे एवढीच प.अ. लोकांची इच्छा असते. मला वाटते, हे प.अ. पूर्वीच्या काळी असते तर ताजमहाल, सुवेझ कालवा, पनामा कालवा, अजंठा-वेरूळ, यांतले काहीही झाले नसते!
माझे तर असे म्हणणे आहे, की प्रकल्प जाहीर झाल्यावर त्याविरुद्ध आक्षेप नोंदवायला परवानगी असतेच. हे आक्षेप एका तज्ज्ञ समितीपुढे ठेवावे. त्यांनी हिरवा झेंडा दाखवल्यावर मात्र कोणालाही न्यायालयात जाण्याची मनाई असावी; किंवा न्यायालयात त्यांचे आक्षेप निराधार ठरल्यास प्रकल्पाचे होणारे नुकसान त्यांनी भरून द्यावे.
जिज्ञासूंच्या अभ्यासासाठी
जागतिक तापमानवाढ ही बनवाबनवी कशी आहे, हे दाखवून देणारी अनेक पुस्तके परदेशात प्रसिद्ध झाली आहेत. त्यांतील काही पुढीलप्रमाणे ः ‘क्लायमेट कन्फ्यूजन’ (रॉय स्पेन्सर), ‘द डिनायर्स’ (आंतरराष्ट्रीय कीर्तीचे हवामान तज्ज्ञ लॉरेन्स सॉलोमन हे या पुस्तकात जागतिक तापमानवाढ ही कल्पित कथा ऊर्फ मिथ असल्याचा दावा करतात.) रॉबर्ट बेक यांनी आपल्या ग्रंथाचे नावच ‘अॅन इनकन्व्हीनिअंट बुक’ असे ठेवले आहे. त्यात ते नोबेल पुरस्कार विजेते अल गोर यांच्या ‘पवित्र गाय’ स्वरूपी सिद्धान्ताच्या, एक एक परिच्छेद घेऊन चिंधड्या उडवतात. ‘ग्लोबल वॉर्मिंग – फॉल्स अलार्म’ या पुस्तकात लेखक राल्फ अलेक्झांडर हे कार्बन-डाय-ऑक्साइडमुळे तापमानात वाढ होते, हे युनोचे दावेही चुकीचे असल्याचे सिद्ध करतात.
अशा अनेक पुस्तकांची माहिती व अन्य लेख इंटरनेटवर उपलब्ध आहेत. जिज्ञासूंनी अभ्यास करावा.
तात्पर्य काय, तर पर्यावरणप्रेमी असावे, पर्यावरण‘वादी’ असू नये.
साभार ः ‘अंतर्नाद’, जुलै २०१०
डॉ. शरद अभ्यंकर
मयूर, मधली आळी, वाई, सातारा ४१२ ८०३.
दूरध्वनी ः (०२१६७) २२००४९, २२३२४९
भ्रमणध्वनी ः ९४२२४००६४३
इ-मेल ः drshradabhyankar@gmail.com
Leave a Reply