नवीन लेखन...

जगावेगळं जोडपं

१९७९ साली माझं बीएमसीसी मध्ये शिक्षण चालू होतं. वर्गात शिरीष बोधनी हा माझा नाटकवेडा मित्र होता. एके दिवशी त्याने डोक्यावरील सर्व केस उतरवून चकोट केलेला मी पाहिला. साशंक होऊन मी त्याला त्याबाबत विचारल्यावर त्याने खुलासा केला. ‘२२ जून १८९७’ या चाफेकर बंधूंवरील चित्रपटात तो छोटीशी भूमिका करीत होता.. रॅन्ड साहेबांचा खून, या क्रांतिकारी सत्य घटनेवर पुण्यातील नचिकेत व जयू पटवर्धन, हे जोडपं चित्रपट निर्मिती करीत होतं. या चित्रपटाची कथा शंकर नाग व नचिकेत यांनी लिहिली होती. पटकथा नचिकेतने लिहिली. संवाद विजय तेंडुलकर यांचे होते. संगीत आनंद मोडक. कॅमेरामन होते नवरोझ कॉन्ट्रॅक्टर.

नचिकेत व जयू हे दोघेही खरे व्यवसायाने आर्किटेक्चर. मात्र ही क्रांतिकारी घटना पडद्यावर साकारण्यासाठी त्यांनी चंग बांधला. NFDC कडून अर्थसहाय्य घेऊन अवघ्या साडे तीन लाखांत या चित्रपटाची निर्मिती केली. थिएटर अ‍ॅकॅडमीचं या निर्मितीला सहकार्य मिळालं. माझ्या ओळखीचे अनेक कलाकार या चित्रपटात सहभागी होते. वासुदेव पाळंदे, श्रीकांत गद्रे, मुकुंद चितळे, शिरीष बोधनी, सुहास कुलकर्णी, प्रसाद पुरंदरे, सुभाष अवचट, रवींद्र मंकणी, शांता जोग यांना मी ओळखत होतो. या चित्रपटात लोकमान्य टिळकांची भूमिका सदाशिव अमरापूरकर यांनी केली होती. चित्रपटाचे चित्रीकरण १९७९ च्या मार्च व एप्रिल महिन्यात पुणे, वाई व मुंबई येथे केले. पुण्यातील विश्रामबाग वाडा व काही जुने वाडे त्यासाठी निवडले. वाई ही अजूनही ‘जुनं पुणं’ दिसते. तेथील चित्रीकरण हे पुण्यासारखेच पडद्यावर दिसले.

चित्रीकरणाच्या दरम्यान रवींद्र मंकणीवर, नऊ मिनिटे सत्तावन्न सेकंदाचा एक सलग शॉट घ्यायचा होता. फिल्मची निगेटिव्ह फार काटकसरीने वापरायची होती. एवढा मोठा सीन रिटेक होणे, हे परवडणारे नव्हते. रवींद्रचा हा पहिलाच चित्रपट होता. त्यानेही आत्मविश्वासाने ‘वन टेक’ मध्ये हा सीन ‘Ok’ केला! आजही त्याच्या कारकिर्दीतील हा सीन अविस्मरणीय असल्याचे तो आवर्जून सांगतो.

चित्रपट प्रदर्शित झाला. आम्ही सर्व मित्रमंडळींनी तो पाहिला. चित्रपटाला व या चित्रपटाचे कला दिग्दर्शन करणाऱ्या जयू पटवर्धनला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. याशिवाय देश व परदेशातील अनेक सन्मान या चित्रपटास मिळाले.

शिरीष बोधनी सोबत एके दिवशी मी या जगावेगळ्या जोडप्यास भेटायला त्यांच्याऑफिसमध्ये गेलो. दोघांनीही आमचं हसतमुखानं स्वागत केलं. त्यांच्या टेबलवरील छोट्या छोट्या गोष्टींतून त्यांची कलात्मक दृष्टी जाणवत होती. चहापाणी झालं. आम्ही कॉलेजमित्रांनी तयार केलेला ‘मंथन’ हा साहित्यिक अंक त्यांना भेट दिला. त्या अंकात शिरीष बोधनीने लिहिलेला पहिलाच लेख होता, ‘२२ जून १८९७’!!

आज या क्रांतिकारी सत्यघटनेला १२४ वर्ष होऊन गेली. चाफेकर बंधूंना फाशी झाली. त्या गणेश खिंड रस्त्याने चाळीस वर्षांपूर्वी सायकलवरुन जाताना मला चाफेकर बंधूंचे स्मारक दिसायचे. त्या घटनेला पडद्यावर साकारणारे पटवर्धन पती-पत्नी खरंच महान आहेत. आज स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे झाली, या क्रांतिकारकांचं स्मरण करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. त्यांच्या सारख्या अनेक क्रांतिकारकांनी आपले प्राण पणाला लावले म्हणून आज आपण आनंदात जगतोय…

चाफेकर बंधूंना विनम्र अभिवादन!!

© सुरेश नावडकर.

मोबाईल: ९७३००३४२८४

२२-६-२१.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 407 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..