नवीन लेखन...

जागेसाठी महाभारत

मु्ंबईत जागा स्क्वेअर इंचांच्या भाषेत विकायची वेळ आली आहे.
ऐंशी नव्वद वर्षांपूर्वी मध्यमवर्गीय नांदत असलेल्या चाळी पडायला आल्यात.
महानगरपालिका अशा धोकादायक चाळी रिकाम्या करायला लावते.
तरीही पावसांत एखादी चाळ अचानक पडतेच आणि मृत्यूही होतात.
चाळींच्या जागी मोठ्या इमारती उभ्या रहाताहेत.
चाळीतल्या खोलीवर हक्क ठेवून असणाऱ्याला लहानसा कां होईना मालकीचा फ्लॅट मिळतोय.
साहाजिकच चाळीतील त्या सिंगल किंवा डबल रूमवर हक्क कोणाचा आहे, ह्याला महत्त्व आलेलं आहे.
ती जागा आता ज्याच्या नांवावर असते, त्याच्या काकाच्या मामाने ती मुळात भाड्याने घेतलेली असते.
राहिल त्याचे घर, ह्या न्यायाने आता ती त्याच्या नावावर असते.
मालक कुणाला काढू शकत नाही.
मालक पावतीवर गुपचूप रहाणाऱ्याचे नांव टाकत असतो.
पांच रूपये भाड्याने पूर्वी घेतलेल्या दोन खोल्या आता लाखो रूपयांच्या झाल्या आहेत.
महाभारतापासून युध्दाचे एक कारण जसं जागा आहे, तसंच ते मारामारी, खून ह्या गुन्ह्यांचेही आहे.
रमेश कळसकर यशवंताकडे आलाय.
यशवंतानी “बोला”, म्हणतांच तो रडू लागला.
चंदू पाण्याचा ग्लास हातांत देत म्हणाला, “शांत हो. तुझी हकिकत मामांना नीट सांग.”
रमेश स्वत:ला सावरत म्हणाला, “मी रमेश कळसकर. गिरगांवात गुलाबचंद चाळीत रहातो.
माझा मोठा भाऊ महेश हॅास्पिटलमध्ये आहे.
चार दिवसांपूर्वी रात्री घरी परततांना त्याला अज्ञात हल्लेखोरांनी बेदम मारलं.
तो बेशुध्द पडला.
त्याच्या डोक्याला खोक पडली व रक्तस्त्राव होत होता.
लोक जमा झाले.
कोणीतरी ॲम्ब्युलन्स बोलावली.
कोणीतरी पोलिसांना खबर दिली.
पोलिसांनी त्याला सरकारी हॅास्पिटलला नेले.
त्याला उपचार सुरू झाले.
मेंदूवर छोटी सर्जरी करावी लागली.
मला हे सगळं दुसऱ्या दिवशी सकाळी कळलं.
महेश अजूनही बेशुध्दच आहे.”
यशवंतनी विचारलं, “त्याला मारहाण कुणी केली असावी, असं तुला वाटतय ?”
रमेश म्हणाला, “मी त्याबद्दल कांहीच सांगू शकत नाही पण पोलिसांना वाटतय की मीच कुणाकरवी तरी त्याला मारहाण केली आहे.”
चंदू्ने मध्येच विचारले, “धाकटा भाऊ मोठ्या भावाला भाडोत्री गुंडाकरवी मारहाण करेल, असं पोलिसांना कां वाटलं असेल ?
तुमचं कांही वैर आहे कां ?”
रमेश म्हणाला, “ती एक कहाणीच आहे.”
रमेशने तुटक तुटक सांगितलेल्या माहितीवरून यशवंत आणि चंदू ह्यांना कळलं की गुलाबचंद रायचंद नांवाच्या मारवाड्याने १०० वर्षांपूर्वी गिरगांवात एक चाळ बांधली.
लगेचच एक कुळकर्णी तिथे रहायला आले.
पहिल्या मजल्यावरच्या कोपऱ्यांतल्या खोल्या थोड्या मोठ्या होत्या.
त्या दोन खोल्यांत कुळकर्णी, त्यांची बायको व दोन मुले रहायला आली.
पहाता पहाता कुळकर्णींच्या मुलांची संख्या दोनावरून सातावर गेली.
त्यांचे दोन भाचे तिथेच रहायला आले.
त्यांच्या बायकोच्या नात्यातली मुलगीही आली.
कुटुंब वाढलं. मुलं मोठी झाली.
सुरूवातीला तिथेच राहिली पण मग मोठे दोन भाऊ वेगळे रहायला लागले, मुली लग्न होऊन गेल्या.
कुळकर्णींच्या पश्चात धाकट्या दोन भावांपैकी मोठ्याने भाडेपावत्या आपल्या नांवावर करून घेतल्या.
नंतरच्या पिढ्यांपैकी सगळे चांगले, शिकले, कमवायला लागले, परदेशी गेले.
कुळकर्ण्यांच्या मूळ घरांतले कुणी राहिले नाही.
भाच्याच्या एका मुलाचे कुटुंब चाळींतच राहिले.
ब्लॅाक पध्दत सुरू झाली आणि बहुतेक सर्व चाळ सोडून जाऊ लागले.
भाच्याचे दोन नातु तिथेच राहिले.
भाडेपावतीवर अजून वर्षांपूर्वी निधन पावलेल्या त्यांच्या वडिलांचे नाव होते.
दोघे सख्खे भाऊ चार वर्षांचे अंतर.
धाकटा रमेश २८ वर्षांचा मोठा महेश ३२ वर्षांचा.
आता चाळ पाडून तिथे फ्लॅटस् असलेली ३० मजली मोठी इमारत होणार होती.
भाडेवसुलीसाठी येणाऱ्या मेथाकडे दोघांनीही आपले नांव घालावे म्हणून अर्ज दिला होता.
महेशने उपनगरात एक जागा स्वत:साठी घेतली होती तरीही त्याला ही जागाही हवी होतीच.
रमेशला तर पर्यायच नव्हता.
त्यावरून त्यांच भांडण झालं होतं.
त्यांच्यात वाद होता पण तो दादाला मारहाण करून सोडवावा असा विचार रमेशने कधीच केला नव्हता.
त्यांच्यातला वाद चाळीतील सर्वांना ठाऊक होता.
चाळीतलाच एक दलाल आडनावाचाच दलाल त्यांच्या मागे लागला होता.
त्या दोघांनी जागा जर त्याला दिली तर तो दोघांनाही एक एक फ्लॅट दूरच्या उपनगरांत द्यायला तयार होता.
रमेशला तें मान्य नव्हतं.
महेश त्यासाठी तयार होता.
दलाल चाळीच्या मालकासाठी आणि बिल्डरसाठीही काम करत होता.
पोलिसांना चौकशीत हे सर्व कळल्यामुळे त्यांची संशयाची सुई रमेशकडे वळली होती.
त्यांनी त्याची जबानी घेतली होती.
ती घेतांना रमेशला खूनाच्या प्रयत्नांच्या आरोपावरून अटक कां करू नये, असे विचारले होते.
महेश शुध्दीवर यायची ते वाट पहात होते.
हे सर्व सांगून रमेश म्हणाला, “महेश शुध्दीवर आलाच नाही तर माझ्यावर खूनाचा आरोप येईल.
जरी शुध्दीवर आला तरी तोही कदाचित मलाच दोष देईल.”
यशवंत म्हणाले, “तू कांही केलेलं नाहीस ना ! मग घाबरू नकोस.
आपण सत्य शोधून काढू.
तुला काय वाटते, हे कोणी केले असेल ?”
रमेश म्हणाला, “महेशच्या कंपनीत तीन युनियन आहेत व त्यांचे आपापसांत वैर आहे.
महेश एका युनियनच्या कमिटीत आहे.
युनियनच्या भांडणातून अशी मारहाण होऊ शकते.”
चंदूने विचारले, “तू पोलिसांना हें सांगितलेस कां ?”
रमेश म्हणाला, “हो. मी त्यांच्याकडे बोललो पण माझे म्हणणे त्यांनी पूर्ण ऐकूनही घेतले नाही.”
यशवंत म्हणाले, “ठीक आहे. आम्ही चौकशी करून ह्या हल्ल्यामागे खरे कोण आहे, तें शोधून काढूच.
तुला जर पोलिसांनी अटक केली तर मला कळव
रमेश गेल्यावर चंदू म्हणाला, “मामा, चाळीच्या मालकाचा तर ह्यांत हात नसेल ?”
यशवंत म्हणाले, “आपल्याला ही सर्व माहिती काढावी लागेल.
सध्या मालक कोण आहे.
एकच व्यक्ती आहे की जास्त आहेत.
परंतु मला मालकाचा विशेष संशय येत नाही कारण एवढे फ्लॅटस् होत असतांना त्यांना खूपच फायदा होणार आहे.
चाळीचे भाडे त्यांना फायदेशीर नव्हतेच.
त्यामुळे एका फ्लॅटसाठी ते असं करतील, ही शक्यता कमी आहे.”
चंदू म्हणाला, “मग आपण कुठून सुरूवात करायची ?”
यशवंत म्हणाले, “त्याचा युनियनमधील सहभाग आणि कंपनीतील युनियन्सच्या वैराबद्दल माहिती काढायला हवी.
चाळीमध्ये महेशचे संबंध कसे होते, कोणाशी वैर होते कां ? हे जाणून घ्यायला हवे.
आजकाल सुपारी देऊन मारहाण घडवणं फार सोप्पं झालं आहे.
सुपारी घेणारे खूप झालेत.
त्याला ज्या जागी मारहाण झाली, त्याच्या आसपास कुठे महानगरपालिकेचा सीसीटीव्ही होता कां ?
त्यांत त्यावेळेची कांही माहिती मिळते कां, हे पाहूया.”
यशवंत आणि चंदू दोघांनीही माहिती काढायला सुरूवात केली.
युनियनमधील लोकांत मिसळून चंदूने तिथली माहिती मिळवली.
तीन युनियन्स असल्या तरी त्यांच्यांत स्पर्धा नव्हती.
एकच युनियन बळकट होती.
इतर नांवापुरत्या होत्या.
महेश संतापी होता.
तो प्रबळ युनियनच्या कमिटीचा सदस्य होता.
तिथे तो नेहमी कशावरून ना कशावरून वाद घालत असे.
तरीही जीवावर उठेल असा वैरी त्याला नव्हता.
गुलाबचंद रायचंद ह्यांच्या पांचव्या पिढीतील एक मुलगी आता चाळीची मालक होती.
तिचा विवाह श्रीमंत उद्योगपतीच्या कुटुंबातील धाकट्या मुलाशी झाला होता.
ह्या चाळीच्या जागी इमारती येण्याने होणारा फायदा त्या कुटुंबाला नगण्य होता.
तिने बिल्डर/डेव्हलपर ह्यांच्याशी केलेल्या करारावर सही केली होती.
पूर्ण चाळीत फारसा रस नसणाऱ्या त्या कुटुंबाला कुळकर्ण्यांच्या एका खोलीचं काहीच माहिती नव्हती.
सही करणारीच्या खात्यात मेथा दर महिन्याला भाड्यापोटी कांही हजार रूपये जमा करत असे.
बिल्डरने त्यांना काय किंमत द्यायची त्याची कागदपत्रे त्यांच्या वकिलाने करून घेतली होती.
बिल्डर आणि दलाल ह्या दोघांचीच अधिक माहिती काढायला हवी होती.
चंदूला त्यांच्यावर पाळत ठेवायला सांगितली होती.
बिल्डर नावाजलेला इंजिनिअर होता.
आतापर्यंत त्याने रिडेव्लपमेंट करून देण्याचे जे तीन प्रकल्प हाती घेतले, ते सर्व पूर्ण केले होते.
त्याला ह्या प्रकल्पात खूप फायदा होता.
प्रकल्प पूर्ण करण्यांत दिरंगाई झाल्यास मात्र फायदा झाला नसता कारण सर्व फ्लॅट्स बुक झाले होते व त्याने आगाऊ पैसे घेतले होते.
सध्याच्या भाडेकरूंना जागा होईपर्यंत दुसरीकडे रहाण्यासाठी भाड्यापोटी पैसे द्यायचे होते.
दलाल कुटुंब अनेक वर्षे चाळीत राहात होतं.
दलालांचे एक किराणा सामानाचं दुकानही चाळीपासून जवळच होतं.
आता दलालांच्या दुसऱ्या पिढीतील प्रेमजींच्या नांवावर ती जागा होती.
प्रेमजी वृध्द होते.
त्यांचे तीन मुलगे होते.
तिथेच रहाणारा त्यांचा मोठा मुलगा व त्याचे कुटुंब त्यांचे दुकान चालवत होते.
एक स्वत:च्या हिंमतीवर एक्स्पोर्ट बिझनेसमध्ये यश मिळवून दुसरीकडे रहायला गेला होता.
तिसऱ्याने दलाल ह्या नावाला जागून दलालीचा धंदा सुरू केला होता.
ह्या चाळीच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव येईपर्यंत तो व त्याचं कुटुंब प्रेमजीभाई आणि मोठा भाऊ ह्यांच्यावरच अवलंबून होतं.
आतां त्याला चांगली संधी मिळाली होती.
बिल्डरने जरी त्याला एकट्यालाच दलाल नेमला नसला तरी इतर दलालांहून त्याला थोडा अधिक अवसर होता व त्याने त्या गोष्टीचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यायचे ठरवले होते.
तो जु्न्या भाडोत्र्यांना वेगवेगळी आमीशं दाखवून दुसरीकडे जागा तात्काळ मिळवून देऊन फ्लॅटचे विक्री हक्क स्वत:कडे घेत होता.
महेशने नकार दिल्यावर, त्याने तोच विषय रमेशकडे काढला होता.
रमेश म्हणाला होता, “पावतीवर माझं नांव आलं तरच मी तुझ्या ॲाफरचा विचार करीन.
आतां तर पावतीवर अजून आमच्या वडिलांच नाव आहे.
महेशलाही पावतीवर त्याचं नांव हवं आहे.”
दोघांनीही नकार दिला तरी दलाल त्यांच्या मागे होताच.
हल्ल्यानंतर दहा दिवसांनी शुध्दीवर न येतांच महेश जग सोडून गेला आणि रमेशला संशयित खूनी म्हणून अटक झाली.
हे वृत्त यशवंतांच्या कानावर आलं.
चंदूने दलालवर पाळत ठेवली होती.
दलालला भेटणाऱ्या लोकांत गुंडगिरी करणारा कोणी त्याला दिसला नाही.
त्याने ट्रॅफीक पोलिसांकडून महेशला जिथे मारहाण झाली त्या भागांतील सीसीटीव्हीचे चोव्वीस तासांचे फुटेज मिळवले.
कॅमेऱ्यात मारहाणीचं कोणतेच दृश्य नव्हतं कारण तो कॅमेरा थोडा अलिकडल्या नाक्यावर होता.
परंतु नाक्यावर हातांत लाठ्या घेतलेले दोघे पंधरा मिनिटे उभे असलेले स्पष्ट दिसत होते.
त्यांचे चेहरेही दिसत होते.
तिसरा आल्यावर ते तिथून हल्ला झाला त्या जागेच्या दिशेने निघाले.
यशवंतानी पोलिसांचे लक्ष ह्या गोष्टीकडे वेधले.
दोघे पोलिसांच्या रेकॅार्डवर असलेले गुंड होते.
पोलिसांनी त्यांना लागलीच अटक केली आणि बोलते केले.
दोन दिवसांनंतर त्यांनी सगळं कबूल केलं.
तिसऱ्याच नांवही सांगितलं.
ते म्हणाले, “सुपारी देणाऱ्याचं त्याचं नाव माहित नाही पण आम्ही त्याला ओळखू शकतो.”
यशवंतांच्या विनंतीवरून पोलिसांनी रमेश, दलाल, बिल्डर ह्या तिघांचेही फोटो दाखवले पण ते म्हणाले, “नाही, ह्या फोटोंत आम्हाला काम सांगणारा नाही.”
यशवंतानी सुचवलं की बिल्डरने किंवा दलालने आपल्या ॲाफीसमधील एखाद्याला हे काम सांगितले असल्यास, मारेकरी त्याला ओळखू शकतील.
तेव्हां साध्या वेशांतले पोलिस त्या दोघांना चाळीत उभारलेल्या बिल्डरच्या ॲाफीसात घेऊन आले.
तिथेही त्यांना तो चेहरा दिसला नाही.
त्यांना परत नेत असतांना चंदूबरोबर येणारा भाडे वसुली करणारा मेथा त्यांना दिसला.
तेव्हां दोघेही लागलीच “हाच तो” म्हणून ओरडले.
पोलिसांनी मेथाला अटक केली.
मेथाने आपला गुन्हा कबूल केला.
मेथाचा हिशोब होता, “एक भाऊ मरेल, एकाला शिक्षा होईल आणि त्यांचे पावतीचे अर्ज फाडून टाकून स्वत:च्या बायकोच्या नांवावर पावती करून नवा फ्लॅट आपणच घेऊ.”
स्वत: जाऊन सुपारी देण्याची चूक त्याने केली.
यशवंताना मेथाचा संशय येतांच, त्यांनी चंदूला पाठवून त्याला बिल्डरच्या ॲाफिसांत त्या दोघांसमोर न्यायला सांगितले आणि त्याचा गुन्हा उघडकीस आला.
मेथावर रितसर खुनाचा आरोप ठेवला गेला आणि त्याला चौदा वर्षांची शिक्षा झाली.
*- अरविंद खानोलकर.*
वि. सू.
वरील कथेतील व्यक्ती, घटना, प्रसंग, इ. सर्व काल्पनिक आहेत.
कुठे साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.

– अरविंद खानोलकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..