‘जहाल क्रांतिकारक’ भगत सिंग यांचा जन्म २८ सप्टेंबर १९०७ रोजी पाकिस्तानातील बंगा येथे झाला.
क्रांतिकार्यात बलिदानासाठी सर्वात पुढे असणारा असा नेता, निधड्या छातीने हौतात्म्याला सामोरा जाणारा ‘देशभक्त’, ‘प्रखर बुद्धि प्रामाण्यवादी’, ‘जहाल क्रांतिकारक’ अशी भगत सिंग यांची ओळख आजही आपल्या मनात कायम आहे.
तरुण वयातच आपल्या कार्याची दिशा त्यांना पक्की ठाऊक होती, ते बंडखोर होतेच पण जगातल्या सगळ्या दु:ख-दैन्याबाबत त्यांच्या मनात करुणाही होती म्हणूनच त्यांची ओळख क्रांतीकारी शहीद भगत सिंग बरोबरच एक उत्तम द्रष्टा, करुणा बाळगणारा मानवतावादी अशीही केली जाते. स्वत:वरील खटल्याचा वापर क्रांतीच्या प्रसारासाठी करणारा मुत्सद्दीपणाही त्यांच्या अंगी होता. वयाच्या अवघ्या चोवीसाव्या वर्षी देशासाठी त्यांनी हसत हसत बलिदान दिलं.
भगत सिंग यांची वाचनाची आवड इतकी प्रचंड होती की त्यांना फाशी देण्याआधी त्यांचे वकील प्राण नाथ मेहता यांनी आणलेलं पुस्तक त्यांनी भरभर वाचायला सुरूवात केली. त्यांच्या या पुस्तकवेडानं प्राण नाथ मेहताही अचंबित झाले होते. पुस्तक वाचनातून त्यांना ज्या काही गोष्टींची नव्यानं माहिती मिळत, समजत होती त्याची ते टिप्पणी तयार करत. तुरुंगात असताना त्यांनी काही पुस्तकं लिहिली होती. ‘द हिस्ट्री ऑफ द रिव्होल्युशनरी मूव्हमेंट ऑफ इंडिया’, ‘द आयडियल ऑफ सोशॅलिझम’, ‘ऑटोबायोग्राफी’ आणि ‘अॅलट द डोअर ऑफ डेथ’ ही चार पुस्तकं लिहिली होती. दिल्ली असेंब्लीत बॉम्ब टाकण्यासाठी जाताना भगतसिंहांना माहीत होते की, आपण आता परत येणार नाही. तेव्हा त्यांनी आपले नवे बूट भेट म्हणून आपले सहकारी जयदेव कपूर दिले होते आणि त्याची जुनी पादत्राणे स्वत: घातली. भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांना ब्रिटिश पोलीस सुपरिटेंडन्ट असलेल्या जेम्स स्कॉटचा खून करायचा होता. मात्र भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चुकून जॉन सँडर्सची हत्या केली. ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी लाला लजपतराय राय यांच्या मृत्यूमागे जेम्स स्कॉटचा हात असल्याची माहिती भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांना होती. त्यामुळेच जेम्स स्कॉटला यमसदनी धाडण्याचा निर्धार भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केला होता. मात्र त्यांच्याकडून चुकून जॉन सँडर्सची हत्या झाली. दिल्लीतील केंद्रीय विधानसभेत बॉम्बफेक करत असताना भगतसिंग आणि त्यांचे सहकारी बटुकेश्वर दत्त यांना अटक झाली.
भगतसिंग यांनी तुरुंगात असताना उपोषण केले होते. ब्रिटिशांच्या कैदेत असणाऱ्या भारतीयांना चांगली वागणूक मिळावी, त्यांना त्यांचे हक्क मिळावेत, यासाठी भगतसिंग यांनी उपोषणाचे हत्यार उपसले होते. भगतसिंग यांना राजगुरु आणि सुखदेवसोबत २३ मार्चला फाशी देण्यात आली. या तिन्ही तरुण देशभक्तांच्या फाशीनंतर तमाम भारतीयांचं रक्त आणखी पेटून उटलं त्यांच्या बलिदानानंतर स्वांतत्र्यांची चळवळ अधिक प्रखर झाली.
२३ मार्च हा दिवस भगतसिंग यांची जन्मभूमी असलेल्या पंजाबमध्ये शहीद दिन म्हणून पाळला जातो. २००२ साली प्रदर्शित झालेला ‘द लेजंड ऑफ भगत सिंग’ या चित्रपटामध्ये अजय देवगण भगतसिंग यांच्या भूमिकेत झळकला होता.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply