तांड्याचं याउलट असतं -संध्याकाळ झाली की पालं टाकायची. सूर्य उगवला की नवी वस्ती ! “जगणं आमचं नका विचारू, आम्ही पाखरे भटकी ” एकदा स्वीकारलं की सूर्योदय/सूर्यास्त महत्वाचे उरत नाही. वितळणाऱ्या आकाशाचे निमंत्रण मिळत नाही. फक्त रात्र आणि तिचा अंधार ! वाटतं वय थांबावं आणि जसे असू तसेच राहावे. पण प्रत्यक्षात सगळं पुढे सरकतच असतं कळत-नकळत.
रोजचा सूर्य वेगळा आणि तांडाही. कोणाचीच समस्या सुटत नाही. वास्तव्य कुठलेही असो, आणि सकाळ होवो ना होवो ! स्वतःचं घर असो वा नसो.
काहीजणांसाठी “बसेरा ” महत्वाचा असतो. त्यांची पाळेमुळे एकाच मातीत घट्ट रुजलेली असतात. ऊन-वारा-पावसाचा सामना करीत ते जागा सोडत नाही. मग भलेही थोडावेळ सूर्यप्रकाश मिळाला नाही तरी बेहत्तर! ते पर्यायी उजेडाची सोय करतात. याउलट माती-बदलू माणसे गांवोगांवी रोजचा सूर्य धुंडाळत फिरत असतात.
भूतकाळात मुक्काम करणाऱ्या घरामध्ये आणि प्रकाशयुक्त भविष्य शोधणाऱ्या पावलांचे पटतेच असे नाही. मेंदू आणि मनाचे वाकडे असते हा शुभंकर अनुभव!
कधी कोणाचे ऐकावे, कधी कोणाच्या मागे जावे याबाबत कायम गोंधळ असतो. मेंदू आणि हृदय आपल्यात असले तरी सवेरा अनिर्बंध फिरत असतो- संध्याकाळपर्यंत ! मग त्याला घराकडे परतावे लागते.
यांच्यात संवाद होऊ नये म्हणून काळ तऱ्हेतऱ्हेच्या भिंती बांधत असतो- अंतराच्या, अबोल्याच्या, निःशब्द ओल्या घावांच्या आणि जसं जसं जमेल तशा !
हटवादी मंडळी मग प्रयत्नच करीत नाहीत त्या ओलांडायच्या.
माझा बसेरा, माझा सवेरा ! तडजोड नाही.
बसेरा आणि सवेरा माझ्यामार्फत एकमेकांना चिठ्ठया पाठवितात- ” तू चूक ! ” एवढं अल्पाक्षरी लिहून.
मेंदू भूतकाळातील मी केलेल्या चुकांबद्दल कुरकुरत असतो आणि हल्ली मन सतत सूर्योदयाबद्दल साशंक असते. शरीराचा पिंजरा मग रात्रीच्या क्षणांना सोडतच नाही. फारतर कातडी आरामखुर्चीवर विसावतो -बेरजा वजाबाक्या करीत !
कोणाकडे हात मागावा तर प्रत्येकजण स्वतःच्या बसेरा आणि सवेरा मध्ये अडकून पडलेले ! भिंती स्वतःच्या आणि आकाशही आपापले !
आपल्या अनुपस्थितीला स्वीकारलेले !
उपचारानंतर घरी आशेने परतलेल्या राखीला “बसेरा” त साक्षात्कार होतो – काहीच आपलं राहिलेलं नाहीए. आपल्याविना घर विणलं गेलंय . पती,मुलगा आपल्या सख्ख्या बहिणीबरोबर सहज राहात आहेत – त्यांनी मनामधील आणि प्रकाशातील द्वंद्व सोडवलंय.
चार भिंती आणि छप्पर आहे त्यांच्या माथ्यावर आणि आपल्यासाठी घराचं दारही !
पण सूर्य तर माझा मलाच शोधायला हवा. माझ्या जून्या सूर्यावर आता इतरांचा ताबा आहे.
मग बसेरा सोडून ती तिच्या हक्काच्या सवेरा कडे मनाविरुद्ध परतते- सगळीकडे असहाय अश्रू सांडतात. नियतीची ही ताटातूट करण्याची जुनीच खोड ! एकदा घर सोडलं की पुन्हा प्रवेश करायचा असेल तर स्वतःचा सूर्य बरोबर आणायचा ही पूर्वअट !
१९८१ च्या ” बसेरा ” मध्ये हे “नातं “शिकवलेल्या गुलज़ारचा आज वाढदिवस ! शिक्षकदिन फक्त ५ सप्टेंबरलाच असतो असे नाही! रोजच्या दोन शिक्षकांकडे (बसेरा आणि सवेरा) संयमित बोट दाखविणारा हा शिक्षक !!
तुझ्या घराभोवती अखंड “सवेरा “असो.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply