किती खाल्ला मार, किती खाल्या शिव्या याची गणतीच नव्हती.
एकच गोष्ट सतत कानी पडत होती.
उनाड आहे, बावळट आहे, धडपड्या आहे, तडफड्या आहे, मूर्ख कुठचा.
भडीमार होत होता आईकडून शब्दांचा..
आम्ही होतो बालपणीच गांधीवादी.
एका गालांत कुणी मारली तर दुसरा गाल पुढे करणारे.
मुकाट्यानें मान वर न करता सारे शब्द पचविणारे.
खेळणें, कुदणें, उड्या मारणें,
त्यातच ढोपर, कोपर, हातपाय फुटून जाणें, भळभळा रक्त वाहायचे.
पण सांगा रडून कुणाला ?
कारण ते असायचे स्वतःच्याच प्रतापाचे…
निमुटपणें बाजूस बसून, सहन करायचे
आणि कुणास समजू नये, म्हणून माती टाकायचे.
भरत होत्या साऱ्या जखमा हलके हलके.
न भरून कसे चालायचे ?
मस्तीची रग, खेळातील धडपड आणि
स्वत:च डॉक्टर बनून जखामाबद्दल वाटणारी मायेची कढ.
सारे तुटून पडायचे, घाव बरे करण्यासाठी.
* * *
… संध्याकाळची वेळ, सूर्य अस्ताला चाललेला.
किती घटका राहील्या होत्या, त्याला डुबण्यासाठी !
विचार करितो मी. शांत बसून पंचाहत्तरीच्या काठी.
हातपाय खाजवितो, कुरवाळीतो, सुरकुतलेल्या कातड्याकडे बघतो.
मध्येच नजर खिळून राहते, ती जखमांच्या वणावर.
कितीतरी लहान मोठ्या आकाराची.
ज्यावर दिसत होती चित्रे आठवणीची.
प्रत्येक वणावर होता एक इतिहास, एक घटना, एक जबरदस्त प्रसंग.
कोडगे बनून केलेली मस्ती, आईचा मार, शिव्या आणि बाबांचा राग.
पण आज सारे काही मनाला आनंदीत करून टाकणारे.
शरिरावरले वण बनले होते एक जीवन आलबंम.
नेत होते भूतकाळांत.
जो होता निश्चित आणि उपभोगलेला.
त्यात भविष्यकाळाची अनिश्चितता नव्हती, कि वर्तमान काळाची क्षणिकता.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
खूप सुंदर आहे…लेख
संतोष सेलूकर
खूप सुंदर आहे…
संतोष सेलूकर