नासा, युरोपिअन स्पेस एजन्सी आणि कॅनडिअन स्पेस एजन्सी, यांनी मिळून तयार केलेली जेम्स वेब अंतराळ दुर्बीण ही दिनांक २५ डिसेंबर २०२१ रोजी, भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ०५.५० वाजता, दक्षिण अमेरिकेतील कुरू या अंतराळतळावरून यशस्वीरित्या अंतराळात झेपावली. एरिएन-५ या अग्निबाणाद्वारे झालेल्या या उड्डाणानंतर सत्तावीस मिनिटांनी, सुमारे १२० किलोमीटर उंचीवर असताना, ही दुर्बीण अग्निबाणापासून पूर्ण वेगळी झाली. आता ही दुर्बीण पृथ्वीवरून थेट मार्गानं आपल्या अपेक्षित जागी जाईल. सूर्य व पृथ्वी यांना जोडणाऱ्या रेषेवर, परंतु सूर्याच्या विरूद्ध बाजूस राहून ही दुर्बीण, पृथ्वीपासून सुमारे पंधरा लाख किलोमीटर अंतरावरून, अंतराळाची निरीक्षणं करणार आहे. त्यामुळे ती सतत पृथ्वीच्या पलीकडे राहून, पृथ्वीच्या साथीनं सूर्याला प्रदक्षिणा घालीत राहिल. (लाग्रांज बिंदू या नावानं ओळखल्या जाणाऱ्या या जागेवर सर्व बलांचं संतुलन साधलं गेल्यानं, तिथलं एकत्रित बल शून्य असतं.) या अपेक्षित जागेपर्यंत पोचण्यास या दुर्बिणीला तीस दिवस लागतील. त्यानंतर विविध उपकरणांच्या चाचण्या घेतल्या जाऊन, प्रत्यक्ष निरीक्षणांना अजून सहा महिन्यांनी सुरुवात होईल.
गेली तीन दशके कार्यरत असलेल्या हबल अंतराळ दुर्बिणीची, जेम्स वेब अंतराळ दुर्बीण वारसदार ठरणार आहे. सहा टन वजनाच्या या दुर्बिणीचा आरसा हबल अंतराळ दुर्बिणीच्या आरशाप्रमाणे एकसंध नसून, तो एकूण अठरा छोट्या आरशांपासून तयार केला गेलेला आहे. या सर्व आरशांचा एकत्रित व्यास साडेसहा मीटर इतका भरतो. हबल दुर्बिणीच्या आरशाचा व्यास सुमारे अडीच मीटर इतका आहे. त्यामुळे, जेम्स वेब अंतराळ दुर्बीण ही हबल दुर्बिणीच्या तुलनेत सहापट अधिक प्रकाश गोळा करेल. जेम्स दुर्बिणीचे हे आरसे बेरिलिअम या धातूपासून बनवलेले असून, त्यावर सोन्याचा मुलामा दिलेला आहे.
दृश्यप्रकाशाबरोबरच अवरक्त किरणंही टिपणारी ही दुर्बीण, विश्वजन्माच्या वेळेनंतरचा काळ अभ्यासणार आहे. त्याचबरोबर विश्वजन्मानंतरच्या, सुरुवातीच्या काळात निर्माण झालेल्या दीर्घिकांच्या जन्माचा वेध घेणार आहे. ताऱ्यांचा व ग्रहांचा जन्म, तसंच इतर ताऱ्यांभोवती फिरणाऱ्या ग्रहांची निर्मितीसुद्धा या दुर्बिणीद्वारे अभ्यासली जाणार आहे. या दुर्बिणीचं आयुष्य दहा वर्षांहून अधिक असणं अपेक्षित आहे.
— डॉ. राजीव चिटणीस.
छायाचित्र सौजन्य: NASA
Leave a Reply