‘नवरंग’ चित्रपटातील कवीची प्रेरणा ही त्याची साधीसुधी असणारी पत्नीच असते. मात्र पतीला आपल्यापेक्षाही देखण्या स्त्रीच्या सहवासात राहून काव्य स्फुरते, असा गैरसमज करुन घेतल्याने ती त्याच्या जीवनातून निघून जाते. दरबारात राजाने सांगितल्यावर काव्य न स्फुरल्याने कवी हताश होतो. तेवढ्यात त्याच्या पत्नीच्या घुंगराच्या आवाजाने तो प्रफुल्लीत होऊन काव्य सादर करुन शेवटी म्हणतो…जमुना तुही है, तुही मेरी मोहिनी! व्ही. शांताराम यांना ‘नवरंग’ या चित्रपटाची कथा-कल्पना कदाचित रंगसम्राट रघुवीर मुळगावकर यांच्या बाबतीत घडलेल्या अशाच सत्य घटनेवरून सुचली असावी, असं वाटतं…
चित्रकार रघुवीर मुळगावकर हे गिरगावात रहात होते. काही वर्षांनंतर त्यांनी सी शोअरवर वाळकेश्र्वरला कमल बिल्डींगमध्ये सातव्या मजल्यावर आलिशान फ्लॅट घेऊन कुटुंब तिकडे हलविले. सकाळी ते गिरगावातील स्टुडिओत जायचे व संध्याकाळी परत यायचे. सतत नाराज रहायचे. पत्नीला ते म्हणायचे, ‘आपण परत गिरगावात जाऊया. स्टुडिओत एकटा बसलो की, मला काहीही सुचत नाही. तू जवळपास असल्याशिवाय, तुझ्या बांगड्यांच्या आवाजाशिवाय, तुझ्या केसातील मोगऱ्याचा सुगंध दरवळल्याशिवाय मला माझा ब्रश साथ देत नाही.’
पुन्हा कुटुंब गिरगावात आलं आणि रघुवीर चित्रसाधनेत रमले. व्ही. शांताराम यांनी त्यांना त्यावेळी विचारलं होतं, ‘तुम्ही इतक्या सुंदर स्त्रियांची चित्रे काढता, त्यासाठी कधी माॅडेल समोर बसवता का?’ त्यावर रघुवीरांनी उत्तर दिलं, ‘माझ्या पत्नीला पाहूनच मी चित्र काढतो.’ त्यांची पत्नी गोरीपान होती. नऊवारी साडी. केसांचा अंबाडा. त्यावर फुलांचा गजरा. ठेंगणी ठुसकी. तिला पाहूनच रघुवीर यांनी स्त्रियांची अप्रतिम चित्रे काढली. त्यांच्या साध्यासुध्या पत्नीतच त्यांना चित्रातील सुंदर चेहऱ्याच्या, टपोऱ्या डोळ्यांच्या, कमनीय बांध्याच्या, मोहक हास्य करणाऱ्या स्त्रिया दिसत होत्या. ती एका अभिजात चित्रकाराची अनुभूती होती. असा कलाकार जन्मालाच यावा लागतो…
गोव्याने महाराष्ट्राला दोन महान चित्रकार दिले. एक होते दीनानाथ दलाल व दुसरे रघुवीर मुळगावकर. गोव्यातील अस्नोडा येथे १४ नोव्हेंबर १९१८ साली रघुवीर यांचा जन्म झाला. वडील शंकर हे देखील चित्रकार होते. ते गोव्यात चित्रकलेचे वर्ग घ्यायचे. वयाच्या चौदाव्या वर्षी काढलेल्या चित्राबद्दल त्यांना पोर्तुगीज सरकारचे बक्षीस मिळाले होते. मुळगावकरांच्या शेजारी प्रसिद्ध चित्रकार त्रिनिदाद रहात असत. त्यांनी रघुवीरमधील कलागुण हेरले व त्याच्या वडिलांना त्याला चित्रकलेतील अनुभव घेण्यासाठी मुंबईला पाठवायला सांगितले.
रघुवीर मुंबईत आले तो काळ साधारणपणे होता १९३८ सालचा. त्याकाळी एस. एम. पंडित यांचे नाव कलाक्षेत्रात प्रसिद्ध होते. रघुवीरने मुंबईत आल्यावर सुरुवातीची काही वर्षे पंडितांकडे काढली. एकलव्याप्रमाणे पंडितांच्या शैलीचा अभ्यास केला, कामाची पद्धत न्याहाळली व कोणतेही चित्रकलेचे शिक्षण न घेता आपल्या चित्रसाधनेला गिरगावात येऊन सुरुवात केली.
त्यांची रहाणी अत्यंत साधी होती. खाली धोतर, अंगात रेशमी सदरा व त्यावर डबल काॅलरचा कोट. केस चापून बसवलेले आणि डोळ्यावर सोनेरी फ्रेमचा चष्मा. त्यांनी सुरुवातीला व्यंगचित्रे काढली. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे हे रघुवीरांचे खास मित्र होते. रघुवीर यांच्या पहिल्या कन्येचे नाव ‘कल्पना’ हे त्यांनीच सुचविले. कल्पना बाबांची फार लाडकी होती. बाबांबरोबर फिरायला बाहेर गेल्यावर कल्पनासाठी दरवेळी नवीन बाहुलीची खरेदी हमखास होत असे. जाताना दोघं व येताना तिघंही घोडागाडीतून घरी परतत असत. पहिल्या मुलीनंतर रघुवीरांना भरपूर कामं मिळू लागली. मंगेशाच्या कृपेने सुबत्ता आली. कल्पना दहा वर्षांची असताना तिच्या धाकट्या बहिणीचा जन्म झाला. आई, ‘कला’. कलेची ‘कल्पना’, कल्पनेची नवीन छोटी बाहुली ‘भावना’!
कल्पना काॅलेजला जाऊ लागली तेव्हाची गोष्ट. गॅदरींगचे दिवस होते. जाताना कोणती साडी नेसून जावं या विचाराने कल्पना पाच सहा साड्या बेडवर मांडून पहात होती, तेवढ्यात रघुवीर रंगाचे पाणी बदलण्यासाठी आत आले. त्यांना कल्पनेच्या मनातील साडी-गोंधळ समजला. ते लागलीच कपडे करुन बाहेर पडले व एक रंगीत फुलाफुलांची वेलबुट्टी असलेली पांढरी साडी व साडीवर नसलेल्या कलरचा ब्राॅकेटचा ब्लाऊज पीस घेऊन आले. इतक्या लवकर कोणीही ब्लाऊज शिवून देणं हे शक्य नव्हतं. रघुवीर यांनी एका शिंप्याला गाठलं व संध्याकाळपर्यंत ब्लाऊज शिवून द्यायला त्याला बजावलं. अर्ध्या तासाने तो शिंपी दारात येऊन उभा राहिला. त्याला कुणीतरी सांगितलं की, तुझ्याकडे एवढा मोठा चित्रकार येऊन गेला, तू त्यांना ओळखलं देखील नाहीस? तो रघुवीर यांची माफी मागायला आला होता. संध्याकाळी ब्लाऊज शिवून मिळाला. कल्पना नटून थटून गॅदरींगला गेली. त्या दिवशी ती खरी एका ‘रंगसम्राटाची कन्या’ भासत होती.
रघुवीर यांनी कुलकर्णी ग्रंथागार, केशव भिकाजी ढवळे, परचुरे, रायकर यांच्या प्रकाशनांच्या असंख्य पुस्तकांची मुखपृष्ठे केली. तो काळ मराठी साहित्याचा सुवर्णकाळ होता. पुस्तके, मासिके, नियतकालिके यांच्याच बरोबर कॅलेंडर्स देखील मोठ्या प्रमाणावर छापली जात होती. साहजिकच अनेक कंपन्यांच्या कॅलेंडरवर रघुवीर मुळगावकरांच्या देव-देवता झळकू लागल्या. एकेकाळी राजा रविवर्माने काढलेली देव-देवतांची चित्रे कलारसिकांच्या दिवाणखान्यात सजलेली असायची, तीच जागा आता रघुवीरच्या कॅलेंडर चित्रांनी घेतली. पुण्यातील पोरवाल (काळे दंत मंजन) कंपनीने रघुवीर मुळगावकरांकडून स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, बालगंधर्व, चंद्रावरील श्रीकृष्ण, गणपती, अशी अनेक कॅलेंडर चित्रे काढून घेतली. दिवाळी अंकातील ‘जाई काजळ’च्या जाहिरातीत त्यांचेच चित्र असे.
दीपलक्ष्मी, धनुर्धारी, वसंत, अनुप्रिता, नंदा, माधुरी, माणिक, अलका, पैंजण अशा अनेक मासिकांची व दिवाळी अंकांची मुखपृष्ठे त्यांनी चितारली. १९५८ ते १९७६ दरम्यानच्या १८ वर्षांच्या काळात ‘दीपलक्ष्मी’चे ग. का. रायकर व ‘शब्दरंजन’चे जयंत साळगावकर, मुळगावकरांचे स्नेही झाले. मुळगावकरांनी देवतांच्या चित्रांबरोबरच काही व्यक्तीरेखाही अजरामर केल्या. बाबूराव अर्नाळकरांचे धनंजय, छोटू, झुंझार-विजया, काळापहाड, धर्मसिंग, चारुहास आदी गुप्तहेर त्यांनी साकारले. त्यांनी देखणी कथाचित्रेही अमाप काढली. अनेक पौराणिक, ऐतिहासिक चित्रमालिका साकारल्या. गणेश पुराण, रामायण, महाभारत, महाराष्ट्रातील संत, इत्यादी एकूण सुमारे पाच हजारांहून अधिक चित्रं काढणारे मुळगावकर हे महाराष्ट्रातील एकमेव चित्रकार आहेत.
मुळगावकरांची स्प्रे माध्यमावर जबरदस्त पकड होती. कामाचा झपाटा देखील प्रचंड होता. चित्र पूर्ण केल्यानंतर ते कोपऱ्यात मुळगावकर अशी इंग्रजीत सही करीत असत. ती टाईप केल्याप्रमाणे दिसे. त्यांनी स्वतःचा ‘रत्नप्रभा’ नावाचा अंक सुरू केला होता. त्यातून अनेक विषयांवरील चित्रमालिका रसिकांना पहायला मिळाल्या.
एवढी मोठी कलासाधना करुन देखील रघुवीर समाधानी नव्हते. त्यांनी एकदा त्यांच्या लाडक्या पोपीला (कल्पना) बोलून दाखवलं होतं की, मी पुढच्या जन्मी चित्रकार होणार नाही. कारण इथे माझ्याच काय, कोणाच्याच कलेची कदर केली जात नाही. मी त्यापेक्षा अमेरिकेत जन्म घेईन, खूप शिकून नाव कमवेन.
जवळपास पस्तीस वर्षे सतत काम केल्यानंतर उतारवयात, केवळ सत्तावन्न वर्ष पूर्ण झालेली असताना कर्करोगाने त्यांना ग्रासले व १९७६ साली स्वर्गातील देव-देवतांनीच रघुवीर यांना पृथ्वीवरुन स्वर्गात बोलावून घेतले…
आमची पिढी भाग्यवान आहे कारण, आम्ही दलाल आणि मुळगावकर युग अनुभवलं आहे! या महान रंगसम्राटाचं एक छोटं चित्र माझ्या संग्रही आहे, ते मी जीवापलीकडे जपून ठेवलंय…
– सुरेश नावडकर १७-१-२१
मोबाईल ९७३००३४२८४
Leave a Reply