आजच्या दिवशी एक खास आठवण झाली आहे म्हणून ती खास तुम्हाला सांगणार आहे. पूर्वी इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत एकच शिक्षिका सर्व विषय शिकवत असत. आणि एके वर्षी चौथ्या इयत्तेला शिकवणाऱ्या शिक्षिका लग्नाच्या निमित्ताने नोकरी सोडून गेल्यावर अनेक पालकांनी मुलांना शाळेत कोण शिकवणार आम्हाला चांगले शिक्षक पाहिजेत नसता आमच्या मुलांचे दाखले द्या. त्यांची मनस्थिती लक्षात घेऊन मी शब्द दिला होता मीच हा वर्गाला शिकवणार आहे. पालक समाधानाने विश्वासाने गेले. पण मुख्याध्यापक म्हणून असतांनाच हे जरा अवघडच होते…
माझे विद्यार्थी खूपच समजूतदार होती म्हणून मला अजिबात त्रास झाला नाही. कुणी आलं की अॉफिसात जावे लागले तरी मुलं शांत बसून अभ्यास करायची. कधीच रागवाव लागलं नाही. जाणती होती ती. त्यांना शिवरायांचे चरित्र म्हणून एक विषय होता. आणि आवडीने मनापासून ऐकायची शिवाजी महाराजांचे चरित्र. आणि एकदा एक पालक बाई म्हणाल्या की बाई माझा मुलगा अबोल लाजाळू आहे पण त्याला तुमच्या सांस्कृतिक कार्यक्रमात नुसते उभे केले तरी चालेल पण मला एकदा डोळे भरून त्याला रंगपचावर पहायच आहे. दरम्यान मी मा. बाबासाहेब पुरंदरे यांचे जाणता राजा हे पाहिले होते आणि विचार चक्र सुरु झाले. ठरविले माझी मुले पण जाणतीच आहेत याच्यातूनच जाणता राजा सादर करायचा. सगळ्यांना भाग घेता येईल असे एक नाट्यीकरण तयार केले. अर्धा एक तासात संताची कामगिरी ते राज्याभिषेक एवढे सगळे प्रसंग घेतले. मुलांची निवड करण्यात आली. पण मुलं वयाने लहान होती. पण धीट. त्यात एक मुलगी सुंदर. थोडी गुटगुटीत गोरीपान तिला सुभेदाराची सून केली. आता नेपथ्य म्हणजे आमच्या शाळेतील एक कल्पक शिक्षक श्री कुंभार सर व मी आम्ही कपडे. तलवारी. तुतारी. सिंहासन सगळे काही चांगले केले. पण पालखी करता येणे शक्य नव्हते म्हणून दोन काठ्यांना साडीचे पडदे लावून तिला तिच्या आईने खूप छान सजवून दिले होते ती त्यातून बसलेली आहे असे वाटत होते पण प्रत्यक्षात ती चालत होती…
1993-94 चा काळ असावा. त्या वेळी महाराष्ट्राचे उर्जा व पाटबंधारे विभागाचे मंत्री मा. पद्मसिंह पाटील होते. आणि हीच सुवर्ण संधी साधून हा कार्यक्रम त्यांच्या समोर सादर केला. विशेष म्हणजे ते स्वतः हून म्हणाले होते की मी हे सगळं प्रेक्षकात बसून पाहणार आहे. आणि कार्यक्रम सुरू झाला शाळेचे मैदान प्रेक्षकांनी भरुन गेले. एका पेक्षा एक वरचढ असे प्रसंग सादर केले मुलांनी. आणि तो अंगावर शहारे आणणारा. डोळ्याचे पारणे फिटणार राज्याभिषेकाचा आंनदी सोहळा सुरू झाला. जिजाऊ माता. अष्टप्रधानमंडळ. सर्व राण्या. आणि शिवाजी महाराज यांना सिंहासनावर बसवले होते. छत्रपती होणार म्हणून सगळी जय्यत तयारी केली होती. आणि गागाभट्ट यांनी खणखणीत आवाजात गोब्राह्मण प्रतिपालक…… असे म्हणत होते आणि वातावरण निर्मिती व्हावी म्हणून आकाशात आतिषबाजी केली. तुतारी वाजवली गेली देहभान विसरून सगळे मैदान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयजयकारांने निनादून गेले. सगळेच भारावून गेले होते. आणि माझ्या डोळ्यात मुलांना पाहून पाणी. मा. मंत्री महोदय यांनी फोटो काढून घेतला या शिवरायांच्या दरबारात. आणि एकेक पालक आपापल्या मुलांना घेऊन जात असताना त्या अष्टप्रधान मंडळात एक जो मुलगा उभा होता त्याची आई त्याला घेऊन जाताना तिच्या चेहर्यावर जो आनंद व समाधान होते ते पाहून मला जिजाऊ दिसल्या त्यांच्यात. वाटले होते की हा राज्याभिषेकाचा सोहळा पाहून त्यांना किती आणि काय काय वाटले असेल. त्या होत्या म्हणून शिवाजी महाराज घडले. आणि महाराष्ट्रात स्वराज्य आले. आणि आता तर हे सगळे लिहितांना सुध्दा मी अशीच भारावून गेले. शब्द सुचत नाहीत.
(गागाभट्ट झालेल्या माझ्या एका विद्यार्थ्याने व त्याच्या आईने मला हे फोटो पाठवले आहेत म्हणून तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचे जमले. धन्यवाद देशपांडे बाई व आनंद देशपांडे.)
— सौ. कुमुद ढवळेकर.
Leave a Reply