२००३ मधील डिसेंबर होता. पीटरमेरीत्झबर्ग मधील उन्हाळ्यातील थंड दिवस होता. सकाळीच माझा मित्र, क्लिफ घरी आला, तो, त्याच्यासोबत त्याची मुलगी जेनेट हिला घेऊनच. क्लिफ हा माझा अतिशय चांगला मित्र असल्याने, आणि त्याच्या घरी माझे नियमित जाणे-येणे असल्याने, आम्ही कधीही एकमेकांच्या घरी जात असू. वास्तविक रविवार सकाळ म्हणजे त्याची चर्चमध्ये जायची वेळ तरीही तो, जेनेटसोबत आला होता, म्हणून मला जरा नवल वाटले. त्यांच्या पाठीमागून, एक तसाच गोऱ्या वर्णाचा मुलगा आला आणि लगेच क्लिफने त्याची,’जेम्स” म्हणून ओळख करून दिली. अर्थात, जेम्स, हा जेनेटचा Boyfriend असणार, हे मी इतक्या वर्षांच्या अनुभवाने ओळखले. साउथ आफ्रिकेत, आपल्यासारखे, प्रियकर-प्रेयसी असे प्रकार तुरळक असतात, म्हणजे आधी ओळख करून घ्यायची, नंतर ती वाढवायची, हा प्रकार काही वर्षे चालला की मग आपण प्रेमात पडलो आहोत, हे कबूल करायचे, ही आपली पद्धत, तिथे जुनाट ठरते!! इथे “चट मंगनी, पट शादी” यातील दुसरा भाग वगळता, सगळे अनुभव एकसाचीच असतात.जेम्स, पहिल्या भेटीतच मला फार स्मार्ट वाटला, म्हणजे प्रथमच भेटत आहोत, याचा, त्याच्या बोलण्यात लवलेश देखील नव्हता. हे एक, गोऱ्या लोकांचे वैशिष्ट्य मानावे लागेल. एकदा की ओळख झाली की लगेच त्याचे मैत्रीत सहजपणे रुपांतर होते. मने जुळणे, मते एकजीव होणे, याला इथे थारा नाही. मी, तिथे एकटाच रहात असल्याने, नंतर, ते माझ्याकडे अधूनमधून येत राहिले. विशेषत: शुक्रवार किंवा शनिवार संध्याकाळी जेम्स , जेनेटसह माझ्याकडे यायचे,संध्याकाळ असल्याने नेहमीच ड्रिंक्स व्हायचे. एकूण, जेम्स माझ्या मनात चांगल्यापैकी भरला. तसे, मी माझे मत, जेनेटच्या वडिलांना, क्लिफला मनमोकळेपणी सांगितले, तशी क्लिफदेखील सुखावला. जेनेट ही त्याची तिसरी मुलगी. पहिल्या दोन्ही, लग्न करून, लंडन इथे स्थिरावल्या होत्या.
कधीकधी, मी त्या जोडप्याबरोबर, सिनेमाला किंवा हॉटेल अथवा क्लबमध्ये जात असे. असेच काही महिने गेले आणि एकेदिवशी क्लिफने त्यांच्या Engegement ची बातमी आणली आणि यथावकाश तो समारंभ, अर्थात ख्रिश्चन रीतीरिवाजानुसार पार पडला. २००४ च्या अखेरीस, मी नोकरी बदलली आणि प्रथम रस्टनबर्ग आणि नंतर २००५ मध्ये Standerton इथे नोकरीनिमित्ताने राहायला गेलो, तरीही फोनवरून किंवा इंटरनेटवरून, माझा त्यांच्याशी संपर्क होता. २००७ साली, मी प्रिटोरिया इथे नोकरीसाठी आलो आणि ते माझ्या अगदी शेजारीच राहायला आले. त्याचवेळेस, क्लिफला देखील त्याच शहरात नोकरी मिळाली असल्याने, तो काही महिने माझ्याकडे राहायला आला.
क्लिफ जसा माझ्याकडे राहायला आला, तशी आमच्या परत पूर्वीसारख्या गाठीभेटी सुरु झाल्या.२००७ च्या शेवटला तर, जेम्स आणि जेनेट एकत्र, लंडन इथे महिनाभर फिरायला देखील गेले होते. लंडनवरून परतल्यावर मात्र, त्यांचे जमत नाही, मतभेद वाढले अशा कुरबुरी कानावर यायला लागल्या, एक दोनदा तर, चक्क माझ्यासमोर, क्लिफसमवेत भांडणे झाली!! वास्तविक ते एकत्र रहात होते आणि या गोष्टीला आता तीन वर्षे होऊन गेली होती.मी, माझ्या परीने समजावण्याचा प्रयत्न केला पण अखेर पालथ्या घड्यावर पाणी, असला प्रकार झाला. शेवटी, विभक्त होणे काही टळले नाही!! या गोष्टीचेही मला काही फारसे वाईट वाटले नाही, कारण इथे असेच बहुतेकवेळा चालते, ओळख असते, तेंव्हा ते जीवश्च कंठश्च मित्र असतात पण,तरीही प्रत्येकाचे व्यवहार संपूर्ण वेगळे असतात. अगदी, लग्नाशिवाय एकाच घरात रहात असले तरी, घरातील प्रत्येक गोष्टीवरील हक्क हा वैय्यक्तिक असतो. आपल्या सारखे सामायिक सामंजस्य तिथे अभावानेच आढळते. अगदी, लग्न होऊन २५,३० वर्षे झाली तरीही, एखाद्या कडाक्याच्या वादाप्रसंगी, बायको नवऱ्याला किंवा, नवरा बायकोला, लगोलग घराबाहेर काढतात!!
कितीही मैत्रीचा आव आणला तरी प्रत्येक नाते हे व्यावहारिक पातळीवरच असते. त्यातूनच “लिव्ह आणि रिलेशनशिप” असले नवे नातेसंबंध सुरु झाले. मानसिक गुंतवणूक ही नेहमीच व्यावहारिक पातळींवर होत असते आणि त्यामुळे मानसिक स्थैर्य ही बाबच जणू विस्मरणात गेली.
अर्थात, असेच सगळीकडे असते, असे नव्हे. नियमाला अपवाद अशी काही जोडपी भेटतात पण तो अपवादच, नियम सिद्ध करण्यापुरता!! समाजात मोकळेपणा असल्याने, ओळख व्हायला आणि त्याचे डेटिंगमध्ये परिवर्तन व्हायला, अजिबात वेळ लागत नाही. आजही, जरी मी भारतात परतलो असलो तरीही, जेनेटशी आणि विशेषत: क्लिफशी मेलवरून संपर्क आहे. जेंव्हा, ते दोघे वेगळे झाले, तेंव्हा, जरी वरवर जेनेट आनंदी आहे असे दाखवत असली तरी आतल्या आत, ती खंतावत होती, हे निश्चित. त्यानंतर, त्यांच्या घरी मी ख्रिसमस पार्टीला गेलो तरी, ती पूर्वीची खेळकर जेनेट मला कधीच दिसली नाही.
मला, यावरून नेहमी एक प्रश्न पडतो की, हे असले तकलादू नाते निर्माण करून, काय साधतात? आज, आपल्या समाजात देखील हळूहळू अशीच “लिव्ह आणि रिलेशनशिप” पसरत चाललेली आहे. म्हटले तर त्यात वरवर पहाता, काहीच गैर नाही पण, जर का एकमेकांचे फाटले तर मात्र अनेक प्रश्न उभे राहतात. आज, जशी जेनेट मनाची उभारीच हरवून बसली आहे आणि लग्न या विषयावर बोलायचेच बंद झाली आहे, त्यातून होणारा मानसिक कोंडमारा अतिशय त्रासदायक ठरू शकतो. साध्या ती अजूनही तरुण आहे – सध्याचे तिचे वय २८!! त्यामुळे, आला दिवस कसाबसा धकवून नेते, त्यातून तिने हातात असलेली नोकरी घालवून बसल्याने, दिवस तिच्या अंगावर येतो.
इथे मी हा एकाच प्रश्न उपस्थित केला आहे पण या विषयाच्या अनुषंगाने अनेक चिचार मनात येतात. स्त्री-पुरुष यांचे संबंध केवळ याच प्रकारे संबोधले जावेत का? आणि जर होकारार्थी उत्तर असेल तर कितपत संयुक्तिक आहे? आपल्याकडे मानसिक चलनवलनाला बरेच महत्व दिले जाते पण तरीही व्यावहारिक दृष्टीने मानसिक वृत्ती कितपत महत्वाची? हा प्रश्न या अनुरोधाने उपस्थित होतो. जेनेट हे केवळ प्रातिनिधिक उदाहरण झाले पण, अशी अनेक उदाहरणे केवळ परदेशातच नव्हे तर आपल्या समाजात सापडू शकतात. आता याच जेनेटच्या संदर्भात विचार करायचा झाल्यास, ते दोघे साधारणपणे चार वर्षे तरी एकत्र होते, त्यातून फाटण्यापूर्वी कमीतकमी दोन वर्षे एकाच घरात रहात होते, तेंव्हा शारीरिक संबंध आला नसणार का? नक्कीच आला असणार पण आता विचार करायचा झाल्यास, शारीरिक संबंध केवळ गरज म्हणून निर्माण झाले का?
मानसिक वृत्ती त्याला कारणीभूत नव्हत्या का? आणि महत्वाचा प्रश्न असा की, हेच स्त्री-पुरुष यांच्या संबंधाचे आधुनिक रूप आहे का? हल्ली, नोकरीच्या निमित्ताने म्हणा किंवा एकूणच सामाजिक कार्यक्रम वा तत्सम गोष्टीतून स्त्री-पुरुष एकत्र येतच असतात. एकत्र येणे हे जर आधुनिकतेचे फलस्वरूप मानले तर, त्या संबंधाची इतिश्री अशाच हताशतेत व्हावी, हे कितपत संयुक्तिक ठरते? स्त्री आणि पुरुष हे निर्सगत: वेगळे आहेत, हे जर मान्य केले तर, त्यांच्या मनोवृत्ती, विचार करण्याची पद्धत यात तरतमभाव सहजपणे निर्माण होणार!!
अर्थात, प्रत्येक वेळेस, स्त्री-पुरुष नाते हे शारीरिक संबंधातच आविष्कृत होते, असे माझे म्हणणे नाही. आज, आपल्या नेहमीच्या जगण्यात, असे कितीतरी नातेसंबंध फक्त, मानसिक गरजेतून निर्माण झालेले दिसतात. म्हणजे, शारीरिक संबंध, ही या नात्याची एकमेव अट नव्हे!! हल्लीच्या धकाधकीच्या आणि स्पर्धात्मक जगात, स्त्री आणि पुरुष एकत्र येणे, ही स्वाभाविक प्रक्रिया आहे. प्रत्येक वेळेस, केवळ संशयाच्या नजरेतून अशा नात्याकडे बघणे, केंव्हाही चुकीचेच ठरते. आपले मन तितके मोकळे असणे गरजेचे आहे. असेही कितीतरी वेळा घडू शकते की, ज्या गोष्टी आपण नवऱ्यासमवेत किंवा प्रियकरासमावेत उघडपणे बोलू शकत नाही(असे का व्हावे हा वेगळा प्रश्न!!) ते विषय मित्राबरोबर अतिशय सहजपणे बोलू शकतो, किंबहुना हेच अटळ असू शकते पण इथेच विश्वासाचा प्रश्न उभा राहतो.
इथे केवळ पुरुषालाच दोष देणे चुकीचे आहे, माझ्या माहितीत स्त्रियादेखील तितक्याच महत्वाच्या आहेत. हल्ली काय होते की, अशा संबंधात जरा कुठे बोभाटा झाला की, लगेच स्त्री “अबला” आणि पुरुष “काळ्या” रंगात रंगविला जातो. खरेच अशी परिस्थिती आहे का? आधुनिक जगात अशी वर्गवारी, माझ्या मते फार चुकीची आहे. या प्रश्नाला अनेक बाजू आहेत आणि अनेक दृष्टीकोनातून, हा विषय मांडता येऊ शकतो. जसे, स्त्रीला पुरुषाची गरज असते त्याचप्रमाणे पुरुषाला स्त्रीचीदेखील गरज असते, आणि ती केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक गरज देखील असू शकते.
आपले मन, आपण किती व्यापक ठेऊ शकतो, हाच खरा प्रश्न आहे. वरील उदाहरण जर का प्रातिनिधिक म्हणून मानले तर, केवळ जेनेटची चूक असेल, हे मानणे जितके चूक आहे तितकेच जेम्सची चूक आहे, हे देखील मानणे चूक ठरते. मानसिक सामंजस्य अखेर महत्वाचे ठरते आणि तिथेच आपण फार कमी पडतो. प्रत्येक वेळेस, आपला (नको तितका!!) अभिमान हरघडी आड येत असतो आणि आपण, नको तिथे आपली मते ताठरपणे दुसऱ्यावर लादत असतो. तडजोड तर आवश्यक ठरतेच पण प्रसंगी आपल्या मतांना तिलांजली देणे आवश्यक ठरते. प्रत्येक वेळेस, केवळ स्त्री असणे हेच सगळ्या दोषाला कारणीभूत आहे, असे मानणे अर्धवट ठरते तसेच पुरुष आगाऊ असतो हे मानणे देखील तितकेच अर्धवट ठरते.
अजून, आपला समाज (दुर्दैवाने!!) अजूनही पुढारलेला नाही (याचा अर्थ असा नव्हे की पाश्चात्य समाज आधुनिक आहे!! तिथेही वेगळे प्रश्न उभे आहेतच!!) अजूनही, आपल्या समाजावर जुन्या संस्कृतीचे कांबळ पसरलेले आहे. या विधानाला कुणीही बुर्झ्वा मनोवृत्ती म्हणू शकेल. पण, बहुतेकवेळा प्रत्यक्षात हेच सत्य आहे, हे तठस्थपणे विचार केला तर ध्यानात येईल. खरतर हा प्रश्न सामाजिक तत्वज्ञानी लोकांनी सोडवायला हवा. अर्थात, हे काही इतके सोपे उत्तर नाही. जिथे प्रत्येक व्यक्ती ही स्वत:चे सार्वभौम व्यक्तित्व घेऊन जगत असते, तिथे अशी ढोबळ वर्गवारी योग्य नव्हे. असा प्रश्न केवळ एक लेखातून सुटणे निरतिशय कठीण आहे. पण, म्हणून हा प्रश्न चर्चिला जाऊ नये, असे मानणे देखील चुकीचे ठरते.
– अनिल गोविलकर