खुप दिवसातुन गावाला दोन तीन दिवस राहण्याचा योग आला होता. सकाळी अंघोळ झाल्यावर चहा घेत असतानाच मित्र काशिनाथ आला.त्याला चहा दिला.चहा पित असतानाच तो म्हणाला.आज काय काम आहे का तुला?काम नसेल तर चल रानात जाऊया..मध कुठे भेटते का पाहू…रानात हे शब्द उच्चारताच मी लगेचच होकार दिला.माझ्याकडे पाण्याची कापडी पिशवी आहे त्यामध्ये पाणी थंड राहते.मी ती घेऊन येतो.असे म्हणून तो घरी गेला.तो पर्यत मी भाजी चपाती खाल्ली.थोड्याच वेळात तो आलाच..त्याच्या कमरेला आकडी व कोयता पहाताच मला लहानपणाच्या आठवणी जागृत झाल्या.प्रत्येकाच्या घरी आकडी व कोयता असायचाच.आकडी म्हणजे एक चामड्याचा पट्टा असुन तो दोन्ही बाजूनी निमुळता असतो.त्याच्या मधोमध कोयता आडकवण्यासाठी लाकडी घोड्याच्या मुंडक्याचा आकार असलेला आकडा असतो.चामडी पट्याच्या एका टोकाला चामडी गुंडी व दुसऱ्या बाजुला गुंडी अडकवण्यासाठी चामड्याचीच काजी असते.( शर्टाचे बटन लावतात तसे ) तर प्रत्येकाच्या घरी असणारी आकडी आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.एवढयात आकडी पुराणातुन काशिनाथने “चल निघायचे ना”? या शब्दाने जागे केले.
चला निघुया…असे म्हणुन आम्ही जंगलाच्या दिशेने रवाना झालो.जाता जाता अजुन एक बालमित्र आम्हाला येऊन मिळाला..इतक्या वर्षातुन जंगलातील त्या पायवाटेने जाताना काल परवाच या वाटेने गेलो आहे असा भास झाला. लहान पणाच्या आठवणी एकदमच ताज्या झाल्या.. संपुर्ण बालपण एका क्षणात तरूळून गेले.संपुर्ण रानावनातील पायवाटा अजुनही जशाच्या तशा आठवतात.रानातील प्रत्येक भागाला नावे असत.त्यापैकी वानवळा दाखल काही… खतारी, हारहार गोट्या, आघाडी, मोरंटाक, देवकडा, देवमाची, तुरूकमाची, गाठ्या, कोटम, आसानमाची, भातलवान, खरबाचा माळ, काचळाचा माळ, धोधानी, माल्याचा कपरा, धवलीचा दरा, धोकटी, टिवई, मटमाळ, हेलग्याचंडोकं, आसानदरा, घुडीदांड, आ ड, कोल्हया, आंघोळीचा डोह, कळाममिहीर,पिपाळडहाळ, वाक्षपत,शिंबारटाक, नावठिके, वडाचीवाडी, गव्हाळी, बेडखिंड, चिखाळी, आरतीचा मोढा, सावताची माची अशी अनेक ठिकाणाला अनेक नावे..रानातल्या प्रत्येक आंब्याला नावे असत..प्रत्येक आंब्याची एक वेगळीच चव वेगळीच खासीयत असायची.काळ्या आंबा,शिप्याआंबा,मोकाशा.आरती.केसम्या,वरावट्या,गाडग्या,गोड्याआंबा,कोयती,अशी कितीतरी नावे सांगा येतील.
या आंब्यांची चव अजुनही कित्येकांच्या स्मरणात असेल.लहानपणी हे आंबे पाडाला लागल्यावर आम्ही या आंब्यांच्या अजुबाजूला अढी घालायचो.अढी म्हणजे जमीनीत खड्डा खोदुन त्यामध्ये थोडा पालापाचोळा टाकायचा.त्यावर आंबे ठेवायचे.परत त्यावर पालापाचोळा मग परत त्यावर आंबे अशा प्रकारचे तीन चार थर लावले जात.हे सर्व झाल्यावर माती टाकून एक सारखे करून खुणेसाठी छोटा दगड ठेवायचा.पाच सहा दिवसानी जाऊन अढी उकरायची.एव्हाना आंबे पिकून मस्त सुगंध दरवळायचा.तेथेच बसुन एकाएका आंब्याचा स्वाद घ्यायचा.प्रत्येकालाच आंब्यावर जाता यायचे नाही.काही आंबे चढायला अवघड असायचे.आंब्याच्या उंच शेंड्यामध्ये पिवळेधमक पाड असायचे.मग काय..प्रत्येक जन दगड गोळा करायचा..आणि पाडाच्या दिशेने दगड मारले जायचे..ज्याच्या दगडाने आंबा पडेल त्याचा पाड हे समीकरण असायचे.कधीकधी मीच आंबा पाडला म्हणून दोन जनांमध्ये भांडणे व्हायची.पमारामारी व्हायची.परंतू थोड्याच वेळाने पुन्हा गोडी व्हायची.ज्याला आंबे मिळाले नाहीत त्याला प्रत्येकजण दोन तीन आंबे द्यायचा.खुपच आंबे मिळाले तर शर्ट काढून त्यामध्ये आंबे घरी आणायचे.पहाटेच्या थंडगार वा-याच्या झुळकेने प्रत्येक आंब्याखाली टपाटप आंब्याचे पाड पडायचे.अगदी अजाडताच आम्ही पिशवी घेऊन पाडाचे आंबे गोळा करायला जायचो.दररोज पाच पन्नास आंबे सहज मिळायचे.
अशाच आठवणीमध्ये रानातुन जात होतो. मध्येच एखादा ससा आम्हाला पाहिल्यावर वायू वेगाने पळताना दिसे.ठिकठिकाणी वनविभागाने लहान मोठी तळी खोदलेली आहेत.एका मोठ्या तळ्यात कातक-यांची तीन चार पोरं मासे पकडताना दिसली.काशिनाथने दम दिल्यावर बिचारी तळ्यातुन बाहे निघाली..तेव्हा मी म्हणालो अरे पकडा मासे..चालुद्या तुमचे काम..परंतू शंका मनात असल्याने ती तळ्याच्या पाळीवरच उभी राहीली.आम्ही खुप पुढे आल्यावर परत तळ्यात शिरली..जाताना प्रत्येक परिसर पाहिल्यावर अनेक आठवणी मेंदुच्या गाठोड्यातुन बाहेर येत होत्या…अरे येथे तर आपण पोते घेऊन जनावरांचे वाळलेले शेण गोळा करायचो….येथे आपण गुरे सांभाळायचो..येथल्या या झाडाखाली पाच सात मित्र भारूड (नाटक) करायचो..येथे आपण क्रिकेट,विटीदांडू,गोट्या खेळायचो,खेकडे पकडायचो,सरपण गोळा करायचो..
रानातुन जात असताना काशिनाथची सावध नजर प्रत्येक झाडावर मधमाशाचे पोळे (मोहळ) आहे का हे शोधत होती.एव्हाना एक दोन मोहळे त्यांनी पाहीली होती.पण ती अतीशय लहान असल्यामुळे त्याने दुर्लक्ष केले.असेच पुढे पुढे जात असताना एक गर्द पाने असलेल्या आंब्यावर मोहळ असेल या शक्यतेने त्याने निरखुन पाहिले….आणि त्याच्या मनासारखे झाले..आंब्यावर बरेच मोठे मोहळ होते…लगेच झाडावर सरसर चढत तो झाडावार गेला…आणि अगदी पाच दहा मिनिटात मधाचे पोळे घेऊन खाली आला.अगदी एकही मधमाशी न चावता त्याने मोहळ काढले होते..दुसऱ्या मित्राने तो पर्यंत चांद्याची पाने आणली होती.(चांदा हे एक झाड आहे.पुर्वी लग्नकार्य,पुजा ईत्यादीची जेवणे या चांद्याच्या पानावर चार पाच पाने लावुन पत्रावळी म्हणुन करत असत.) चांद्याच्या पानावर मध खाल्ली..थोडावेळ गप्पा टप्पा झाल्या.आणि आम्ही रानातील जे सर्वात चांगल्या चवीचे आंबे होते त्या आंब्याकडे जायला निघालो.प्रत्येक आंब्याखाली गेल्यावर अनेक आठवणी दाटून आल्या.प्रत्येक आंबा,प्रत्येक ठराविक ठिकाण जणू मला विचारत होते…अरे काय रामदास कसे काय..बरं आहे ना..? लहानपणीआमच्या आंगाखांद्यावर खेळलास..दररोज न चुकता यायचास…आता पुर्ण विसरलास होय रे आम्हाला..इतकी माया पतळ झाली कारे.?..आम्ही तुला नेहमी आनंद दिला..आमची एकमेव इच्छा तु आम्हाला नेहमी भेटावेस..आमच्या आंगाखांद्यावर खेळावे…पण तु गेला मायावी दुनियेत…काय मिळाले तुला तेथे? तुलाच माहीत.येत जा अधुन मधून..बरं वाटतं. असा उगाचच भास झाला…नव्हे अगदी खरं होतं.
पुर्वी प्रमाणे आंब्याच्या शेंड्यामधील गुल्लर ( पिवळेधम्मकआंबे)दगडाने पाडायची इच्छा झाली.प्रयत्न करून पाहीला.दगड शेंड्यापर्यंत गेलाच नाही.हाताला एक प्रचंड कळ आली.वेदना जाणवू लागली.आणि हा प्रयत्न बंद झाला.काशिनाथ झाडावर गेला व प्रत्येक फांदी हालवू लागला.त्या हेलकाव्यामुळे पाड खाली पडू लागले.आम्ही एका ठिकाणी ढिग केला..पुर्वी प्रमाणेच आंब्यांची चव चाखायला मिळाली.अगदी पुर्वी सारखीच जशीच्या तशी..काहीच बदल नाही..मन अगदी तृप्त झाले.
आंबे खाऊन झाल्यावर कापडी पिशवीतील थंडगार पाणी प्यायलो.आणि आःब्याच्या झाडाखालीच रेंगाळलो.गार वा-याच्या झुळकेने केव्हा डुलकी लागली कळलेच नाही.
कुणाच्या तरी बडबडीने जाग आली ..दुपार झाली होती..पहातो तर शेजारील गावचे पाच सात जण थोड्या अंतरावर दिसले.आम्ही सर्वजण उठलो.जाऊन पहातो तर तेथे त्यांच्या शेतात रूढी परंपरेने दरवर्षी त्यांच्या देवाला बोकड देण्याचा कार्यक्रम होता.पुर्वी ते आम्हा सगळ्यांना जेवणाचे आमंत्रण द्यायचे.व आम्हीही नचुकता हजर असायचो.आम्हाला पाहुन त्यांना खुप आनंद झाला.आता जेवल्याशिवाय तुम्हाला जाऊ दिले जाणार नाही.असा गोड दम दिला..अगदी नाईलाज झाला…ठिक आहे.तो पर्यत आम्ही रानात फिरून येतो..असे म्हणून आम्ही रानात नुसतेच फिरत राहीलो..एका ठिकाणी एक कोलारू घर दिसले..आम्ही तिकडे गेलो..अंगणात मांडवाखाली एक म्हातारा घोंगडीवर बसुन टोपले विनत होता..बाजुलाच बांबुच्या काड्या पडल्या होत्या..त्याच्या डोक्याचा पटका व अंगातील बंडी पाहुन अजुन जुन्या आठवणी चाळवल्या.आम्हाला बघुन त्याने रामराम केला..या कुठलं पाव्हणं म्हणायचं..ओळख सांगीतल्यावर त्यांच्या डोळ्यात आश्रू तरळले..तेथूनच म्हातारीला आवाज दिला..आगं पाणी घेऊन ये..पाहुणे आलेत..कपाळाला भले मोठे कुंकू..नाकात बांगडीच्या आकाराची सोन्याची नथ.अंगात चोळी.मांडवकर लुगडे असलेली म्हातारी पाण्याचे तांबे भरून घेऊन आली..पाणी पिल्यावर म्हतारा म्हणाला अगंओळखलेस का ? याला..म्हतारीची नजर कमी झाली होती.ती अगदी निरखुन पाहु लागली….म्हातारा..अगं ..हा मास्तरचा रामदास हाये..आग बाय..तु सखुचा रामदास..केवढा मोठा झालास असे म्हणुन माझे मुके घेऊ लागली…फार पुर्वी मी जेव्हा लहान होतो तेव्हा ती आम्हाला दररोज एक लिटरभर दुध द्यायची..हरभरे,मसुरा,उडिद द्यायची..प्रत्येक कार्यक्रम असल्यावर मी त्यांच्याकडे जेवायला जायचो.वडिल त्यांना वेळोवेळी अर्थीक मदत करायचे.त्यांची मुले माझ्या वडिलांच्या हाताखाली शिकली..आता एक मंत्रालयात तर एजजण शिक्षक आहे…त्यामुळे आमचे एक घनिष्ट नाते होते.वडील गेल्यावर आईला आधार म्हणून ती आमच्या घरी पंधरा दिवस राहीली होती.आम्हाला प्रचंड आधार देण्याचे काम तेव्हा तिने केले होते.मला देखील खुप गहिवरल्या सारखे झाले..तिच्या पदरात डोके खुपसुन मन मोकळे करावेसे वाटले..
इथे काय करता…जायचे लेकांकडे शहरात मी म्हणालो..
न्हाय बा..जो पर्यंत हातपाय हालतात तो पर्यंत या मातीचीच शेवा करणार..हीथच मरणारं..मी पांडुरंगाला रोज म्हणतुय पांडुरंगा मरण आले तर इथेच येउदे याच मातीत…बाकी कुठ जायची इच्छा नाही..अपेक्षा नाही..बास इतकचं.
नकोनको म्हणताना म्हातारीने दुध व गुळ घालून शेवाया बनवल्या..खुप वर्षांनी स्टीलच्या पितळीत वाफाळलेल्या शेवाया खाताना अजूनच आठवणी चाळवल्या.अगदी पुर्वीचीच चव,तसेच प्रेम माझ्या भाग्याला आले होते.थोडावेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या माझ्या आईच्या आठवणीने म्हतारीच्या डोळ्यांच्या कडा पानावल्या.अरे पोरा येत जा.अधुन मधुन..या जीवनात हाये काय ? आज हाये अन उद्या न्हाय…एकमेकांशी चांगल राहणे,वागणे.आन बोलणे बाकी सर्व फुकाट हाये….या वाक्यात म्हतारीने जागतीक दर्जाचे तत्वज्ञान सांगीतले.जे कोणत्याच शाळेत,शिकवले नाही…परत यायच्या बोलीवर आम्ही जड अंतकरणाने आम्ही तेथुन निघालो ते तडक जेवण बनवणा-या माणसांकडे..एव्हाना सर्व विधी उरकत आला होता.सुर्य मावळतीकडे जाउन बराच वेळ झाला होता..तो पर्यत इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू होत्या.एकेक करून बरेच लोक जमा झाले होते.प्रत्येकाच्या हातात पितळी किंवा ताट होते.काहीजण येत होते.सर्व विधी झाल्यावार जेवणाच्या पंगती बसल्या आम्हालाही ताटे दिली..भात वाढला.त्यावर रस्सा..जेवण सुरू झाले.आग्रह करून वाढण्यात आले..जेवण झाल्यावर आम्ही घरी जाण्यासाठी निघालो.तो पर्यंत मिट्ट काळोख झाला होता.आम्ही मोबाइलच्या उजेडात घराकडे चाललो होतो.परंतु पायवाटा अजुनही जशा तेव्हा होत्या तशाच आजही तशाचओळखीच्या भासत होत्या..
— लेखक -श्री रामदास तळपे (मंदोशी)
ग्रामीण संस्कृती…..
खूप खूप सुंदर रेखाटले रानातील अनुभव !