वपु काळे यांच्या एका पुस्तकातील हा उतारा. वाचा आणि विचार करा..
“आपण हा जो जन्म घेतला आहे, तो अपेक्षापूर्तींसाठी नाही. आपल्या दुस-यांकडूनच अपेक्षा असतात, असं नाही. आपल्या स्वत:कडूनही अपेक्षा असतात. त्या पूर्ण होत नाहीत. उरतात फक्त जाळणा-या व्यथा. माझ्या मते हा जन्म अपेक्षापूर्तींसाठी नाही. हा जन्म परतफेडीसाठी आहे.
तुमच्या सौभाग्यवती गेल्या. तुम्ही त्यांचा संसार पूर्ण करण्यासाठी हा जन्म घेतलात. ह्याचा अर्थ, कोणत्या तरी जन्माची एक परतफेड झाली. तो अकाऊंट संपला.
ह्याच दृष्टीकोनातून सगळ्या लहान-मोठ्या घटनांकडे पाहण्याचा प्रयत्न करा. परतफेडीचा हा हिशेब ह्या जन्मात संपवल्याशिवाय तुम्हाला मरण नाही. तेव्हा मनातल्या मनातसुद्धा परमेश्वराला उद्देशून — मला का जगवलसं ? हा प्रश्न विचारु नका. कोणतीही व्यक्ती असो, तुमच्याशी विचित्र वागली, तिने तुमचा अपमान केला, दुर्लक्ष केलं, तुमच्या उपकाराचं कुणाला विस्मरण झालं, तर एकेक अकांऊट पूर्ण झाला, असं आजपासून स्वत:ला सांगायला लागा. बॅंकेतली शिल्लक संपली की पासबुकवर ‘अकाऊंट क्लोज्ड’ असा शिक्का मारतात. त्याप्रमाणे आपले किती अकाउंट्स क्लोज्ड झाले ह्याचा विचार करा आणि पासबुकं जाळून टाका.
परतफेडीचा एकही क्षण टाळू नका. प्रारंभी तुम्हाला हे जड जाईल, पण आपलं मन जेवढं बलदंड असतं तेवढंच लवचिकही असतं. त्या मनाला सांगायचं, ‘बाबा रे, आयुष्यभर तुझं ऐकलं, तुझ्या हुकुमात राहिलो. आता ही गुलामी मी सोडून देत आहे. आजपासून मी तुला मुक्त केलय.’ हा प्रयोग करुन बघा, आणि किती खाती फटाफट बंद होतात, ह्याची प्रचिती घ्या. मीसुद्धा उद्या तुम्हाला ओळख दाखवली नाही, तर तुमच्या पासबुकात माझी एकच एन्र्टी होती, असं समजा. परतफेड परतफेड… हाच मंत्र ध्यानात ठेवा.
वसंत पुरुषोत्तम काळे
Leave a Reply