नवीन लेखन...

जानेवारी ०६ : कपिल देव निखंज





भारताचा सर्वश्रेष्ठ अष्टपैलू खेळाडू कपिल देव आज त्रेपन्नाव्या वर्षात पदार्पण करतो आहे (जन्म १९५९, चंडीगढ).

रामलाल निखंज आणि पूर्वाश्रमीच्या राजकुमारी लाजवंती यांच्या सात अपत्यांमधील कपिल हे सहावे अपत्य. रावळपिंडीनजीकच्या एका खेड्यातून फाळणीच्या वेळी रामलालजी चंडीगढला येऊन राहिले होते आणि बांधकाम साहित्य व लाकडे

पुरविण्याचा व्यवसाय ते करीत होते. वयाच्या बाराव्या वर्षी कपिल देशप्रेम आझादांचा चेला बनला.

नोव्हेंबर १९७५ मध्ये कपिल सर्वप्रथम हरयाणासाठी खेळला आणि सहा बळी मिळवले. त्या हंगामात ३ सामन्यांमधून १२ बळी त्याने मिळवले. १९७६-७७ च्या हंगामात जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात त्याने एकूण ३६ धावा देत ८ बळी घेतले. हा सामना हरयाणाने जिंकला. नंतरच्या साखळी सामन्यांमधून कपिलची कामगिरी यथातथाच राहिली असली तरी उप-उप-उपांत्य फेरीच्या सामन्यात बंगालविरुद्ध त्याने दुसर्‍या डावात केवळ नऊ षटके गोलंदाजी करताना २० धावा देत तब्बल ७ गडी बाद केले. उप-उपांत्या सामन्यात हरयाणाची गाठ मुंबईशी पडली आणि हरयाणाने लढत गमावली असली तरी कपिलदेवने सार्‍या देशाचे लक्ष वेधून घेतले.

१९७८-७९ च्या हंगामात इराणी चषकाच्या सामन्यात आठव्या क्रमांकावर फलंदाजीस येऊन कपिलने ६२ धावा काढल्या. दुलीप चषकाच्या अंतिम सामन्यातील सात बळीनी त्याला उत्तर विभागाच्या संघात प्रवेश मिळवून दिला आणि याच हंगामात कपिल पहिली कसोटी खेळला – पाकिस्तानविरुद्ध.

१९७९-८० च्या हंगामात दिल्लीविरुद्ध १९३ धावांची खेळी हे त्याचे पहिले प्रथमश्रेणी शतक. या हंगामात तो हरयाणाचा कर्णधार होता आणि त्याच्या संघाने अतिम फेरीपर्यंत मजल मारली होती.

१९९०-९१ च्या रणजी करंडकाचा अंतिम सामना कपिलने (आणि हरयाणानेही) गाजवला. संजय मांजरेकर, विनोद कांबळी, सचिन तेंडुलकर, दिलीप वेंगसरकर, चंद्रकांत पंडित, सलील अंकोला, अ‍ॅबी कुरुविला अशा दिग्गजांचा समावेश असलेल्या मुंबई संघाला हरयाणाने पराभूत केले. हरयाणाच्या संघातील काही

खेळाडू होते : दीपक शर्मा, अजय जडेजा, चेतन शर्मा, विजय यादव.

मिळालेल्या शिकारींकडे पाहिल्यास कपिल त्याच्या पहिल्यावहिल्या कसोटी मालिकेत फारसा यशस्वी ठरला असा निष्कर्ष काढता येणार नाही पण त्याच्या बाऊन्सर्सची दहशत पाक फलंदाजांनी घेतली होती आणि त्याचा फायदा इतर गोलंदाजांना नक्कीच मिळाला होता. सादिक मोहम्मदला त्याने एका बहिर्डुल्यावर टिपले होते. मालिकेतील तिसर्‍या सामन्यात कराचीच्या नॅशनल स्टेडिअमवर त्याने अवघ्या ३३ चेंडूंमध्ये अर्धशतक केले होते. भारतीयाचे कसोट्यांमधील हे पहिले अर्धशतक.

मग कपिलने एक पंचांकडे फलंदाज बाद असल्याचा आग्रह धरण्यासाठीचा अपवाद वगळता, कारकिर्दीत केव्हाही मागे वळून पाहिले नाही. दिल्लीच्या फिरोजशहा कोटलावर त्याचे पहिले कसोटी शतक आले, अवघ्या १३० चेंडूंमध्ये.

१९८२-८३ च्या हंगामात गावसकरला विश्रांती देण्यात आल्याने कपिलवर कर्णधारपदाची जबाबदारी टाकण्यात आली. वेस्ट इंडीज दौर्‍यापासून तो नियमित कर्णधार बनला आणि त्या दौर्‍यावर त्याच्या संघाची सर्वात मोठी कामगिरी म्हणजे वेस्ट इंडीजला एका एकदिवसीय सामन्यात हरविणे! गावसकरने या सामन्यात ९० तर कपिलने ७२ धावा केल्या होत्या आणि ४७ षटकांमध्ये २८२ धावा करून भारतीयांनी त्या राखल्या होत्या.

१९८३ च्या विश्वचषकातील अजिंक्यपद हा कपिलच्या कारकिर्दीचा कळसाध्याय होता.

— डॉ. आनंद बोबडे

Avatar
About डॉ. आनंद बोबडे 232 Articles
सोलापूर येथील डॉ. वैशम्पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस. क्रिकेटमधील विक्रम, मराठी-इंग्रजी शब्दकोडी, साहित्य व साहित्यिकांवरील लेख, महफिल-ए-ग़ज़ल हे सदर सोलापरच्या दैनिक संचार मध्ये गाजले. "जागत्या स्वप्नाचा प्रवास - सचिन तेंडुलकर १९८९ ते २०१०..." हे सचिनच्या कामगिरीचा सर्वांगीण आढावा घेणारे पुस्तक (पूजा प्रकाशन, ठाणे).

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..