प्रोटिअन अपडेट
केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर मालिकेतील अखेरच्या कसोटीचा पाचवा दिवस दुर्दैवाने मालिकेत जसा खेळ झाला तसा नव्हता. १-१ हा निकाल दोन्ही संघांना न्याय देणारा असला तरी दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याची कामगिरी अजूनही भारतीय संघाला करता आलेली नाही ही खंत ‘कायम’ राहणार आहे. कायमला अवतरणे लावण्याचे कारण एवढेच की, पुन्हा दक्षिण आफ्रिकेचा दौरा भारतीय संघ करेल तेव्हा संघात राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, वांगीपुरापू लक्ष्मण असतीलच अशी खात्री देता येत नाही आणि म्हणून कुठल्याही विजयाची हमीही देता येत नाही.
राहुल द्रविडने आता निवृत्तीनंतर काय करावे याचा विचार सुरू करण्यास हरकत नाही. इतर कशाहीपेक्षा त्याची देहबोली आता पूर्वीसारखी राहिलेली नाही. त्याच्या डोळ्यांमधून आणि हालचालींमधून आता डिपेन्डेबलचा भरोसा जाणवत नाही. लक्ष्मण मात्र अजूनही कोलकात्यात २७१ केल्या तेव्हा जसा होता तसाच वाटतो.
जॅक कॅलिस हा आमचा सर्वात आवडता खेळाडू. कसोटीवीर आणि मालिकावीर म्हणून तो आता गाजला आहे पण एक बरगडी दुखावलेली असतानाही पेनकिलर्स घेऊन जो किलिंग अॅटिट्यूड त्याने दुसर्या डावात दाखवला तेवढ्यामुळेच ही कसोटी अनिर्णित राहिलेली आहे. “जॅक कॅलिस हा कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांच्या आजवरच्या इतिहासातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू आहे” हे विधान प्रश्नांकित करू पाहणार्या कुणाशीही भिडण्याची आमची तयारी आहे.
६ जानेवारी १९५६ रोजी मद्रासच्या कॉर्पोरेशन स्टेडिअमवर भारत वि. न्यूझीलंड (मालिकेतील पाचवी) कसोटी सुरू झाली होती. पहिला दिवस विनू मंकड-पंकज रॉय या सलामीच्या जोडीने गाजवला. दिवसभर खेळून या दोघांनी २३४ धावा फलकावर लावल्या आणि दिवस-अखेर नाबाद म्हणून ते तंबूत परतले.
दुसर्या दिवशी त्यांनी पुन्हा कालचाच पाढा सुरू क ला आणि अखेर वैयक्तिक १७३ धावांवर पंकज रॉय त्रिफळाबाद झाले. भारत १ बाद ४१३. कसोटिहासातील त्या
वेळची पहिल्या जोडीसाठीची ही सर्वोच्च भागीदारी होती आणि आजही हा भारतीय विक्रम आहे. (जागतिक विक्रम आता दक्षिण आफ्रिकेच्या नावावर आहे.) विनू मंकड २३१ धावा काढून बाद झाले – भारतीय फलंदाजाची कसोटीच्या एका डावातील ही सर्वोत्तम कामगिरी होती.
३ बाद ५३७ धावांवर पॉली उम्रीगरांनी भारताचा डाव घोषित केला आणि २०९ व २१९ धावांवर पाहुण्यांचे डाव संपुष्टात आले. सुभाष गुप्ते पहिल्या डावात ७२ धावांमध्ये पाच बळी तर दुसर्या डावात ७३ धावांमध्ये ४ बळी. विनू मंकड दुसर्या डावात ६५ धावांत ४ बळी.
कसोट्यांमधील भागीदारीचे भारतीय विक्रम :
पहिली जोडी – ४१३ धावा. विनू मंकड-पंकज रॉय. न्यूझीलंडविरुद्ध चेन्नईत.
दुसरी जोडी – अखंडित ३४४ धावा. सुनील गावसकर-दिलीप वेंगसरकर. वेस्ट इंडीजविरुद्ध कोलकात्यात.
तिसरी जोडी – ३३६ धावा. वीरेंदर सेहवाग-सचिन तेंडुलकर. पाकिस्तानविरुद्ध मुलतानमध्ये.
चौथी जोडी – ३५३ धावा. सचिन तेंडुलकर-वांवेंसा लक्ष्मण. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनीत.
पाचवी जोडी – ३७६ धावा. वांवेंसा लक्ष्मण-राहुल द्रविड. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोलकात्यात.
सहावी जोडी – अखंडित २९८ धावा. दिलीप वेंगसरकर-रवी शास्त्री. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मुंबईत.
सातवी जोडी – अखंडित २५९ धावा. वांवेंसा लक्ष्मण-महेंद्रसिंग धोनी. द. आफ्रिकेविरुद्ध कोलकात्यात.
आठवी जोडी – १६१ धावा. अझरुद्दीन-अनिल कुंबळे. द. आफ्रिकेविरुद्ध कोलकात्यात.
नववी जोडी – १४९ धावा. नाना जोशी-रमाकांत देसाई. पाकिस्तानविरुद्ध मुंबईत (ब्रेबॉर्न).
दहावी जोडी – १३३ धावा. सचिन तेंडुलकर-जहीर खान. बांग्लादेशविरुद्ध ढाक्यात.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply