४ जानेवारी आणि सचिन तेंडुलकरच्या शतकांचा अनोखा योगायोग फ्लॅशबॅकमध्ये यापूर्वी आलेला आहे. ८ जानेवारी आणि ग्रेग चॅपेलचेही अनुबंध याच गटात मोडणारे आहेत. एक-दोन नव्हे तर तीन वर्षांमध्ये विखुरलेले.
८ जानेवारी १९७३
ऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान. सिडनी कसोटीचा तिसरा दिवस. पाकिस्तान पहिला डाव सर्वबाद ३६०. ग्रेग चॅपेल १८.६-५-६१-५. पाक यष्टीरक्षक वसिम बारी हा ग्रेगचा डावातील तिसरा बळी होता. या तिसर्या शिकारीसोबतच ग्रेग चॅपेलने त्याच्या इथवरच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. यापूर्वीची त्याची सर्वोत्तम कामगिरी होती ५४ धावांमध्ये २ बळी.
अखेर ६१ धावांमध्ये ५ बळी हीच ग्रेगच्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी राहिली.
८ जानेवारी १९७५
ऑस्ट्रेलिया वि. इंग्लंड. सिडनी कसोटीचा चौथा दिवस. ऑस्ट्रेलियाच्या दुसर्या डावात ग्रेग चॅपेलने १६ चौकारांनिशी १४४ धावा तडकावल्या आणि सलामीवीर रेडपाथसोबत दुसर्या गड्यासाठी २३० धावांची भागीदारी केली. पहिल्या डावात ग्रेगने ८४ धावा केलेल्या होत्या.
चौथ्या डावात ४०० धावा काढणे इंग्लंडला जमले नाही. १७१ धावांनी ते पराभूत झाले.
८ जानेवारी १९८१
सिडनी मैदानावरील बेन्सन-हेजेस विश्वमालिकेतील भारत-ऑस्ट्रेलिया सामना. कर्णधार ग्रेग चॅपेलने नाणेकौल जिंकून भारतीयांना फलंदाजीसाठी आमंत्रित केले. अवघ्या ६३ धावांमध्ये भारतीयांचा खुर्दा उडाला. ग्रेग चॅपेलने ५ निर्धाव षटकांसह पाच बळी मिळवले, अवघ्या १५ धावा देऊन.
मान्यताप्राप्त एकदिवसीय सामन्यांमधील त्याची याआधीची सर्वोत्तम गोलंदाजी होती : २० धावांमध्ये पाच बळी.
आयपीएल ऑक्शन
बंगळुरूमध्ये आज आणि उद्या सकाळी ११ ते संध्याकाळी ६ या वेळेत आयपीएलच्या चौथ्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव होणार आहे. कोची आणि पुणे या संघांसह आता या स्पर्धेत एकूण १० संघ असणार आहेत. प्रत्येक संघ जास्तीत जास्त ३० खेळाडूंना करारबद्ध करू शकतो (जास्तीत जास्त १० परदेशी खेळाडू). ९० लाख डॉलरहून अधिक रक्कम कोणत्याही संघाला खर्च करता येणार नाही.
लिलावापूर्वी आधीच्या आठ संघांना आपापल्या संघातील काही खेळाडू कायम ठेवण्याची संधी देण्यात आलेली होती. त्यामुळे सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी यांसारखे खेळाडू या लिलावात बोलीला लावले जाणार नाहीत.
सुमारे ३०० विदेशी खेळाडू आणि ५० भारतीय खेळाडू बोलीला लावले जातील. कमाल १० परदेशी खेळाडू या हिशोबाने केवळ १०० परदेशी खेळाडूच खरीदले जाऊ शकत असल्याने या लिलावात परदेशी खेळाडूंपेक्षा भारतीय खेळाडूंनाच अधिक भाव मिळण्याची शक्यता आहे. अर्थात हे खेळाडू लिलावात कोणत्या क्रमाने बोलीसाठी आणले जातात, त्यावरही खेळाडूंचे भाव अवलंबून असतील.
ग्रेग चॅपेलचे आठ जानेवारीचे पराक्रम आणि आजचा आयपीएल ऑक्शन
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply