९ जानेवारी १९६८
जमैका या कॅरिबिअन द्वीपसमूहातील बेटावर जेम्स क्लाईव्ह अॅडम्स या वेस्ट इंडियन क्रिकेटपटूचा जन्म. हा जिमी अॅडम्स या नावाने अधिक प्रसिद्ध आहे. ब्रायन लारानंतर वेस्ट इंडीजच्या कप्तानीची धुरा त्याच्याकडे आली आणि ती न सांभाळता आल्याने केवळ कर्णधारपदालाच नव्हे तर फलंदाज म्हणून संघातील स्थानालाही जिमीला मुकावे लागले.
डावखुरा फलंदाज, पारंपरिक शैलीचा फिरकीपटू, एक चपळ क्षेत्ररक्षक आणि कामचलाऊ यष्टीरक्षक अशी जिमीची थोडक्यात ओळख.
बार्बडोसमधील ब्रिजटाऊनमध्ये १८ एप्रिल १९९२ रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अॅडम्सचे कसोटीपदार्पण झाले. त्याच्याइतका ‘धावभरीत’ कसोटीप्रारंभ फक्त ब्रॅडमनलाच शक्य झाला होता. केवळ १२ कसोटी सामन्यांनंतर जिमीच्या पोतडीत १,१३२ धावा होत्या; ८७.०८ च्या पारंपरिक सरासरीने.
एकूण चोपन्न कसोट्यांमध्ये जिमी खेळला. पहिल्या सत्तावीस कसोट्यांनंतर त्याची पारंपरिक सरासरी होती ६१.३४ आणि उरलेल्या सत्तावीसमधून अवघी २५.५८. सरासरीमधील इतका प्रचंड फरक इतर कोणत्याही खेळाडूच्या बाबतीत सापडणे मुश्किल आहे. त्याच्या घटत्या सरासरीनुसार वेस्ट इंडीज संघाची कामगिरीही खालावत गेली असे निरीक्षण कुणी मांडल्यास ते चुकीचे ठरवता येणार नाही.
इ. स. २००० मध्ये विंडीजचा कर्णधार म्हणून अॅडम्सची नियुक्ती झाली. पहिल्या दोन मालिकांमध्ये त्याच्या संघाने कसाबसा का होईना विजय मिळवला पण त्यानंतर मात्र ग्रहांचेही ग्रह फिरले. इंग्लंड दौर्यावरील पाच कसोट्यांपैकी एकही जिमीच्या संघाला जिंकता आली नाही. १९६९ नंतर प्रथमच विंडीज संघाने इंग्लंडमधील मालिका गमावली. या पाच पराभवांआधीच्या दोन कसोट्यांमध्येही विंडीजने मार खाल्ला होता. ओळीने सात कसोट्यांमध्ये पराभूत झालेला कसोटिहासातील पहिला कर्णधार जिमी ठरला. त्याची गच्छंती आता अटळ होती आणि ती झालीच.
नंतर दक्षिण आफ्रिकेतील एका प्रांतिक संघाचे कर्णधारपद त्याने सांभाळले आणि अधूनमधून काऊंटी स्पर्धेतही तो दिसला. २००४ मध्ये
त्याने निवृत्ती घेतली.
५४ कसोट्या, ३०१२ धावा, ६ शतके, १४ अर्धशतके, नाबाद २०८ सर्वोच्च, २७ बळी, ४८ झेल.
आजमितीला ओळीने सर्वाधिक कसोट्यांमध्ये पराभूत होण्याचा विक्रम बांग्लादेश संघाच्या नावे आहे. १५ नोव्हेंबर २००१ ते २३ फेब्रुवारी २००४ या कालावधीतील सर्वच्या सर्व २१ कसोट्या (ह्या दोन्ही समाविष्ट, दोन्ही पराभव झिम्बाब्वेविरुद्ध) बांग्लादेशने गमविल्या होत्या.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply