१० जानेवारी १९३० रोजी ब्लॅक कॅप्स या संबोधनाने प्रसिद्ध असणार्या न्यूझीलंड संघाने आपली पहिलीवहिली कसोटी खेळण्यास प्रारंभ केला. सामना होता इंग्लंडविरुद्ध क्राईस्टचर्चच्या लँकॅस्टर पार्कवर. ही कसोटी तीन दिवसांचीच होती. या सामन्यासोबत अधिकृत कसोटी खेळणार्या देशांची संख्या पाच झाली.
न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॉरीने नाणेकौल जिंकला आणि फलंदाजी स्वीकारली. ११२ धावांमध्ये न्यूझीलंडचा पहिला डाव संपुष्टात आला. रॉजर ब्लन्ट नाबाद ४५. डावात सर्वोच्च.
इंग्लंडने पहिल्या डावात १८१ धावा केल्या. दुलीपसिंहजींच्या ४९ धावा डावात सर्वोच्च ठरल्या.
न्यूझीलंड दुसर्या डावात १३१ धावाच काढू शकले आणि अखेर हा सामना इंग्लंडने आठ गडी राखून जिंकला.
कसोट्यांच्या अधिकृत यादीतील ही १८६ वी कसोटी होती.
कसोटीदर्जा मिळविणारे संघ
ऑस्ट्रेलिया-इंग्लंड : १५ मार्च १८७७.
दक्षिण आफ्रिका : १२ मार्च १८८९. मार्च १९७० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने वर्णद्वेषी धोरणामुळे दक्षिण आफ्रिका संघाला निलंबित केले. १० नोव्हेंबर १९९१ पर्यंत हे निलंबन अमलात होते.
वेस्ट इंडीज : २३ जून १९२८.
न्यूझीलंड : १० जानेवारी १९३०.
भारत : २५ जून १९३२ (आताच्या पाकिस्तान आणि बांग्लादेशचा समावेश)
पाकिस्तान : १६ ऑक्टोबर १९५२ (सर्वात लहान वयात कसोटीदर्जा मिळविणारे राष्ट्र)
श्रीलंका : १७ फेब्रुवारी १९८२.
झिम्बाब्वे : १८ ऑक्टोबर १९९२. जून २००४ ते जानेवारी २००५ या काळात झिम्बाब्वेला कसोट्या खेळण्यास मनाई करण्यात आली होती. १८ जानेवारी २००६ पासून पुन्हा अशी बंदी घातली गेली आणि ती अजूनही कायम आहे. झिम्बाब्वेतील अराजकता हे त्यामागचे मुख्य कारण आहे. मे २०११ मध्ये ही बंदी काढून घेतली जाणे अपेक्षित आहे.
बांग्लादेश : १० नोव्हेंबर २०००.
२००३ मध्ये केनियाला लवकरच कसोटीदर्जा दिला जाईल अशी शक्यता निर्माण झाली होती पण तो बुडबुडाच ठरला. आयर्लंड आणि अफगाणिस्तान यांनी आता अशा दर्जासाठी प्रस्ताव दिलेले आहेत आणि आयर्लंड हा कसोटीदर्जा मिळविणारा अकरावा संघ ठरण्याची शक्यता आहे.
जिंकले जास्त, हरले कमी (आजवरच्या कसोट्यांचे निकाल)
ऑस्ट्रेलियाई संघाने जिंकलेल्या कसोट्यांची संख्या सर्वाधिक आहे. ७३० कसोट्यांमधून ३४१ विजय आणि १९२ पराभव.
इंग्लिश संघाने ९०८ कसोट्या खेळलेल्या आहेत. ३२१ विजय आणि २६१ पराभव.
या दोन ‘आद्य’ संघांव्यतिरिक्त दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान या दोन संघांनीच हरलेल्या कसोट्यांची संख्या त्यांनी जिंकलेल्या कसोट्यांहून कमी आहे. पाकिस्तानसाठी हा फरक आठ सामन्यांचा तर प्रोटियांसाठी केवळ एका सामन्याचा आहे.
भारताने गमावलेल्या कसोट्यांची संख्या जिंकलेल्या कसोट्यांपेक्षा तीसने जास्त आहे.
न्यूझीलंडची पहिली कसोटी, कसोटीदर्जा मिळविणारे संघ आणि हरलेल्या कसोट्यांपेक्षा अधिक कसोट्या जिंकणारे संघ.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply