जोहान्सबर्गमध्ये आज भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेबरोबर मालिकेतील दुसर्या एकदिवसीय सामन्यात भिडेल तेव्हा सचिन तेंडुलकरने सनथ जयसुरियाच्या ४४४ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याच्या विश्वविक्रमाची बरोबरी केलेली असेल.सनथ जयसुरिया त्याच्या एदिसा कारकिर्दीत एकूण ४३२ वेळा फलंदाजीसाठी मैदानात उतरला. याबाबतीत सचिन त्याच्या एक डाव पुढे असेल. आजचा फलंदाजीचा डाव हा सचिनचा कारकिर्दीतील ४३३ वा डाव असेल.
रिचर्ड ब्लेकी
१५ जानेवारी १९६७ रोजी यॉर्कशायर परगण्यात डिक या लाडनावाने प्रसिद्ध असलेल्या रिचर्ड जॉन ब्लेकीचा जन्म झाला. अत्यंत चपळ आणि दीर्घकाळ उत्साहाने उभा राहू शकणारा यष्टीरक्षक अशी त्याची ख्याती आहे.ब्लेकीच्या वाट्याला ३ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने आणि २ कसोटी सामने आले. दोन्ही कसोटी सामने तो खेळला भारताविरुद्ध. कसोट्यांमध्ये त्याची निवड मुख्यत्वे त्याच्या फलंदाजीच्या क्षमतेकडे पाहून झाली होती पण त्या खात्यात भरीव योगदान देऊ न शकल्याने त्याला आणखी संधी मिळू शकली नाही. त्याची फलंदाजीतील कारकीर्द अशी राहिली :
पहिली कसोटी : प्रारंभ ११ फेब्रुवारी १९९३, एम चिदंबरम स्टेडिअम, चेन्नई.भारताने आपला पहिला डाव ६ बाद ५६० धावांवर घोषित केला होता. या डावादरम्यान यष्टीरक्षक ब्लेकीने एकही बायची धाव भारताला मिळू दिली नव्हती !पहिला डाव – त्रिफळा वेंकटपथी राजू शून्य (१७ चेंडू)दुसरा डाव – त्रिफळा अनिल कुंबळे सहा (१३ चेंडू)
दुसरी कसोटी : प्रारंभ १९ फेब्रुवारी १९९३, वानखेडे स्टेडिअम, मुंबई.पहिला डाव – पायचित अनिल कुंबळे एक (११ चेंडू)दुसरा डाव – त्रिफळा अनिल कुंबळे शून्य (१ चेंडू).
१९९० च्या दशकात जॅक रसेल आणि अॅलेक स्टेवर्ट हे खंदे रक्षक उपलब्ध असल्याने त्या काळात इंग्लंडच्या संघात यष्टीरक्षक म्हणून जागा मिळवू पाहणे हे पाप ठरे तर अशा खेळाडूने जन्मण्याचा गुन्हा
केला आहे असे म्हणण्यासारखी त्याची अवस्था
असे. ब्लेकी त्यांपैकी एक.१९८५ पासून यॉर्कशायरच्या संघासाठी ब्लेकी यष्टीरक्षण करू लागला. १९८९-९० च्या दौर्यात इंग्लंड अ संघाकडून झिम्बाब्वेविरुद्ध त्याने द्विशतक काढले. १९८७ मध्ये क्रिकेट रायटर्स क्लबचे यंग क्रिकेटर ऑफ द इअर हे पारितोषिक त्याला मिळाले. सुरुवातीच्या जोमानंतर मात्र यष्टीरक्षणाचा प्रभाव त्याच्या फलंदाजीवर पडू लागला आणि त्याला फलंदाजीत खालच्या स्थानावर पाठविण्यात येऊ लागले. तरीही २००० पर्यंत यॉर्कशायर क्रिकेटमधील ब्लेकी हे एक आदरणीय नाव राहिले.३४८ प्रथमश्रेणी सामन्यांमधून त्याने ७७८ झेल आणि ५७ विटीचित बळी मिळविले.२००३ मध्ये नॉर्दम्प्टनशायरविरुद्ध त्याने २०६ चेंडूंमध्ये ३५ चौकारांसह नाबाद २२३ धावा तडकावल्या. फलंदाजीकडेच लक्ष पुरविले असते तर ब्लेकी काय करू शकला असता त्याची ही सर्वोच्च चुणूक होती. ही त्याची प्रथमश्रेणीमधील सर्वोत्तम कामगिरी होती.त्याच्या आत्मचरित्राचे नाव जबर्दस्त आहे : टेकिंग इट फ्रॉम बिहाइंड.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply