नवीन लेखन...

जानेवारी १७ : सर क्लाईड वॉल्कॉट

१७ जानेवारी १९२६ रोजी सर क्लाईड वॉल्कॉट यांचा जन्म झाला. वेस्ट इंडीजकडून एकाच काळात खेळलेल्या आणि अखिल क्रिकेटविश्वात थ्री डब्ल्यूज म्हणून विख्यात झालेल्या तिडीमधील हे एक. फ्रँक वॉरेल आणि एवर्टन विक्स हे उरलेले दोघे. फ्रँक वॉरेलचा जन्म १ ऑगस्ट १९२४ चा (या सदराचा आद्य फ्लॅश त्यांच्यावर होता) तर एवर्टन विक्सचा जन्म २६ फेब्रुवारी १९२५ चा. बार्बडोस बेटांवरील ब्रिजटाऊनच्या आसमंतात हे तिघेही जन्माला आले – दीड वर्षाच्या कालावकाशात आणि सर्वांनी १९४८ मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळून कसोट्यांचे मापटे ओलांडले.या तिघांमध्ये काटेतोल तुलनाच करायची झाली तर वॉल्कॉट फलंदाज म्हणून उजवे ठरतात. फेब्रुवारी १९४६ मध्ये एका त्रिनिदादविरुद्धच्या सामन्यात वॉल्कॉट आणि वॉरेल यांनी चौथ्या गड्यासाठी ५७४ धावांची अखंडित भागीदारी केली होती. वेस्ट इंडीजच्या प्रथमश्रेणी इतिहासातील ही सर्वोच्च भागीदारी आह, वॉल्कॉटांनी नाबाद ३१४ तर वॉरेलांनी नाबाद २५५ धावा त्या सामन्यात काढल्या होत्या. (क्वीन्स पार्क ओवल, पोर्ट ऑफ स्पेन, आरंभ २ फेब्रुवारी १९४६).बाविसाव्या वाढदिवसानंतर पाच दिवसांच्या आतच वॉल्कॉट पहिली कसोटी खेळले. प्रवासी इंग्लंडविरुद्ध ब्रिजटाऊनमध्ये. ही विक्सांसाठीही पहिली कसोटी होती. वॉल्कॉटांनी या सामन्यात सलामीवीर आणि यष्टीरक्षक अशी दुहेरी भूमिका बजावली. सहा फुटांहून अधिक उंची असल्याने फलंदाजीचा पवित्रा घेऊन ते उभे असण्यापेक्षा झुकलेलेच वाटत. बॅकफूटवर खेळण्यात ते विशेष पारंगत होते (१९९९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या दुसर्‍या आत्मचरित्राचे नावच मुळी सिक्स्टी यिअर्स ऑन द बॅकफूट असे होते. बॅकफूटवर सहजगत्या मारता येणार्‍या फटक्यांसाठी (कट, पुल, ड्राईव्ज) त्यांनी ख्याती मिळवली होती. कारकिर्दीतील पहिल्या पंधरा कसोट्यांमध्ये त्या
ंनी यष्टीरक्षणही केले. पहिल्या पंधरा कसोट्यांमधूनच त्यांनी ४०.३६ च्या पारंपरिक सरासरीने तीन शतकांसह ८८८ धावा जमविल्या होत्या. पाचव्या कसोटीच्या पहिल्या डावात त्यांचे शतक आले, दीडशतक : दिल्लीत १५२ धावा. तोवर नाबाद ३१ ही त्यांची सर्वोच्च कामगिरी

होती आणि केवळ यष्टीरक्षक म्हणून ते संघात टिकू शकले होते. नंतर शरीराच्या मागच्या बाजूने (पाठीने) त्यांची यष्ट्यांमागची कारकीर्द संपुष्टात आणली तोवर त्यांच्यामधील फलंदाज बहरू लागलेला होता. (सहा फुटांचा माणूस वाकणार तर किती काळ?)वेस्ट इंडीजने इंग्लंडमध्ये मालिकाविजय मिळविला १९५० मध्ये. (रसिक वाचकांना विद दोज टू लिटल पाल्स ऑफ माइन ही कॅलिप्सो धून आठवत असेल.) लॉर्ड्सवरच्या दुसर्‍या कसोटीत दुसर्‍या डावात वॉल्कॉटांनी “नबाद” १६८ धावा काढल्या होत्या (नबाद हा युनिकोडचा शोध मानावा लागेल बरं का, आम्ही निमित्त!) १९५५ च्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात ते एकाच मालिकेत दोन शतके काढणारे कसोटिहासातील पहिले फलंदाज ठरले. त्या मालिकेत १० डावांमधून त्यांनी तब्बल ८२७ धावा काढल्या होत्या. कारकिर्दीतील ४४ कसोट्यांमधील तब्बल ७४ डावांपैकी केवळ एका डावात ते शून्यावर बाद झाले होते ! गोलंदाज होता ऑस्ट्रेलियाचा रे लिंड्वॉल (आणि हो ते पायचित झाले होते.) १९६० मध्ये ते कसोट्यांमधून चालते झाले. काहींच्या मते कर्णधारपदाच्या राजकारणामुळे तर खुद्द वॉल्कॉटांच्या मते वेतनावरून त्यांचे मंडळाशी मतभेद झालेले होते.१९५८ मध्ये त्यांचे आयलंड क्रिकेटर्स हे पहिले आत्मचरित्र प्रसिद्ध झाले होते. त्याच वर्षी ते विज्डेनच्या वार्षिक पुरस्काराचे मानकरी ठरले होते.२६ ऑगस्ट २००६ रोजी त्यांचे निधन झाले.

— डॉ. आनंद बोबडे

Avatar
About डॉ. आनंद बोबडे 232 Articles
सोलापूर येथील डॉ. वैशम्पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस. क्रिकेटमधील विक्रम, मराठी-इंग्रजी शब्दकोडी, साहित्य व साहित्यिकांवरील लेख, महफिल-ए-ग़ज़ल हे सदर सोलापरच्या दैनिक संचार मध्ये गाजले. "जागत्या स्वप्नाचा प्रवास - सचिन तेंडुलकर १९८९ ते २०१०..." हे सचिनच्या कामगिरीचा सर्वांगीण आढावा घेणारे पुस्तक (पूजा प्रकाशन, ठाणे).

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..