१९ जानेवारी १९२२ रोजी आर्थर रॉबर्ट मॉरिस या ऑस्ट्रेलियाई कसोटीपटूचा जन्म झाला. डावखुरा मॉरिस सर्वाधिक विख्यात आहे तो १९५४८ च्या इंग्लंड दौर्यावर गेलेल्या डॉन ब्रॅडमनच्या अजिंक्य संघातील बिनीचा खेळाडू म्हणून.
वडलांच्या प्रोत्साहनामुळे क्रिकेट, रग्बी आणि टेनिससारख्या कंदुकक्रीडांमध्ये आर्थरला रुची वाटू लागली आणि वयाच्या चौदाव्या वर्षापासूनच आर्थर मैदाने गाजवू लागला. आपली शालेय कारकीर्द आर्थरने गोलंदाज म्हणून गाजविलेली होती. बिल ओरेली हा कर्णधार म्हणून लाभल्यावर मात्र ओरेलीने त्याचे फलंदाजीतील कौशल्य हेरले आणि क्लब सामन्यांमध्ये त्याने आर्थरला फलंदाजीत बढती दिली. अपेक्षेप्रमाणे तिथे आर्थरने अतिशय चांगली कामगिरी केली.
वयाच्या सतराव्या वर्षी माध्यमिक शिक्षण संपल्यावर एके ठिकाणी आर्थर कारकून म्हणून काम करू लागला. पुढच्याच वर्षी त्याचे प्रथमश्रेणीतील पदार्पण साजरे झाले. क्ल्वीन्सलँडविरुद्ध न्यू साऊथ वेल्ससाठी खेळताना दोन्ही डावांमध्ये आर्थरने शतके काढली. प्रथमश्रेणी पदार्पणाच्या दोन्ही डावांमध्ये शतके काढणारा आर्थर मॉरिस हा पहिला खेळाडू ठरला.
दुसर्या महायुद्धामुळे मॉरिससारख्या अनेक खेळाडूंना प्रथमश्रेणी सामन्यांना मुकावे लागले. स्थानिक स्पर्धा रद्द करण्यात आल्या. १९४६-४७ च्या हंगामात क्रिकेट पूर्ववत सुरू झाले. क्वीन्सलँडविरुद्ध खेळताना त्याने २७ आणि ९८ धावा काढल्या. याच हंगामात वॉली हॅमंडच्या नेतृत्वाखालील इंग्लिश संघ कांगारुंच्या देशात आला होता. या संघाविरुद्धच्या दौर्यावरच्या सामन्यासाठी मॉरिसची निवड झाली. नेहमीचा सलामीवीर बिल ब्राऊन जायबंदी असल्याने मॉरिसला संधी मिळाली होती आणि ११५ धावा काढून आणि ब्रॅडमनसोबत १९६ धावांची भागीदारी करून मॉरिसने संधीचे ‘कांदे’ केले. प्रवासी संघ न्यू साऊथ वेल्स विरुद्ध खेळला त्या सामन्यात मॉरिसने ८१ धावा काढल्या आणि कसोटीचे दरवाजे त्याच्यासाठी खुले झाले.
प्रारंभीच्या दोन कसोट्यांमध्ये आर्थरच्या हातून काहीही लक्षणीय झाले नाही. नेविल कार्डससारख्या
विख्यात लेखकाने त्याच्या तंत्रावर टीका केली तरी ब्रॅडमनांनी
मात्र त्याला नैसर्गिक खेळ कायम ठेवण्याचाच सल्ला दिला. तिसर्या कसोटीच्या दुसर्या डावात त्याने १५५ धावा काढल्या आणि पुढच्या दोन डावांमध्ये १२२ आणि नाबाद १२४.
१९४८ च्या इंग्लंड दौर्यात कसोटी मालिकेत तीन शतके काढणारा आर्थर मॉरिस फलंदाजांमध्ये अग्रस्थानी राहिला. ८७ धावांच्या पारंपरिक सरासरीने त्याने एकूण ६९६ धावा त्याने कसोट्यांमध्ये काढल्या : ३१, ९, १०५, ६२, ५१, नाबाद ५४, ६, १८२ आणि धावबाद १९६ !कसोटी कारकीर्द : ४६ सामने, ३५३३ धावा, सरासरी ४६.४८, प्रत्येकी १२ शतके आणि निमशतके, २०६ सर्वोच्च.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply