सध्या क्रिकेटरसिकांसाठी वाहणारे वारे चांगलेच सुखावह आहेत. भारत-द. आफ्रिका या दोन तुल्यबळ संघांदरम्यानची मालिकेतील निर्णायक लढत रंगतदार अवस्थेत आहे आणि अॅशेस इंग्लंडनेच राखल्या असल्या तरी ऑस्ट्रेलियाच्या कामगिरीवर सर्वांचेच लक्ष आहे.
१९९७ :
काल, केपटाऊनमध्ये दुसर्या दिवस-अखेर सचिन तेंडुलकर
४९ धावांवर नाबाद राहिलेला आहे. ३ जानेवारी १९९७ रोजी, नाबाद (१ धाव) म्हणून नेमक्या याच मैदानावर सचिन तेंडुलकर तंबूत परतला होता (दिवस-अखेर त्याचा साथीदार होता सौरव गांगुली) आणि दुसर्या दिवशी त्याने दीडशतक काढले होते. या सामन्यात तो भारतीय संघाचा कर्णधार म्हणून खेळत होता.
सचिन भारताच्या डावात शेवटचा बाद झाला (१६९) आणि त्याच्या खेळीमुळेच भारताला फॉलोऑन वाचवता आला. सामन्याच्या चौथ्या डावात मात्र विजयासाठी ४२७ धावा काढण्याचे आव्हान भारतीयांना पेलवले नव्हते आणि १४४ धावांवर भारताचे सर्व गडी बाद झाले होते. द. आफ्रिकेने हा सामना २८२ धावांनी जिंकला होता.
२००८ :
३ जानेवारी २००८ रोजी सिडनी क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या भारत-ऑस्ट्रेलियादरम्यानच्या मालिकेतील दुसर्या दिवस-अखेर सचिन तेंडुलकर वैयक्तिक नऊ धावांवर तंबूत परतला होता (पुन्हा सौरव गांगुली साथीदार) आणि दुसर्या दिवशी त्याने (पुन्हा) दीडशतक पूर्ण केले होते. या सामन्यात अनिल कुंबळे भारताचा कर्णधार होता.
सचिन नाबाद राहिला (१५४). भारताने पहिल्या डावाच्या आधारे आघाडी मिळवली. चौथ्या डावात विजयासाठी ३३२ धावा काढण्याचे मिळालेले आव्हान भारतीयांना पेलवले नाही आणि ऑस्ट्रेलियाने हा सामना १२२ धावांनी जिंकला. हरभजन सिंग आणि अँड्र्यू सायमंड्स या दोघांशी संबंधित ‘मंकी गेट’साठी विख्यात झालेली कसोटी हीच.
२०११ :
३ जानेवारीला, सामन्याच्या दुसर्या दिवस-अखेर, वैयक्तिक ४९ धावांवर सचिन तंबूत परतला आहे. या खेपेला त्याचा साथीदार आहे (गांगुलीप्रमाणेच डावखुरा सलामीवीर) गौतम
गंभीर. आज सचिनच्या दीडशतकाची (कालच्या ४९ सोडून) संघाला आस आहे आणि सामना जिंकण्याचीही. या खेपेला कर्णधार आहे महेंद्रसिंग धोनी. न्यूलँड्समध्ये आज (आणि उद्या-परवा) काय होणार?
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply