नवीन लेखन...

जरा-मरण (आठवणींची मिसळ २४)

जरामरण यातून सुटला कोण प्राणीजात?
दुःखमुक्त जगला कां रे कुणी जीवनात?
गदिमांच्या ह्या ओळी आज आठवल्या. जरा आणि मरण हा तर जगाचा नियम आहे, हे किती साध्या सोप्या शब्दात त्यांनी सांगितलय. पण हे सत्य सांगणं जितकं सोप आहे, तितकं त्याला सामोरं जाणं नक्कीच सोप नाही. स्वतः गदीमा आजाराला, हॉस्पिटलला खूप घाबरत असं मी वाचलेलं आठवतं. जरा आणि मरण या दोहोमधेही फरक आहे. मरण तुमचं जीवन संपवून टाकते. मग तुम्ही नवजात असा किंवा जराजर्जर नव्वदीचे वृध्द असा. नवजात शिशुचे मरण त्याला जीवनापासूनच वंचित ठेवते. त्याला जरा तर येत नाहीच पण बालपण, तारुण्य या सर्वापासूनच ते वंचित रहातं. तरूणपणीचं मरण किंवा प्रौढवयीन पण निरोगी माणसाचे मरणही त्याला म्हातारपणापासून दूर ठेवतं पण असं मरण पूर्ण आयुष्य जगल्याचं समाधान देत नाही. त्यालाही नाही की त्याच्या आप्त-मित्रांनाही नाही. तरीही एका अर्थी ते जरा, म्हणजे म्हातारपण, चुकवतात. पण मरण अथवा अंत कुणीच चुकवू शकत नाही. तेव्हां जरा आणि मरण यांपैकी, मरणाला अपवाद नाही. जरामरण हा संधि जरा किंवा मरण असा धरू. मरण या विषयावरचा समर्थांच्या दासबोधातील समास “मृत्यू न म्हणे राजा, मृत्यू न म्हणे प्रजा” इ. शब्दात हे स्पष्ट ठणकावून तुम्हांला सांगतो.

मरण येणारच हे माहित असल्यामुळे मानवाने त्या स्थितीला तोंड देण्यासाठी किंवा या अशाश्वतात शाश्वत शोधण्यासाठी भगीरथ प्रयत्न केले. कांही जणांना अशा शाश्वताचा स्पर्श झालाही असेल पण ते सोडले तर सामान्यपणे इतरांनी त्यांनी सांगितलेल्या गोष्टींच्या आधारे मृत्यूमागचं रहस्य स्वीकारलं. कांहींनी असं सरळ सिध्द न झालेलं अशाश्वताचे रहस्य वगैरे न शोधता जीवनाचा एक स्वाभाविक वैज्ञानिक भाग म्हणून ते सत्य स्वीकारलं. व्यक्तीगणिक मृत्यूला सामोरं जाणे वेगवेगळ्या पध्दतीने होतं. कुणी सैनिक होऊन निर्भयपणे मरण स्वीकारतो तर कुणी भयव्याकुळ अवस्थेत मरण पावतो. एखाद्याला अचानक मृत्यूला सामोर जावं लागतं. अचानक येणारा अपघाती मृत्यू एखादा क्षण आधी जाणवतो न जाणवतो. हृदयविकाराने एखाद्याला कळ येते कांही क्षण प्रचंड त्रास होतो आणि तो जातो. तर कांही जण झोपेतच जातात. त्यांना त्रास झाला की नाही कळतच नाही. एखाद्याला मातृभूमीची सेवा करताना वीरमरण येत तर एखाद्याला खून केल्याबद्दल फांशी जावं लागतं. एखाद्याला बिछान्यात मरण येत, एखाद्याला पाण्यात तर एखाद्याला हवेत. अचानक येणारा मृत्यू घाबरवतोच पण आज येतो कि उद्या अशा हुलकावण्या देत दीर्घकाळ एखाद्या मरण लौकरच येऊ घातलेल्या रूग्णाला दररोज दरक्षणी घाबरवत असतो. अर्थात् ह्या वेगवेगळ्या परिस्थितीलाही प्रत्येक व्यक्ती आपल्या मानसिकतेने सामोरी जाते. कोणी आपल्या श्रध्देनुसार परमेश्वराचं स्मरण करत शांतपणे वाट पहातात. तर कुणी क्षणोक्षणी तडफडत तो क्षण आतांच कां येत नाही म्हणून त्याच्या नावाने टाहो फोडत रहातात.

माझ्या एका मित्राचा मुलगा लष्करी सेवेत अधिकारी म्हणून नेमणूक झाल्याचा हुकुम हातात पडला आणि थेट सीमेवरच जायचेय म्हणून आनंदात असतानाच त्याला डांस चावून झालेल्या विषाणुजन्य तापाने ४८ तासांत मरण पावला. डीफेन्स ॲकॕडेमीच्या नामांकीत डॉक्टर्सनी ४८ तास अथक प्रयत्न करूनही तो मरण पावला. मरणाला तो घाबरत नव्हताच पण त्याला वीरमरण आलं असतं तर त्याच सार्थक झालं असतं. त्याचे आई वडिल हेच म्हणाले. पण मृत्यू असा कांही विचार करत नाही. नुकत्याच अतिवृष्टीने झालेल्या जलप्रलयांत मुंबईचे एक नामांकीत डॉक्टर सांचलेल्या पाण्यातून कार जाऊ शकत नाही म्हणून पाच-सात मिनिटांवर असलेल्या घराकडे चालत निघाले. पाण्यात चालताना उघड्या मॕनहोलमधे पडले. दोन दिवसांनी त्यांचा देह दूर अंतरावर किना-यावर मिळाला. त्यांना पडल्यानंतर एक क्षण तरी मृत्यूने आपण समोर असल्याची जाणीव दिली असेल कां? पण तो असाच आहे. तो त्याच्या मर्जीने येतो. सर्व वैज्ञानिक, तार्किक, इ.ना पटतील अशी कारणे देऊन तो येतो. नंतर अपील नसते. हो तरीही कांही अपवादात्मक वेळी तो एखाद्याला नक्की आला असं इतर गृहीत धरतात आणि तो एखादा अचानक आपण जिवंत असल्याच्या खुणा दाखवू लागतो. चूक मृत्यूची नसते. तो आलेलाच नसतो. यायची वेळ त्याची तो ठरवतो.

इथपर्यंत लिहून झाल्यावर पंधरा दिवस पुढे कांहींच लिहिलं नाही. मात्र कालच्या मृत्यूच्या रौद्र रुपाने आज लिहिणं भाग पडलं. परेल- एल्फिन्स्टन रोड जोडपुलावरून उतरणा-या जिन्यावरील चेंगराचेंगरीत
२२ जणांचा मृत्यू, ही बातमी मुंबईकरांना हादरवणारच. त्यांची जीवन वाहिनीच लोकल. कारणं अनेक. सरकारची दिरंगाई, दुर्लक्ष, नियोजनशून्यता ही अर्थातच प्रथम. परंतु जिना कोसळता तर फक्त आणि फक्त सरकारला दोषी धरलं असतं. जिन्यावरून उतरलेले पावसात जायला नको म्हणून तिथेच थांबले आणि मागच्या लोकांची वाट अडवली. मागचे लोक रोजच्या घाईत लाटांप्रमाणे येतच राहिले. परिणामी जिन्यावर कुणी पडले, दुसरे त्यांच्यावर पडले. २२ जण चेंगरुन तिथेच गेले. कारणं अनेक. पण नेमके तेच बावीस जण कां गेले, ह्याला “चान्स” दैव या शिवाय उत्तर नाही. हे मृत्यूचे वैशिष्टय आहे. तोच त्यांची वेळ ठरवतो. २२ जणांतील एकजण नुकताच हृदयविकाराच्या झटक्यातून वाचला होता तर कुणी आणखी कांही आजारांतून. तेव्हा वाचवलं ते केवळ आपली वेळ पाळण्यासाठी. अशा घटनांनंतर वाटतं की स्थळही तोच ठरवतो.

नचिकेताचे वडिल यज्ञ केल्यानंतर दान द्यायला हवं, ह्या अटीची पूर्तता करत असतात. पण कशी? तर भाकड गाई दान करून. नचिकेत वडिलांना “ असं कां करतां” म्हणून विचारतो. वडिल एकदां- दोनदा दुर्लक्ष करतात. मग रागावतात आणि त्याला सांगतात की मी तुलाच यमाला दान करतो. नचिकेत हे ऐकतांक्षणीच यमाकडे जायची तयारी करतो. खूप प्रवास करून यमाच्या घरी पोहोंचतो. यम घरी नसतो. तर तो तिथेच अन्नपाण्याविना तीन दिवस थांबून रहातो. मग यम परत येतांच त्याला पहातो. त्यानंतरचा यमाचा व त्याचा संवाद म्हणजे पूर्वीच्या काळी मृत्यूचा अर्थ लावण्याचा तर्कसंगत प्रयत्न. तो मुळातूनच वाचण्यासारखा आहे. पण थोडक्यात त्याचा मथितार्थ असा.

मरण चुकवतां येतं? एक फार मजेदार गोष्ट आहे. एकजण मिथेलेच्या राजा जनकाकडे येतो आणि त्याला म्हणतो, “ राजा मला तुझा अत्यंत वेगाने पळू शकणारा घोडा दे.” राजा दानी असतो. तो त्याला तसा घोडा देतो पण त्याला विचारतो की तुला इतक्या लौकर कुठे जायचे आहे? तो म्हणतो, “ राजा, मी रस्त्यावरून जात असतांना प्रत्यक्ष यमधर्म माझ्या समोर येऊन उभा राहिला आणि म्हणाला, ‘ दोन तासांनी मी तुला न्यायला येणार आहे.’ तेव्हां मी ह्या दोन तासांत जास्तीत जास्त लांब निघून जाईन. मग मला भिती रहाणार नाही.” जनक राजा ज्ञानी होता. तो त्याला कांही बोलला नाही. त्याने त्याला घोडा घेऊन जाऊ दिले. तो घोड्यावरून दूर अयोध्येला येऊन पोहोंचला. जरा दम घेतो तर यमराज समोर उभे. तो म्हणाला, “ हे काय? मी एवढ्या लांब आलो तरी तुम्ही इथे आलांत.” यमराज हंसले आणि म्हणाले, “अरे, तुझी मरणाची वेळ आली होती पण जे स्थळ निश्चित होतं, तिथे तू नव्हतास. म्हणूनच मी तुला आधीच दर्शन दिलं. त्याने घाबरून तू आतां योग्य स्थळी येऊन पोहोचलायस.”

मरण चुकवू पहाणा-याची आणखीही एक अशीच मजेशीर पौराणिक कथा. त्याने खूप तपश्चर्या केली आणि ब्रम्हा, विष्णु महेश ह्या तीनही देवांकडून अमर होण्याचा वर मागून घेतला व तो त्यांनी दिला. एकदा यमदूत त्याला स्वप्नांत दिसले व निघण्याची तयारी करायला सांगू लागले. तो घाबरला. लागलीच ब्रम्हदेवांकडे गेला आणि म्हणाला, “मला आपण अमरत्व दिलेत मग आतां हे काय?” ब्रम्हदेव म्हणाले, “ बरोबर आहे. चल, आपण भगवान विष्णुना विचारूया.” दोघे विष्णु देवांकडे गेले. त्यांचे सांगणे ऐकून तेही आश्चर्यचकीत झाले. ते म्हणाले, “चला, आपण महादेवाला विचारूयां!” मग तिघेही महादेवांकडे आले. महादेवांनाही कांही माहिती नव्हती. ते म्हणाले, “ मी माझा शब्द मागे घेतला नाही.” आपण चित्रगुप्तांकडे चौकशी करूया.” त्याच्याबरोबर ते तीनही देव चित्रगुप्तांकडे आले. विष्णु म्हणाले, “ चित्रगुप्ता, याला मरण येऊ नये, अशी योजना करायला तुला सांगितले होते ना! “ चित्रगुप्त त्या सर्वांना बघून अचंभित झाले होते. ते म्हणाले, “ देवाधिदेवांनो, हा माणूस आहे. तेव्हां कांहीतरी मृत्यूची तजवीज हयाच्या नशीबी लिहिणे भाग पडले. मी ह्याच्या मृत्यूसंबंधी अशी योजना केली होती की ती वेळ कधी येणार नाही व तो अमर होईल. मी असे लिहिले होते की जेव्हा ब्रम्हा, विष्णु, महेश तिघे ह्याच्याबरोबर माझ्याकडे येतील, तेव्हांच ह्याला मृत्यू येईल. आपण तिघे एकत्र येणं, ते ही ह्याला बरोबर घेऊन येणं आणि तेही माझ्याकडे, ही अगदी अशक्य गोष्ट वाटली होती मला पण आतां…! “ यमराज तिथे हजरच होते. त्यांनी आपलं काम केलं. थोडक्यात काय, तर स्थल, काल, परिस्थिती सर्व आधीच ठरलेलं असतं.

पण हे सर्व ठरलेलं आहे म्हणून लुई पाश्चरने जंतुंचा शोध लावला नसतां तर! किंवा त्यावर संशोधन करून अनेक आजारांवर लस टोंचण्याचा मार्ग माणसाने शोधला नसतां तर! तर आज जे इतके म्हातारे, चुकलो ज्येष्ठ आपल्या आजूबाजूला दिसताहेत ते दिसलेच नसते. जगांत सरासरी आयुर्मान वाढलंच नसतं. भारतात गेल्या शतकांत सरासरी आयुष्मान कसं वाढत गेलं ते पहा. मग लक्षांत येईल की मरण नक्कीच पुढे ढकलतां येतय. सरासरी ३२ वरून सरासरी ६८ पर्यंत प्रगती झालीय. एखाद्याचे आजोबा ९० वर्षे जगलेही असतील. पण त्यांचा मोठा गोतावळा त्यांना सोडून गेला असणार. माणसाने मृत्यूशी झुंज देणे सोडलेले नाही. विज्ञानाच्या सहाय्याने निसर्गाची नवी नवी गुपिते समजून घेऊन मृत्यू पुढे पुढे कसा ढकलतां येईल ह्यासाठी सातत्याने प्रयत्न चालूच रहाणार.

मग इतका जिद्दी माणूस आपणहून मरण कां जवळ करत असेल बरं? आत्महत्या कां होतात? हा लेख लिहिणे वर्षभर चालूच आहे. गेल्या वर्षी पावसाळयात झालेल्या अपघातांचा वर उल्लेख आला आहे. ह्या वर्षीच्या पावसाळी अपघातांच्या बातम्या येऊ लागल्यात. पण त्या आधी कुणा एका पारमार्थिक मार्गावर “महाराज” म्हणून प्रसिध्द झालेल्या व्यक्तीने पिस्तुलाने स्वत:चा अंत करून घेतल्याचे वृत्त आले आहे. मध्यम वय, पैसा, मानमरातब असं सर्व कांही उपलब्ध असून त्यांनी कां आत्महत्या केली? शेतकरी कर्ज फेडतां येत नाही, म्हणून दारिद्र्यापाया आत्महत्या करतो. प्रेमभंग झाल्यामुळे कुणी आत्महत्या करतात. तर प्रेमाला दोघींच्याही घरून विरोध म्हणून कुणी आत्महत्त्या करतात. आजाराला कंटाळून आत्महत्या करणारेही बरेच असतात. जपानसारख्या समृध्द देशांत आत्महत्त्यांच प्रमाण जास्त कां असावं? एकूण आत्महत्येची मानसिकता निर्माण होऊ नये अशी समाजव्यवस्था हवी.

मृत्यूच्या या कठोर वृत्तीवर फक्त निर्भय राहून आपले काम शरीराला जमेल तिथवर धैर्याने करणे हेच उत्तर आहे. अनेकांनी वयाची शंभरी पार केलीही. भारतरत्न विश्वेश्वरय्या आणि भारतरत्न महर्षि कर्वे दोघांनी सेंचुरी काढले. पण मी सेंचुरी काढणारच, असं म्हणणाऱ्या कित्येकांना तो नव्वदीत घेऊन गेला. माजी पंतप्रधान व अतिशय हट्टी, मोरारजी देसाई यांनी ९९ पूर्ण केली पण त्यांचा शंभर पुरी करण्याचा हट्ट त्याने चालू दिला नाही. तेव्हां अंतिम तोच. हा लेख निराशावादी वाटू शकतो. पण कांही वेळा कुणाकुणाच्या आयुष्यात अशाही येतात, हे सत्त्य आहे. कुणी फार थोर माणसं विकलांग आणि परावलंबी झालेली पाहिली आणि मला ही कविता सुचली.
हे मृत्यू
हे मृत्यू,
जेव्हां तुझी चाहूल लागते,
तेव्हा पर्वताचे काळीज कांपते
तुफानाच्या अंगावर येतात शहारे
आणि लुळ्या पडतात सागराच्या लाटा
पण कल्पवृक्ष हाताशी असून
जेव्हा इंद्र हताश होतो
सूर्य पाण्यासाठी वाळवंटी तडफडतो
वटवृक्ष भीक मागतो सावलीची
तेव्हां प्रतीक्षा असते
फक्त तुझी आणि तुझीच.

— अरविंद खानोलकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..