वर्ष संपलं. वर्ष सरताना या वर्षांत आपल्या हातून काय काय झालं याचा आढावा घेणं मला आवश्यक वाटतं. अर्थात संसारतापे जे काय करावं लागतं, ते करणं कुणाला चुकलेलं नाही. तो आपल्या दैनंदिन कर्तव्याचा भाग असतो व असं कर्तव्य ‘मी केलं’ या सदरात येत नाही. सर्वच जीवमात्र ते करत असतात आणि त्याचं मला फार कवतुक वाटत नाही. मला म्हणायचंय ते सांसारिक कर्तव्याच्या पलिकडे माझ्या हातून जे घडलं ते.
मी माझ्या नैमित्तिक कर्तव्यांच्या पलिकडे जाऊन, माझ्या वर्तुळातल्या लोकांपेक्षा काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करतोय. मी माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात वाचन ही एकच गोष्ट मनापासून केलीय आणि वाचनातून बरंच काही मिळत असलं तरी ‘गांधी’ मिळत नसल्याने नाईलाज म्हणून कुठेतरी, कुणाची तरी बारीक सारीक कामं केली. आपल्या देशातली सामाजिक परिस्थितीच छंदांना प्रोत्साहन देणारी नसल्याने, नाईलाजाची कामं करण्यातच आपल्या सर्वांच्या आयुष्याचा बराच काळ खर्ची पडतो. मी हे या वर्षात करायचं टाळलं आणि माझ्या दैनंदिन आयुष्यातला मोठा समय मी आजवर वाचलेलं माझ्या शब्दांत लिहायचा प्रयत्न केला आणि ते फेसबुक/व्हाट्सअॅपच्या माध्यमातून ते तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न केला. जे वेगळं करायचा प्रयत्न केला म्हणतोय ते हेच. मला, अर्थातच, याची किंमतही चुकवावी लागली हे सांगायला नकोच..!
गेली चार वर्ष मी सातत्याने लेखन करतोय. माझ्या मनाला भिडणाऱ्या, मला अस्वस्थ किंवा आश्वस्त करणाऱ्या विविध विषयांवर व्यक्त व्हावं किंवा मला नव्यानेच कळलेल्या जुन्या गोष्टी तुम्हाला सांगाव्यात असं मला जेंव्हा जेंव्हा तिव्रतेनं वाटलं, तेंव्हा तेंव्हा मी लिहिलं. माझ्या लिखाणाला तुम्हा सर्वांचा प्रतिसादही वाढता होता. तुमच्या सर्वांचा प्रतिसाद मला लिहितं ठेवायला प्रोत्साहीत करत होता. माझ्या चार वर्षांच्या लिखाणात आणि गेल्या वर्षभराच्या लिखाणात मोठा फरक होता. माझ्या पूर्वीच्या लिखाणापेक्षा यंदाच्या लिखाणात मी सुधारणा करण्याचा माझ्या परीने निश्चितच प्रयत्न केला, पण जेंव्हा डिसेंबराच्या सरत्या आठवड्यात मी जानेवारीत लिहिलेलं वाचायचा प्रयत्न केला, तेंव्हा मला ते आणखी छान लिहिता येऊ शकलं असतं असं वाटू लागलं. त्यापुर्वीच्या तीन वर्षातलं तर आता माझं मलाच वाचवत नाही अशी परिस्थिती आहे.
फेसबुक/व्हाट्सअॅपवरील कुणाच्याही पोस्ट्सना मिळणाऱे लाईक्स आणि कमेंट्स या जर त्या त्या लिहिणारांच्या लोकप्रियतेच्या कसोट्या असतील, तर त्या कसोटींवर माझं लेखन तुमच्यात प्रिय होत होतं असं मला वाटायला लावणाऱं होतं. मला मिळणाऱ्या कमेंट्स, त्यावर होणाऱ्या चर्चा मला आनंद देणाऱ्या होत्या, काही विचार करायला लावणाऱ्याही होत्या. या लेखन प्रवासात (चार वर्षांच्या लेखन कर्माला ‘प्रवास’ हा शब्द जरा जास्तच भारदस्त वाटतोय याची मला कल्पना आहे. तरीही काळ-वेगाची वेगाने बदलती गती लक्षात घेऊन मी तो वापरलाय) अनेक विचारी मित्र माझ्या व्हर्च्युअली आणि प्रत्यक्षही संपर्कात आले ही एक त्यातील जमेची मोठी बाजू.
माझ्या लिखाणामुळे २०१८ सालाची सुरुवात मी ‘दुरदर्शन’वर पोहोचण्यात झाली, तर या सालाचा शेवट मला ‘एबीपी माझा’ वाहिनीचं लिखाणासाठीचं बक्षिस मिळण्यात झाला. टिव्ही हे माध्यम आपण भारतीयांत प्रचंड आकर्षणाचं असल्याने आणि अशा माध्यमांत मी येतोय असं वाटल्याने, मी यशस्वी होतोय असं माझं मलाच वाटू लागलं. ‘तुम्हाला टिव्हीवर पाहिलं’ हे शब्द जेंव्हा समोरुन कुणालाही ऐकायला येतात, तेंव्हा ते ऐकणाराचं मन आनंदाने मोहरुन येतं. माझंही येऊ लागलं. माझं लिहिलेलं वाचून अनेकांच्या मनात माझं ज्ञान((?), मी माझ्या लेखांतून प्रकट केलेले विचार वाचून माझ्याबद्दल आदर वैगेरे निर्माण होऊ लागलाच होता. मी टिव्ही-पेपरमधे येतोय असं पाहून त्यांचा माझ्याविषयीचा हा समज (खरं तर ‘गैर’) पक्का होतोय की काय, याची मला रास्त शंका येऊ लागली. माझ्याकडे फोन वरुन व्यक्त होताना किंवा रस्त्यात अनपेक्षितपणे भेट झाल्यावर अनेकांच्या डोळ्यातं, वागण्यात माझ्याबद्दलचं काहीतरी ‘वेगळं’ मला जाणवू लागलं होतं. माझ्या दृष्टीत, विचारांत, लिहिण्यात अनेक त्रुटी आहेत हे मला समजत होतं आणि लोकांनी माझ्याबद्दलचा करुन घेतलेला समज मला हवाहवासा वाटत असला तरी, कुठेतरी त्याची भितीही वाटत होती. लोक लंगड्या बैलालाच नंदी समजायची चूक करतायत की काय, असं माझं मलाच वाटू लागलं होतं.
आपल्या लोकांची(माझ्यासहीत) मानसिकताच मोठी विचित्र आहे. आपण सतत कुणीतरी अवतार येईल व आपल्याला तारेल याची वाट पाहात असतो. आपल्याला एक ‘दैव हवा असतो. काहीतरी मागायला, गाऱ्हाणं मांडायला आणि दोष द्यायलाही आपल्याला एका
देवाची गरज असते. स्वत: काहीच करायचं नसलं तर मग देव गरजेचा असतो. लोकांनी वाचावं, अधिक विचार करावा व त्यातून जाग्या झालेल्या स्वत:च्या त्या विचारावर, कितीही विरोध झाला तरी, निष्ठेनं अंमल करावा हा माझ्या लिहिण्यामागचा उद्देश होता आणि काही तुरळक अपवाद सोडले तर लोक माझ्याच विचारांच्या प्रेमात पडताना मला दिसत होतं. माझा प्रवास देवत्वाच्या मार्गाने झालेला मला नको होता आणि म्हणून लोकांचं माझ्याशी वागणं बदललेलं दिसताच मी सावध झालो.
अशातच माझ्या हाती दुर्गाबाई भागवतांचं ‘आठवले तसे’ हे आत्मचरित्रात्मक पुस्तक लागलं आणि त्या पुस्तकाच्या वाचनातून माझ्यातलं न्युनत्व मला अधिक तीव्रतेने जाणवलं. लोकप्रियतेच्या लाटेवर आरुढ होऊन लिखाण करण्यात किती चूक असते हे दुर्गाबाईंच्या पुस्तकातून मला समजलं. मी ज्यांना माझी दैवत मानतो, त्या दैवतांनीही लोकशिक्षणाचा बहाणा करून लोकप्रियतेच्या मागे जाऊन चुका केल्याचं दुर्गाबाईंनी नांवानीशी त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे. त्यांचं चालून गेलं, कारण ती माणसं खरोखरीच मोठी होती. मला तसं करून चालणार नव्हतं, चालणार नाही. माझी यत्ता अजून खूप खालची आहे हे मला दुर्गाबाई वाचून समजलं. मला माझ्या लिखाणात आणखी सुधारणा करणं गरजेचं आहे हे जाणवतं. मला अधिक व्यापक विचार करणं गरजेचं आहे असंही जाणवतं. माझी कुणा इतरांशी नव्हे तर माझ्याशीच स्पर्धा करण्याची मला आवश्यकता असल्याचं मला जाणवू लागलं. टिव्ही-वर्तमानपत्रांतून मला अल्पशी प्रसिद्धी मिळत असताना, म्हणूनच मी जास्त सावध झालो. लोक माझं वाचून माझ्याबद्दल जे समजू लागलेयत, त्यांच्या माझ्याबद्गलच्या त्या भावनांना अधिक न्याय देण्यासाठी मला आणखी भरपूर वाचन करण, अधिक अभ्यास करणं गरजेचं असल्याचं मला तीव्रतेने जाणवू लागलंय. २०१८ मिळणे जाता जाता आत्मभानाचं हे बहुमोल दान माझ्या पदरात टाकलं..!
येत्या वर्षात लिहिणं कमी आणि अभ्यास, वाचन अधिक करण्यावर भर देणार आहे. मला अस्वस्थ किंवा आश्वस्त करणाऱ्या कोणत्याही घटनांवर पूर्ण अभ्यास करूच मगच व्यक्त व्हायचं मी ठरवलं आहे. शासनाच्या गॅझेट साठीच काम रखडल आहे माझ्याकडून, ते ही पूर्ण करायचं आहे. ‘मुंबईतल्या इतिहासाच्या पाऊलखुणां’ या माझ्या पुस्तकाला या वर्षात मूर्त स्वरूप द्यायचं ठरवलं आहे. याचा परिपाक म्हणून माझं इथलं लिहिणं थांबलं नाही तरी साहजिकच कमी होणार आहे. हे थांबणं नाही, विसावणं आहे..
-नितीन साळुंखे
9321811091
Leave a Reply