मोठ्याबाबा हे आमचं खांबे गावचे ग्रामदैवत! कायम सुखा दुःखाला आम्ही त्याला साकडं घालणार “यंदाचा पाऊस, कसा? काय? किती? कधी? कोणत्या नखितरात ? पिकं कोंती करू? दुखणं, बहानं, पोरा पोरींच्या लग्नाच्या अडचणी, सासु सुनाचा तंटा, पोरीचा सासुरवास ” या सगळ्या गोष्टींना आम्ही तिथं देवापुढे गाऱ्हाणं मांडायचं अन् मग तिथून एकदा हिरवा देवानं कंदील दिला की तसं घडलंच समजायचं. म्हणून सगळ्यांचा तिथं जाम विश्वास बसलेला. तसा मोठ्याबाबाचं मूळ ठाण अंकाई किल्ल्यावरचं. तिथून आमच्याकडे गुराख्यासोबत आला व इथचं खांब्याला रहिवासला असं जुने लोकं म्हणतात. काही बी असो पण देव एकदम निसर्गाच्या सानिध्यात येऊन थांबला याचं खूप आज नवल वाटतय. कोणाची एक नको अन कोणाची दोन अशी ती जागा अगदी खळखळ वाहणाऱ्या ओढ्याकाठी अन् गर्द झाडीत!
एकदा दिवाळी झाली की आमच्या गावातील बरीच मंडळी कार्तिकीला आळंदीला जात. माऊलीचं दर्शन उरकल्यानंतर थेट कार्यकर्ते तमाशाच्या कानातीकडं जाऊन या वर्षीचा नारळ तमाशाच्या मालकाच्या हातात सुपूर्त करायचे! अगदी महिन्यावर आलेली आमच्या गावची मोठ्या बाबाची जत्रा म्हणजे आमच्यासारख्या पोरांसाठी आनंदाची पर्वणीच असायची! बऱ्याच वेळा दोन-तीन तमाशे सुद्धा यायचे. जत्रेच्या अगोदरच चार आठ दिवस त्यांच्यातले जाहिरात करणारे लोक गावात मोक्याच्या ठिकाणी रंगीत पोस्टर लावून जायचे. त्यात नाचणाऱ्या बाया, रंगबाजी अन् वगनाट्य असं सर्व समावेशक चित्र मांडलेलं असायचं. बरेचसे पोरं तासंतास फिरून फिरून परत पोस्टर पाहून जायचे. म्हातारी माणसं सुद्धा चष्मा खालीवर करून पाहिल्याशिवाय राहत नव्हती. बऱ्याचदा जत्रेचा दिवस कधी उगवतोय असं होऊन जायचं. ग्रामदैवताचा वर्षातला उत्सव म्हणल्यावर दोन दिवस वावरातली काम बी लोक बंद ठेवायचे. घरची भुईची सारवणी करून आया बाया आपलं घर एकदम च्याक करायच्या. थंडी असल्यामुळे गहू हरभरे सुद्धा जास्त पाणी मागत नव्हते. असा निवांत शेती धंदा या काळात असल्यामुळे जत्रेचा काळ अगदी आनंदात सगळे साजरा करायला सज्ज असायचे.
दोन दिवसाच्या जत्रेत पहिल्या दिवशी सकाळी देवाची मुखवटे घेऊन पालखी निघायची. रंगीबेरंगी झालं लावलेल्या उंच उंच काठ्या व त्यांचा तोल सांभाळायला दोन-तीन बाजूने लावलेले दोर ही कसरत तुम्हाला जगातल्या कोणत्याही सर्कशीत पाहायला मिळणार नाही हे मात्र नक्की. याला आमचं सगळं गाव छबिना म्हणायचं . हाच छबिना सकाळी सातला एकदा डफ वाजत निघाला की पुऱ्या गावाला फेरा मारून दोन तासात नऊच्या दरम्यान मारुतीच्या मंदिरासमोर पोहोचायचा. इथं आल्यावर गावकरी गुलाल उधळत सनईच्या तालावर लेझीमचे दोन-तीन डाव रिंगण करून खेळायचे. आमच्या गावातली लेझीम टीम अशी की तीचा हात कोणी धरायचा नाही! त्याला वाजंत्री बी तसेच लागायचे. आता एक गाणं वाजवा म्हणलं तरी ते एकमेकांच्या तोंडाकडे पाहतात पहिलं असं काहीच नव्हतं. हलगी वाजवणारा बी कडक असला पाहिजे म्हणजे सनईचा सूर आणखी कडक निघायचा. शेवटी शेवटी लेझीम इतकी रंगात यायची की वाजंत्री अन् लेझीम खेळणारे यांच्या अंगात वीज संचारली की काय असं पाहणाराला वाटायचं. शेवटी नाचणारांच्या पायाचा शेवटचा ठेका सनईवाल्याचं तोंड एकदाच बंद व्हायचं अन् मोठ्या बाबाचा छबिना मळ्याकडं मंदिराच्या दिशेने वाटचाल करायचा.
एकदा का छबिना गावातून निघाला म्हणजे तिकडे मळ्यात मंदिरासमोर बकरांच्या जत्रा सुरू व्हायच्या. जो तो आपापल्या पद्धतीने तिखट गोड नैवेद्य दाखवायच्या तयारीत असायचा. खरी जत्रा तिखटच महत्त्वाची समजली जायची. दुपारच्या भरी उन्हात झाडाच्या सावलीला चुली पेटायच्या व लांबून पाहिलं म्हणजे बघणाऱ्याला समजून जायचं जत्रेचा बेत सुरू झालेला दिसतोय. हे झालं एका बाजूला दुसरीकडे जत्रेला येणारे हलवण्याची पालं, खेळण्याची दुकानं, पान टपऱ्या बरोबर ठरलेल्या ठिकाणी लागायच्या. एक-दोन एकर मोकळ्या ठेवलेल्या जागेत तमाशावाले त्यांची कनात लावायचे. सकाळपासूनच त्यांची जीप गाडी आजूबाजूच्या दोन-तीन गावांना भोंगा लावून सांगून यायची “आज रात्री साडेनऊ वाजता, खांबे आणि पंचक्रोशीतील तमाम तमाशा रसिकांना…..” असं बरंच काही त्यांचं अनाउन्सिंग होऊन यायचं. या तमाशांमध्ये रघुवीर खेडकर काळू बाळू मंगला बनसोडे हरिभाऊ बडे दत्ता महाडिक पांडुरंग मुळे अशा दिग्गज कलावंतांचे पाय आमच्या खांबे नगरीत लागायचे. संध्याकाळची जेवण खाऊन होऊन बाया बापड्यांसहित सर्वजण अंगावर शालीची किंवा चादरीची बहाळ घेऊन तमाशाचा यथेच्छ आनंद लुटायचा अन् वर्षभरासाठी या आठवणी सोबत घेऊन घरी जायचा.
दुसऱ्या दिवशी याच तमाशाच्या सकाळी थोड्याफार हजऱ्या असल्या तर असायच्या . रात्री जे तमाशाला आले नाही त्यांच्यासाठी खास आग्रहाने गावकऱ्यांनी हे गीत संगीत ठेवलेलं असायचं. आम्ही सकाळीच उठून हलवायाच्या आळीला येऊन खमंग वास घेऊन जायचो. खेळण्यात कोणत्या दुकानात काय मान लागलाय हे पण आम्ही पाहिल्याशिवाय राहत नव्हतो . तिथून घरी आल्यावर जत्रेत फिरायला खर्ची मिळायची. अकरा वाजता जेवण करून एकदा परत जत्रेत पाऊल ठेवलं की 25 पैशाचं गारीगार, 50 पैशाचा फुगा असे हलकेफुलके घेण्यात मला नको तितकं समाधान मिळायचं. दुपारपर्यंत पैसे कसे पुरतील याचं मी तंतोतंत भान ठेवायचो. माझी आई म्हणजे अक्का खाऊ आणणार म्हणून त्यावर पैसे खर्च करणे मी मुद्दाम टाळायचो. संध्याकाळी चार साडेचारनंतर कुस्त्यांचा हंगामा एकदा सुरू झाला म्हणजे समजून जायचं की आता जत्रा संपत आली. एकदा तिथं हलगी वाजायला लागली की हळूहळू एक एक जण तिथं गोल रिंगण करून बसणार. पहिल्यांदा रेवडी उधळून कुस्त्या सुरू होणार. नंतर रुपया ,दोन रुपये ,पाच रुपये असा ताकदीनुसार चढता क्रम व शेवटी मानाची कुस्ती झाली की “बोल मोठ्याबाबा की जय!!!!” असं म्हणून जत्रा संपली व हगामा फुटला असं समजायचं अन् आम्ही घरी जायचो.
काल रात्री किती मज्जा अन् आज इतकी शांतता अजिबात करायचं नाही मला पण काय करणार? मी अक्काला म्हणायचो,“ लई मज्जा आली अक्का अजून एखादा दिवस पाहिजे होती जत्रा.” त्यावर ती म्हणायची “ हाये ना उद्या शिळी जत्रा! ” उरलेली सूरलेली जत्रा म्हणजे शिळी जत्रा “चलो भागते की लंगोट सही” अजून एक अर्धा दिवस भागतोय आपला म्हणायचं व आनंदात दुसऱ्या दिवसात रमायचो.
सकाळी उठून परत कालच्या ठिकाणी फिरायला आलो म्हणजे बरीच दुकान रात्रीतून निघून गेलेली असायची .ज्यांची जायची सोय रात्री झाली नसेल किंवा पुढे त्यांना कुठे दुकान लावायला अवधी असेल असे दुकानदार एका दिवसासाठी तिथेच थांबायचे अन् आमच्या शिळ्या जत्रेची शोभा वाढवायचे , आजूबाजूला पडलेले रद्दी कागद ,जत्रेतला कचरा ,बेकामी टाकून दिलेल्या वस्तूंकडे पाहून एका दिवसात किती वैभव बदललंय हे मन स्वतःलाच सांगायचं .मी या दोन दिवसाच्या आठवणींना माझ्या शिदोरीत घेऊन पुन्हा शाळेकडे निघायचो…पुढच्या वर्षीच्या जत्रेची वाट पाहत अन् मनाशीच म्हणायचो , आज्जीच्या (ब च्या) तोंडून कायम वाक्य निघायचं “एका जत्रानं देव काय म्हातारा होतोय का?” असं आठवल्यावर मी म्हणायचो “लवकर येऊ दे रे मोठ्याबाबा पुढची जत्रा, आम्हाला मज्जा करायला!!….”
निवृत्ती सयाजी जोरी,
मंडळ कृषी अधिकारी,
फुलंब्री
जि. छत्रपती संभाजीनगर.
9423180393
Leave a Reply