कविता, गाणी, शेर-शायरी, पटकथेचे ‘शब्दप्रभू’ आणि आपल्या लेखणीची रसिकांवर मोहिनी घालणारे ज्येष्ठ कवी, गीतकार जावेद अख्तर यांचा जन्म १७ जानेवारी १९४५ रोजी ग्वाल्हेर येथे झाला. जावेद अख्तर यांचं नाव लहानपणी ‘जादू’ असं होतं. शायरीचा वारसा त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाला आहे आणि वडिलांनी लिहिलेल्या उर्दू शेरमधील एका वाक्यातून त्यांचं नाव निवडलं गेलं होतं. गीतकार म्हणून त्यांची कारकीर्द त्यांनी आजवर जपली असली तरी ‘पटकथाकार’ म्हणून एकेकाळी हरएक चित्रपटामागे असलेलं त्यांचं नाव गेल्या कित्येक वर्षांत पडद्यावर उमटलेलंच नाही.
जुन्या लोकप्रिय गीतांच्या निवडक गीतकारांच्या यादीतील अव्वल नाव अख्तर यांचे आहे. गीते व पटकथा लेखनापलीकडे सामाजिक कार्यकर्ता व विद्रोही विचार मांडणारे लेखक अशीही त्यांची ख्याती आहे. ‘लावा’, ‘तरकश’ त्यांच्या या गाजलेल्या पुस्तकांच्या अन्य भारतीय भाषांमध्ये आवृत्त्याही निघाल्या आहेत. आजवरच्या या लिखाणातून त्यांनी भारतीय तरुण मनांना अनोखी ऊर्जा दिली आहे. धार्मिक गुंतागुंत मानवाला पुढे जाण्यापासून रोखत असल्यानेच त्यांनी निरिश्वरवादाचा वेळोवेळी पुरस्कार केला आहे. मा.जावेद अख्तर यांची अशी विशेष ओळख आहे. १९७० ते १९८० च्या दशकात सलीम खान-जावेद अख्तर या जोडीने अनेक दर्जेदार चित्रपट रसिकांना दिले. ‘अंदाज’, ‘सीता और गीता’, ‘शोले’, ‘जंजीर’, ‘दीवार’ आणि ‘डॉन’ या त्यांच्या चित्रपटांना सिनेरसिकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले, एका वादानंतर हा इतिहास घडवणारे दोन्ही पटकथाकार बाजूला पडले ते आजतागायत. १९९३ साली जावेद अख्तर यांनी ‘रूप की रानी चोरों का राजा’ या चित्रपटासाठी स्वतंत्रपणे शेवटची पटकथा लिहिली होती. ‘सिलसिला’ चित्रपटापासून अलीकडच्या ‘दिल चाहता है’ चित्रपटामधील गीतांनी युवापिढीचे भावविश्व भारून टाकले. आज चित्रपटसृष्टीतील त्यांच्या कारकिर्दीला पन्नास पेक्षा जास्त वर्ष पूर्ण झाली आहेत. सध्या हिंदी चित्रपटक्षेत्रात अख्तरांचे गीतकार म्हणून मोठे नाव आहे.
एक प्रभावशाली गीतकार म्हणून त्यांना स्वत:ला हिंदी चित्रपटांमधील कुठली गाणी आवडतात, असे विचारल्यावर साठ आणि सत्तरचे दशक हे चित्रपट संगीताच्या दृष्टीने फार महत्त्वाचे होते असे ते सांगतात. सत्तरच्या दशकांमधली चित्रपटांसाठी लिहिलेली गाणी, त्यांचे बोल, त्यांचं संगीत, त्यांचं दिग्दर्शन आणि ज्या कलाकारांवर ती चित्रित केली गेली ते कलाकार अशा अनेक गोष्टी अनमोल होत्या. मा.जावेद अख्तर यांना ‘पद्मभूषण’, उर्दूतील उत्तम काव्य लेखनासाठी ‘साहित्य अकादमी’ पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांच्या अनेक गाण्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत.अभिनेत्री मा.शबाना आझमी जावेद यांच्या दुसरी पत्नी आहेत.जावेद विवाहित असून दोन मुलांचे(फरहान आणि जोया)वडील होते.तरीदेखील शबाना यांचा जावेद यांचा जीव जडला होता.शबाना यांचे कुटुंबीय यांच्या लग्नाच्या विरोधात होते.परंतु त्यांनी ठाम निश्चय केला होता आणि जावेद यांच्याशी लग्न केले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply