गोव्याच्या मंगेशीच्या देवळात १९६६ साली अवघ्या सहा वर्षांच्या ज्ञानेश पेंढारकरच्या हस्ते ‘जय जय गौरीशंकर’ या नाटकाचा मुहूर्त पार पडला आणि तिथून या नाटकाच्या प्रवासाला सुरुवात झाली. पं. राम मराठे, भालचंद्र पेंढारकर, प्रसाद सावकार,, जयश्री शेजवाडकर यांसह आणखी तीन कलाकारांसोबत विद्याधर गोखले लिखित या नाटकाच्या तालमींना सुरुवात झाली. नाटकाचे दिग्दर्शक होते नटवर्य मामा पेंडसे तर संगीत दिग्दर्शन होते ख्यातनाम संगीतकार वसंत देसाई यांचे.
तीन महिने तालीम केल्यानंतर १४ ऑगस्ट १९६६ रोजी ‘जय जय गौरीशंकर’ चा शुभारंभाचा प्रयोग भालचंद्र पेंढारकरांच्या ‘ललितकलादर्श’ या संस्थेतर्फे बिर्ला मातोश्री सभागृहात रसिकांच्या प्रचंड उपस्थितीत पार पडला. दोन दिवसांत पाच हाउसफुल्ल प्रयोग करणाऱ्या या नाटकाची कीर्ती वाऱ्यासारखी पसरत गेली आणि अल्पावधीतच ते लोकप्रिय झाले. ललितकलादर्श यांच्या संस्थेने या नाटकाचे २२५० प्रयोग केले, हाही संगीत रंगभूमीवरचा विक्रमच आहे. भालचंद्र पेंढारकर आणि पं. राम मराठे या दोन्ही दिग्गज कलावंतांच्या गायन-अभिनयाने आणि वसंत देसाईंच्या संगीताने हे नाटक गाजत राहिले. प्रस्तुत नाटक मुख्यत: शिवलीलामृतांतील १४व्या अध्यायातील शंकर-शबरी कथेवर आधारलेले असून, त्याला स्कंदपुराणांतर्गत सह्याद्रि-खंडातील ‘मांगरीश महात्म्या’तील कथाभागाची जोड दिली आहे.
‘सप्तसूर झंकारत बोले गिरिजेची वीणा’ या दोन विभिन्न तालांमध्ये बांधलेल्या नांदीने नाटकाची सुरुवात होते. पुढे चटपटीत संवाद, राजकीय उपहास यांमुळे नाटक अधिक रंगतदार होत जाते. ‘नारायणा रमा रमणा’, ‘प्रियकरा नसे हा छंद बरा’ निराकार ओंकार, शिवशक्तीचा अटीतटीचा, सावज माझं गवसलं, भरे मनात सुंदरा, कशी नाचे छमाछम, रमारमण श्रीरंग यांसारखी एकूण सरस अशी चौदा गाणी या नाटकात असून, पार्श्वसंगीतासाठी १६ विविध ताल वाद्यांचा वापर करण्यात आला होता. ह्या नाटकाचे अप्रतिम नेपथ्य पु श्री काळे (कथा लेखक व पु काळे ह्याचे पिताश्री ) ह्यांनी केले होते व कैलासाचा रम्य देखावा गोमांतवनांतील निसर्ग त्यांनी सुंदर उभा केला होता.
या संगीत नृत्यमय खेळकर नाटकातील कलावंत होते. पं राम मराठे, प्रसाद सावकार, सुकुमार, आ. दे. पाटील, लीलावती, जयश्री आणि निर्माते भालचंद्र पेंढारकर ही सप्त सूर कलाकार मंडळी ह्यात होती.
लेखक / गीत-रचना: विद्याधर गोखले.
नाट्य दिग्दर्शन नटवर्य मामा पेंडसे
संगीत दिग्दर्शन: वसंत देसाई.
नेपथ्य: पु श्री काळे
रंगभूषा: शांताराम विचारे
साथसंगत
ऑर्गन, गोविंदराव पटवर्धन / विश्वनाथ कान्हेरे, तबला दामूअण्णा पार्सेकर/ भोजराज साळवी
व्हायोलिन: मधुकर बर्वे
त्यानंतर काही प्रयोग विश्वनाथ बागुल, माया जाधव, प्रकाश घाग्रेकर, चंदू डेगवेकर, शहाजी काळे, शिवानंद पाटील आदींनी देखील केले.
आता हे नाटक ‘आर्यादुर्गा क्रिएशन्स’ या संस्थेतर्फे केले जाते.
९० प्रयोग होऊन शतक महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या ह्या नवीन टीमचे निर्मिती सुप्रसिद्ध नाट्यकर्मी सुनील जोशींनी केली असून दिग्दर्शन ही त्यांनीच केले आहे.
संगीत मार्गदर्शक मुकुंद मराठे आणि विलास हर्षे हे आहेत.
आनंदाची बाब म्हणजे ह्या पुनरुज्जीवित नाट्यकृतीला नाट्याचार्य काकासाहेब खाडिलकर आणि देवल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मूळ प्रयोगात शंकराची भूमिका साकारणाऱ्या पं. राम मराठे यांचे सुपुत्र श्री.मुकुंद मराठे त्याच तडफदार गायकीने आणि समर्थ सकस अभिनयाने पुनरुज्जीवित नाटकात शंकराचीच भूमिका साकारत आहेत, पार्वतीची भूमिका पूनम पंडित / गायत्री दीक्षित तर भालचंद्र पेंढारकर यांनी अजरामर केलेली नारदाची भूमिका आता डोंबिवलीचे नाट्यकर्मी गायक नट सुनील दातार अत्यंत सार्थपणे खुसखुशीत सादर करत आहेत. त्यांच्यासोबत सुनील जोशी प्राजक्ता मराठे, अनुराग गर्गे संदीप राऊत हे सहकलाकार विविध भूमिकांत आहेत….
नेपथ्य प्रकाश सुधीर ठाकूर श्याम चव्हाण ह्यांचे आहे. आजही ह्या संगीत नाटकाला रसिकांची अमाप मागणी आहे. विशेष करून मुंबई पुणे कोंकण गोवा तसेच झाडीपट्टी मध्ये हे नाटक खूप लोकप्रिय आहे
संकलन : संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply