आज हरीद्वारला आलो आहे गंगाजींच्या दर्शनाला. हिला गंगा नाही, गंगाजी बोलायचं. खरंच आहे ते, हिन्दू संस्कृतीच्या शेकडो पिढ्यांच्या पोषणकर्तीला अरे-तुरे करून कसं बोलावणार..? पण आपल्या मराठी भाषेत ‘अहो-जाही’ किंवा ‘जी’ वैगेरे बोललं की उगाच अंतर पडल्यासारखं वाटतं. जेवढी व्यक्ती प्रिय, आपली, तेवढी ती अरे-तुरेतली. आईला कुठं आपण अहो म्हणतो? कुठल्या देव-देवीला कुठं अहो-जाहो करतो आपण? आणि आपला सचिन तेंडूलकर दुनियेसाठी असेल सचिनजी, पण आपल्यासाठी ‘तो सच्चू’च..तसंच गंगेचं, ती भले इतरांसाठी असेल गंगाजी, माझ्यासाठी मात्र ती ‘गंगा’चं..!
का कोण जाणे, पण मला गंगेचं प्रचंड आकर्षण आहे. तशी आजवर गंगा तिनच वेळा पाहीली, नव्हे तिचं दर्शन घेतलं. गंगा पाहीली जात नाही, तिचं दर्शन घेतलं जातं. तिचं दुरून जरी दर्शन झालं, की मन आपोआप उचंबळून येतं. दर्शन कशाला, मनात गंगेचा विचार जरी आला तरी मन प्रसन्न होतं आणि मनोमन हात जोडले जातात,आपोआप..!
हरीद्वारला गंगेचं दर्शन घ्यायची आजची तिसरी वेळ. पैकी शेवटचं दर्शन अगदी गेल्याच वर्षी घेतलं होतं, तरी आज संधी मिळाल्यावर गंगेकडे आलोच. या वेळी हरीद्वारच्या गंगा तिरावर असलेल्या ‘हर कि पौडी’ या ठिकाणी होणाऱ्या गंगा आरतीला उपस्थित राहाण्याचं भाग्य मिळालं. काय विलक्षण दृष्य होतं ते. ते शब्दबद्ध करणं अवघडंच आहे, ही अनुभवायची गोष्ट आहे..!
आरतीची वेळ सायंकाळी ७ ची असली तरी अवघा हिन्दुस्थान संध्याकाळी ५.३० पासून हर कि पौडीच्या दोन्ही तिरावर अवतरला होता. मुंगीला शिरायलाही जागा नव्हती पण आपल्यात सहसा न दिसणारी शिस्त होती त्या गर्दीत आणि ही शिस्त कार्यकर्त्यांच्या दहशतीने नव्हे, तर श्रद्धेमुळे आली होती. ‘हर हर गंगे’च्या जयघोषाने अवघा परिसर दुमदुमला होता.
संकट हारीनी जय मा गंगे,
पतितपावनी जय मा गंगे..
पालनपोषनी जय मा गंगे,
मोक्ष दायीनी जय मा गंगे..!
या आरतीचे शब्द त्या भारलेल्या पवित्र परिसरात भरून राहीले होते..
देशाच्या प्रत्येक कोपऱ्यातून आलेला माणूस त्या गर्दीत होता. प्रत्येक जातीचा, प्रत्येक वयाचा, गरीब-श्रीमंत असा प्रत्येक थरातला होता, पण त्या पवित्र ठिकाणी शेजारी जात, वय, प्रतिष्ठा वैगेरे फिजूल गोष्टी आपोआप गळून पडून तो फक्त हिन्दू उरला होता. विशाल हिन्दुत्वाचं आपल्याकडे सहसा न दिसणारं मोठं विलक्षण दृष्य होतं ते. माणूस कितीही नास्तिक असला तरी या ठिकाणी भारल्यासारखा हात जोडत होता. गंगेचा जयघोष, त्या मोठाल्या दिव्यांनी त्या सायंप्रकाशात केलेली ती गंगेची आरती आणि अक्षरक्ष: लाखो लोकांनी दोन्ही हात उंचावून गंगेला केलेला तो नमस्कार पाहून मलाही आपण या विशाल जनसमुदायाचा एक हिस्सा असल्याचा अभिमान वाटला. इथे ‘मी’पण उरतच नाही, ‘आपण’ होतो. हजारो वर्षांचं परकीय आक्रमणं सहन करूनही हिन्दुत्व जतन केलं, ते या श्रद्धेनं..!!
धर्म ग्रंथ वाचून कळत नाही, संतवचनांनी कळत नाही, देवळात तर तो त्याहूनही कळत नाही. धर्म कळतो, समजतो तो असा मोकळ्या आभाळाखाली, वाहत्या नदीकिनारी, उन्नत पर्वत माथ्यावर आणि स्वत:च धर्म बनलेल्या विशाल जनसमुदायामध्ये..!!.देव-धर्म-संस्कृती कळून घ्यायची असेल तर अशा ठिकाणी यायलाच हवं.
उगाच नाही आपल्या समृद्ध पूर्वजांनी. मोकळ्या आकाशाला देव मानलं, नदीला देव केलं, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे असा मंत्र दिला. पूर्वजांच्या या सांगण्यामागचा हेतूच आपण लक्षात घेतला नाही व धर्म कुठल्यातरी ग्रंथात व देवळातल्या मुर्तीत शोधत बसलो..
-नितीन साळुंखे
9321811091
२२ मे, २०१७
हरीद्वार
Leave a Reply