नवीन लेखन...

जयंत नारळीकर

खगोलशास्त्रज्ञ व लेखक जयंत नारळीकर यांचा जन्म १९ जुलै १९३८ कोल्हापूर येथे झाला.

आपल्या भारत देशाने जगाला अनेक गणितज्ञ आणि खगोल वैद्यानिक दिले आहेत. अश्या थोर असामी पैकी एक आहेत डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर. डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर हे एक थोर शास्त्रज्ञ तर आहेतच पण उत्तम लेखकही आहेत. त्यांनी फक्त विज्ञान विषयावर गंभीर पुस्तकेच नाही लिहिली तर विज्ञानाची छटा असलेल्या कादंबऱ्या सुद्धा लिहिल्या आहेत. जयंत विष्णू नारळीकर यांचे वडील विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ, वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित विभागचे प्रमुख होते. त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर ह्या संस्कृत विदुषी होत्या. जयंत नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले. त्यांनी दहावीला असतानांच मोठी आकृती, प्रमेय, उपप्रमेय अशा स्वरूपातील दोन पानांचा पायथागोरसचा सिद्धांत अर्ध्या पानात मांडून दाखविला होता.

१९५७ साली त्यांनी विज्ञानाची पदवी (B.Sc.) प्राप्त केली.या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज येथे गेले. तेथे त्यांना बीए, एमए व पीएचडी च्या पदव्या मिळाल्या. शिवाय, रँग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल व इतर अनेक बक्षिसे मिळाली. १९६६ साली फ्रेड हॉईल यांनी ‘इन्स्टिटय़ूट ऑफ थिऑरॉटीकल ऍस्ट्रॉनॉमी’ नावाची संस्था सुरु केली ज्याच्या स्थापनेत डॉ. नारळीकरांनी महत्वाची भूमिका बजावली. १९६६ पासून १९७२ पर्यंत ते या संस्थेत कार्यान्वित होते. या दोन्ही शास्त्रज्ञांनी मिळून गुरुत्वाकर्षणावर एक सिद्धांत मांडला ज्याला ‘हॉईल – नारळीकर सिद्धांत’ असे म्हणतात. तो सिद्धांत सांगतो कि, वस्तूच्या कणांचे अंतर्गत वस्तुमान हे त्या वस्तूतील सर्व कणांच्या एकत्रित कार्याची परिणीती असते.

१९७२ साली नारळीकर मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (टीआयएफआर) येथे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. टीआयएफआरमध्ये ते सैद्धांतिक खगोलशास्त्रीय ग्रुपचे मुख्य अधिकारी होते. १९८८ मध्ये भारतीय विद्यापीठ अनुदान कमिशनने पुण्यात खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र साठी अंतर-विद्यापीठ केंद्राची (आययूसीएए) स्थापन केली आणि नारळीकर आययूसीएएचे संस्थापक संचालक झाले. १९८१ मध्ये, नारळीकर जागतिक सांस्कृतिक परिषदेचे संस्थापक सदस्य झाले. नारळीकर हे त्यांच्या विश्वनिर्मितीशास्त्र मधील कार्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी लोकप्रिय बिग बॅंग मॉडेलसाठी मांडलेले पर्यायी मॉडेल विशेष प्रसिद्ध आहे. ते काही काळ आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघाच्या विश्वनिर्मितीशास्त्र आयोगाचे अध्यक्ष होते. एनसीईआरटी (शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद) द्वारे प्रकाशित होणारी विज्ञान आणि गणित या विषयाची पुस्तके विकसित करण्यासाठी जबाबदार सल्लागार गटाचे अध्यक्ष म्हणून नारळीकर यांची नियुक्ती झाली होती.

डॉ. जयंत नारळीकर एक प्रसिद्ध शास्त्रज्ञ आहेतच सोबतच ते एक प्रभावी लेखक सुद्धा आहेत. त्यांनी अनेक विज्ञानकथा लिहून मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे. वामन परत आला, अंतराळातील भस्मासुर, कृष्णमेघ, प्रेषित, व्हायरस, यक्षाची देणगी, टाईम मशीनची किमया, याला जीवन ऐसे नाव असे अनेक कथासंग्रह त्यांनी प्रसिद्ध केले आहेत जे वाचकाला अगदी सुरवातीपासून शेवटच्या पानापर्यंत खिळवून ठेवतात. यक्षाची देणगी या त्यांच्या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारही मिळाला आहे. याशिवाय त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. आकाशाशी जडले नाते, विमानाची गरुडझेप, गणितातील गमतीजमती, विश्वाची रचना, विज्ञानाचे रचयिते, नभात हसरे तारे यासारखी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली ज्यामुळे साध्या सोप्या भाषेत सामान्य माणसाला विज्ञान आणि गणित सारखे विषय समजावता येतील. डॉ. नारळीकरांची ही पुस्तके म्हणजे कधीही न आटणारा ज्ञानाचा झरा आहे आणि कितीही वेळा वाचली तरी या पुस्तकांचा वीट येत नाही. पण त्यांचे साहित्यिक कार्य मराठी पुरतेच मर्यादित नाही तर ते इतर भारतीय भाषांमधील गणित आणि विज्ञान विषयांची पुस्तके आभ्यासाच्या दृष्टीने सुयोग्य बनविण्याचे कामही करत आहेत.

अनेक राष्ट्रीय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी त्यांचे काम पाहून त्यांचा विविध प्रकारे सन्मान केला आहे. १९६५ साली भारत सरकारने त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार देऊन आणि २००४ मध्ये पद्मविभूषण हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. या सोबत त्यांना डॉ. भटनागर स्मृती पारितोषिक, एम. पी. बिरला सन्मान तसेच फ्रेंच ऍस्ट्रॉलॉजिकल सोसायटीचे पिक्स ज्यूल्स जेन्सन यासारखे अनेक सन्मान त्यांना प्रदान करण्यात आले आहेत. डॉ. नारळीकर लंडनच्या रॉयल ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे सहाधिकारी आहेत तसेच इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी आणि थर्ड वर्ल्ड अकॅडमी ऑफ सायन्सेस या संस्थांचे ते अधिछात्र आहेत. इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीद्वारे देण्यात येणारे इंदिरा गांधी पारितोषिक सुद्धा त्यांना देण्यात आले आहे. वैज्ञानिक विषयातील त्यांचे साहित्य पहाता, विज्ञानाचा प्रसार करण्यासाठी त्यांना १९९६ साली युनेस्कोने कलिंग पारितोषिक दिले आहे.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..