जयश्री गडकर यांनी बालकलाकार म्हणून अभिनयाची कारकिर्द सुरू केली. त्यांचा जन्म २१ फेब्रुवारी १९४२ रोजी कणसगिरी, कारवार जिल्ह्यात झाला. १९५४ साली व्ही. शांताराम यांच्या ‘झनक झनक पायल बाजे’ या चित्रपटात एका गाण्यात संध्या यांच्यामागे समूहात नृत्य करणारी एक कलाकार म्हणून जयश्री गडकर यांनी सुरवात केली. १९५५ साली रशियन नेते कुश्चेव्ह आणि बुल्गानिन यांच्या हिंदुस्थान दौऱ्यातील पुणे भेटीवेळी संगीत दिग्दर्शक वसंत देसाई यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांनी नृत्य केले. ते नृत्य पाहूनच दिग्दर्शक दिनकर द. पाटील यांनी जयश्री गडकर यांना “दिसतं तसं नसतं’ चित्रपटात लावणी नर्तिका म्हणून भूमिका दिली. भालजी पेंढारकर यांनी “गाठ पडली ठका ठका’ या चित्रपटात त्यांना प्रथम नायिकेची संधी दिली. सूर्यकांत त्यांच्या नायकाच्या भूमिकेत होते. त्यानंतर या जोडीचे अनेक चित्रपट गाजले. त्यातल्या “बुगडी माझी सांडली गं’ या गाण्याला आणि नृत्याला लोकांनी डोक्यावर घेतलं.
तमाशाप्रधान ग्रामीण चित्रपटाची नायिका अशी त्यांची ‘ओळख’ घट्ट झाली असता त्या शहरी भूमिकेला न्याय देऊ शकणार नाहीत, अशा होणाऱ्या चर्चेला त्यांनी ‘मानिनी’ चित्रपटातूनच चोख उत्तर दिले. दिग्दर्शक अनंत माने यांच्या १९ चित्रपटांतून त्यांनी भूमिका केल्या व त्यांना त्या आपल्या गुरू मानत. हंसा वाडकर यांच्यानंतर तमाशा – लावणीपटात त्यांची जागा कोण भरून काढेल आणि सोज्वळ, सात्विक भूमिका करणा-या सुलोचनाबाईंच्या जागी कोणाला घ्यावं, या प्रश्नाना जयश्री गडकर यांनी आपल्या चतुरस्त्र आणि कसदार अभिनयाने उत्तर दिलं. अष्टपैलू अभिनेत्री असाच यांचा वावर मराठी चित्रपटसृष्टीत राहिला. १९५९ साली आलेल्या अभिनेत्री हंसा वाडकर यांच्या जीवनावरील “सांगत्ये ऐका’ या चित्रपटाने इतिहास घडवला. ‘”सांगत्ये ऐका’पासून दिग्दर्शक अनंत माने आणि नायिका जयश्री गडकर असे यशस्वी चित्रपटाचे समीकरण तयार झाले.
तमासगिरीणीची भूमिका साकारणाऱ्या जयश्री गडकर यांनी त्याच ताकदीने “मानिनी’मधली सालस, सात्त्विक, सोशीक पण जिद्दी मालती साकारली. “साधी माणसं’ चित्रपटात त्यांनी मेकअप न करता लोहाराच्या पत्नीची भूमिका साकारली. “मोहित्यांची मंजुळा’, “पवनाकाठचा धोंडी’, “एक गाव बारा भानगडी’, “मल्हारी मार्तंड’, “अशीच एक रात्र होती’, “लाखात अशी देखणी’, “सुगंधी कट्टा’ हे त्यांचे चित्रपट ग्रामीण आणि शहरी भागात तुफान गाजले.”जिव्हाळा’ चित्रपटातील त्यांच्या तोंडी असलेले “या चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे अपुल्या’ हे आर्त गाणे आणि त्यावेळचा अभिनय आजही रसिकांच्या स्मरणात आहे. “घरकुल’ चित्रपटातील “पप्पा सांगा कुणाचे’ हे अरुण सरनाईक यांच्यासोबतचे त्यांचे गाणेही खूप प्रसिद्ध झाले.
मराठी, हिंदी, पौराणिक अशा २५० चित्रपटांत त्यांनी काम केले. रामानंद सागर यांच्या “रामायण’ मालिकेत त्यांनी कौसल्येची भूमिका केली. त्यांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत त्यांना तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार, पाच वेळा महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार, २००३ साली व्ही. शांताराम पुरस्कार आणि २००८ साली “चित्रभूषण’ पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले होते. त्यांच्या महत्त्वाच्या चित्रपटांच्या नावांत ‘सांगत्ये ऐका’, ‘अवघाची संसार’, ‘मानिनी’, ‘रंगपंचमी’, ‘शाहीर परशुराम’, ‘बाप माझा ब्रह्मचारी’, ‘मोहित्यांची मंजुळा’, ‘सवाल माझा ऐका’, ‘वैशाख वणवा’, ‘साधी माणसं’, ‘पाटलाची सून’, ‘एक गाव बारा भानगडी’, ‘जिव्हाळा’, ‘घरकुल’, ‘सुगंधी कट्टा’ यांचा समावेश होतो.
जयश्री गडकर यांनी “सासर-माहेर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते, तर “अशी असावी सासू’ या चित्रपटाची निर्मिती, कथा, लेखन, दिग्दर्शन केले होते. अभिनेते बाळ धुरी हे त्यांचे पती. जयश्री गडकर यांचे २९ ऑगस्ट २००८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
जयश्री गडकर यांचा जीवनपट
जयश्री गडकर यांची गाणी
https://www.youtube.com/watch?v=Ux154gVQE6Q&list=PLrw5tGo-hU-v_Vm7TnEyN0Dme7V4X4ZeG
Leave a Reply