राज कपूर साठी रचलेल्या या गीतपंक्ती दोनदा खऱ्या ठरल्या – १९८७ साली त्याच्या मृत्यूच्यावेळी आणि आता २०१९ मध्ये त्याने निर्मिलेली हिंदी चित्रसंस्कृतीची वास्तू ” आर के स्टुडीओ “अस्तंगत होत असताना ! हे गीतकाराचे द्रष्टेपण म्हणायचे कां ? येणाऱ्या काळाची चाहूल इतकी आधी लागू शकते कां ? कदाचित हे चिरंतन सत्य काहींना आधीच कळत असावे.
राज कपूरला मी “तरुण भारत ‘मधल्या मृत्युलेखात “निळ्या डोळ्यांचा जादूगार “असे संबोधले होते. या गृहस्थाने स्वप्न बघायला शिकवले. पांढऱ्या पडदयावर प्रेम करणाऱ्या आमच्या डोळ्यांत मावणार नाहीत अशी स्वप्ने त्याने पेरली. या स्वप्ननिर्मितीला पूरक असा कारखाना त्याने “आर के स्टुडिओ ” या नांवाने सुरु केला. सहसा असे धाडस कलावंत करत नाहीत. पण हा कलावंत काही वेगळाच होता – निर्माता ,दिग्दर्शक ,संगीतात अभिरुची आणि चित्रफ्रेमचे अचूक ज्ञान असलेला !
त्याच्या कलाकृतींचा साक्षीदार असलेला हा वारसा आता काळाच्या पडद्याआड जायला निघालाय. त्याच्याबरोबर असंख्य स्वप्नेही मातीत मिसळणार आहेत.
राज कपूरच्या (कर्तृत्ववान?) पिढीला हे जोपासावे कां वाटले नाही ? वडिलांची (काही ) स्वप्ने मुलांची होउ शकत नाही कां ? प्रत्येकवेळी ” आमचे डोळे ,आमची स्वप्ने ” असेच असायला हवे कां ? मायबाप सरकारलाही हें काळाचे प्रतिबिंब जपण्यासाठी काही करावेसे वाटले नाही कां ? दरवेळी साक्षीदार उध्वस्त कां करायचे ? एखादया कॉर्पोरेट क्षेत्रातील कंपनीला पुढे येउन “CSR” चा हात द्यावासा का वाटला नाही ? चित्रसृष्टीतील कलावंत या वास्तूच्या संरक्षणासाठी कां पुढे आले नाहीत ?
ही भग्न वास्तू आता गाशा गुंडाळणार आणि तिच्या जागी एखादी टोलेजंग इमारत गोदरेज बांधणार !
१९८२ साली हेम्या RCF ला गेला आणि पहिल्यांदा मी हा स्टुडिओ जवळून पाहिला. त्यानंतर अनेकदा मुंबईला जाता -येताना भक्तिभावाने चेंबूर आले की आरके च्या लोगोकडे लक्ष जायचे. आतमध्ये आठवणींची पडझड व्हायची , वरकरणी सगळे ठाकठीक ! देवनार आणि चेम्बूरवर आरकेने आपली नाममुद्रा उठवली होती. आता ती फक्त माझ्या आत राहणार ! स्वप्नांच्या सौदागराची कर्मभूमी नामशेष होणार. आपणही ही पडझड वेळीच आवरायला हवी, इतरांनी पाडण्याआधी !
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply