आज पहाटे पाचच्या सुमारास मला बेडरूममध्ये उजेड दिसल्यानं, जाग आली. माझ्या बेडशेजारीच वाचनीय पुस्तकांचं रॅक आहे. त्या उभ्या मांडलेल्या पुस्तकांच्या गठ्यातील एक पुस्तक प्रकाशमान झालेलं होतं.. मी उठून पाहिलं तर ते माझं आवडतं, ‘एकटा जीव’ हे पुस्तक होतं.. ते गठ्यातून थोडंसं बाहेर आलं आणि दादांच्या आवाजात माझ्याशी बोलू लागलं…
‘नावडकर, दचकलास ना? माझी खूप दिवसांपासून इच्छा होती की, तुझ्याशी बोलून स्वतःचं मन एकदा मोकळं करावं.. आज तारखेनुसार माझा जन्मदिवस! बरोब्बर एकोणनव्वद वर्षांपूर्वी याच तारखेला, गोकुळाष्टमीच्या दिवशी मी मुंबईत जन्माला आलो..
माझे वडील गिरणी कामगार होते. चाळीतल्या सवंगड्यांबरोबर उनाडकी करण्यात माझं बालपण गेलं. आई-वडिलांचं छत्र हरपल्यावर मी ‘अपना बाजार’ मध्ये काही वर्ष नोकरी केली. त्यातही माझं मन रमेना, म्हणून मी बॅण्ड पथकात काम करु लागलो. त्यानिमित्तानेच राष्ट्र सेवा दलात मी सहभागी झालो. त्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून निळू फुले, राम नगरकर यांच्याशी माझी मैत्री झाली.
कला पथकात काम करीत असताना वसंत सबनीस यांची भेट झाली. त्यांनी लिहिलेल्या ‘विच्छा माझी पुरी करा’ या वगनाट्यानं माझं जीवनच बदलून गेलं. या नाटकाने मला यश, पैसा, कीर्ती सर्वकाही दिलं. ‘विच्छा’चे १५०० हून अधिक प्रयोग करताना मी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. सामान्य प्रेक्षकांपासून ते दिग्गज साहित्यिक, पुढारी, राजकारण्यांपर्यंत सर्वांना या नाटकाने वेड लावलं. समोर प्रेक्षकांत बसलेल्या अतिमहारथींवर मी ॲडीशन घेत असे, त्या माझ्या हजरजबाबीपणाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळे..
या वगनाट्याद्वारे झालेल्या कमाईतून मी एक लाॅज सुरु करायचा विचार करीत होतो, तेव्हा बाबांनी मला चित्रपट निर्मितीचा सल्ला दिला.. आणि ‘सोंगाड्या’ची निर्मिती झाली. एका गिरणी कामगाराचा मुलगा, पहिल्याच प्रयत्नात रौप्यमहोत्सवी मराठी चित्रपटाचा ‘यशस्वी निर्माता’ झाला..
नंतर मी मागे वळून पाहिलेच नाही.. एकापाठोपाठ विनोदी चित्रपटांच्या निर्मिती बरोबरच अभिनय, गीत लेखन, दिग्दर्शनही करु लागलो. माझे सलग सात चित्रपट रौप्यमहोत्सवी झाले.
हिंदी चित्रपटसृष्टीतील मेहमूद, अमजद खान, इत्यादींना घेऊन मी हिंदी चित्रपट निर्मिती केली. त्यामुळे संपूर्ण भारतात माझं नाव झालं..
मी स्वतःला सतत कामात गुंतवून घेत होतो.. एक चित्रपट झाला की, दुसऱ्याची तयारी करीत होतो. कारण मी एकटा होतो, मला आयुष्यात सुख असं कधी मिळालंच नाही.. छंद म्हणून मित्रांना घेऊन शिकारीला जायचो, तर कधी मनःशांती साठी गोव्याला जाऊन कामाक्षी देवीचं दर्शन घेऊन यायचो..
वयाच्या चौसष्टाव्या वर्षापर्यंत मी दिवसरात्र काम केले. आर्थिकदृष्ट्या सधन झालो. जमिनी घेतल्या, फ्लॅट घेतले तरीदेखील माझी चित्रपट निर्मिती ही चालूच होती.
कन्नड चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते राजकुमार, हे माझे खास मित्र होते. त्यांनी केलेला एक चित्रपट मला फार आवडला होता. मला त्या चित्रपटावरुन मराठी चित्रपट करण्याची इच्छा होती. त्यादृष्टीने मी जुळवाजुळव सुरू केली. चित्रपटाचं नाव ठरलं.. ‘वाजवू का?’
या चित्रपटाचं पहिलं शेड्युल इंगवलीला पार पडलं. मी रशेस पाहिले आणि ठरवलं, आत्ताचं झालेलं चित्रीकरण मनासारखं झालेलं नाहीये.. आपण पुन्हा शुटींग करायचं.. आधीच्या स्टिल फोटोग्राफरला, दुसऱ्या शेड्युलसाठी बोलावल्यावर त्याने टाळाटाळ केली. त्यावेळी तुझं नाव पुढं आलं..
तू देखील लगेच तयार झालास. आपण तीन महिने शुटींग करीत होतो. मला आठवतंय, तुझ्या खांद्यावरील त्या दोन जड कॅमेऱ्यांच्या ओझ्यानं तू कधीही कंटाळलेला दिसला नाहीस. उत्साहाने सतत युनिटबरोबर राहिलास. चित्रपट तयार झाला. तुम्ही दोघांनी चित्रपटाच्या जाहिरातींची बाजू उत्तम सांभाळली. माझं ‘वाजवू का?’ चित्रपटाचं स्वप्न पूर्ण झालं..
माझ्या सर्व चित्रपटात प्रेक्षकांना पोट धरुन हसवणारा मी, ‘वाजवू का?’ तील अभिनयाने त्यांना भरपूर रडवलं.. या चित्रपटाच्या शेवटी मी देवाघरी जातो, असं दाखवलं होतं.. आणि वर्षभरातच, दुर्दैवानं ते खरं ठरलं..
१४ मार्च १९९८ च्या पहाटे मी इहलोक सोडला.. सहासष्ट वर्षांच्या आयुष्यात मी जीवनातील चढ-उतार पाहिले, यश-अपयश पाहिलं, नातीगोती पाहिली, श्रीमंती-गरीबी पाहिली, दुनियादारी पाहिली.. या मायानगरीत भेटलेल्या असंख्य मुखवट्यांमधून, मी खरा ‘चेहरा’ शोधत राहिलो.. कुणालाही मी नको होतो, माझ्याकडूनच प्रत्येकाला काही ना काही हवं होतं.. मनोहर कोलते सारखा एखादाच माणूस सोडला, तर माझ्यावर निरपेक्ष प्रेम करणारं कुणीही नव्हतं.. आयुष्यात जे काही मिळवलं ते तिथंच सोडून मी आता स्वर्गात ‘रमलो’ आहे…
खाली असताना, ज्या जवळच्या माणसांना भेटण्यासाठी मला कधी वेळ काढायलाही जमायचं नाही, त्या सगळ्यांना मला इथं निवांतपणे भेटता येतं.. ते म्हणजे माझे आई-वडील, भालजी पेंढारकर, बाळासाहेब ठाकरे, एन.एस. वैद्य, रत्नमाला, निळू फुले, राम नगरकर, शरद तळवलकर, वसंत शिंदे, दादा दामले, शरद पै, गिरीश कर्वे, रत्नाकर लाड, इत्यादी. मी आता माझ्या जवळच्या माणसांत, छान ‘रमलेलो’ आहे.. माझं ‘एकटेपण’ आता नावालाही राहिलेलं नाहीये..’
त्या पुस्तकातून पडणारा प्रकाश हळूहळू कमी झाला व शांतता पसरली.. मी घड्याळात पाहिलं, तर सकाळचे सहा वाजले होते..
स्वर्गीय दादांना.. आजच्या जन्मदिनी, विनम्र अभिवादन!!
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
८-८-२१.
Leave a Reply