जीवन असावं पिकल्या आंब्यागत
मोहकगोड, रसाळ, सतेज रसरशीत
जीवन असावं चंदनाच्या खोडागत
ललाटं रेखून अनेकांची रहावं दरवळत
जीवन असावं देवाजीचा देव्हारा
पावित्र्याच्या ज्योतीने उजळावा गाभारा
आयुष्याच्या ढालीने सग्यासोयऱ्यांना जपावं
उकळत्या दुधावर कसं सायीगत पसरावं
जीवन असावं स्वच्छ अंगण मोकळं
सर्वांसाठी एैसपैस मध्ये तुळशीचं खळं
जीवन असावा एक आधारवृक्ष
विशाल, समृद्ध, शीतल सावलीछत्र
जीवन असावं टवटवीत नित जिवंत
मोह व्हावा मृत्यूसही स्पर्शण्या हरक्षणात
जीवन आहे देवाचं देणं, वांछिल तो तेव्हा ते समर्पण
तोवर सजवावं, तोऱ्यात मिरवावं, समाधानी लेवून तृप्तीचं लेणं
जीवन व्हावं असंख्य कणांचं, सुगंधी नि रंगीबेरंगी क्षणांचं
उत्कटतेने, उदंडतेने, उधळत वहावं, जुळून नातं मनामनाचं
— यतीन सामंत
ऋणानुबंध या कवितासंग्रहातून
Leave a Reply