प्रभूची लीला न्यारी, विश्वाचा तो खेळकरी
कुणी न जाणले तयापरी, हीच त्याची महीमा १
जवळ असूनी दूर ठेवतो, आलिंगुनी पर भासवितो
विचित्र त्याचा खेळ चालतो, कुणी न समजे त्यासी २
मोठ मोठे विद्वान, त्यांत कांहीं संतजन
अध्यात्म्याचे ज्ञान घेवून, विश्लेषण करती प्रभूचे ३
कांहीं असती नास्तिक, कांहीं असती आस्तिक
त्यांत काही ज्ञानी मस्तिक, चर्चा करिती प्रभूची ४
सत्य परिस्थिती ऐसी, कुणी न जाणले प्रभूसी
सर्वांची चालना तर्कासी, प्रभूच्या अस्तित्वाविषयी ५
फक्त एकमुखी वाच्यता, असे ती सर्वता
महान शक्ती असता, ह्या ब्रह्मांडामध्ये ६
सर्वांनी जाणले एक, ‘अपूर्व शक्ती’ ह्याचा चालक
त्याच ऊर्जेचे हे प्रतीक, सारे विश्वमंडळ ७
कुणा नाही दुजा भाव, समजोनी त्या शक्तीची ठेव
ज्ञानी देती नाव, निरनिराळी त्या शक्तीसी ८
कुणी म्हणती राम, कुणी म्हणे रहीम
कुणी संबोधती गौतम, येशू असे कुणाचा ९
परी तत्व नसे वेगळे, नावे होत निरनिराळे
सामान्यास ते न कळे, हीच खरी शोकांतिका १०
सारे जीवन निघून जाई, परी त्या शक्तीचा बोध न होई
विश्लेषण करीत राही, त्याच्या अस्तित्वाविषयी ११
जाणावी ती शक्ती, रूप आकार त्यास नसती
शक्ति समजोनी करावी भक्ती, आदर भाव ठेवून १२
मानवजन्म श्रेष्ठ ठरविला, विशेष बुद्धी मिळून त्याला
विचार शक्ती उपजण्याला, मानवामध्ये १३
बहूत झाले विद्वान, कर्तव्य करूनी मिळवी मान
मानव जातीची ती शान, ह्या संसारी १४
मार्ग निरनिराळे दाखवी, सारे मिळती एक ध्येयी
सर्वार्पण त्या शक्ती होई, ध्येय मिळतां जीवनाचे १५
विचार करा मनाशी, आपले वैर आपणाशी
नसते केव्हां प्रभूशी, हेच मूळ दु:खाचे १६
वाद नसतो ध्येयापरी, चर्चा असे मार्गापरी
हीच मानव निर्मिती खरी, सर्व सुख दु:खाची १७
तथा कथित पंडित, सामान्यांत विद्वान होत
ज्ञान त्यांचे थोडेसे जास्त, बहुजनां पेक्षा १८
वापरूनी ज्ञान शक्ती, सामान्य जनांस वाकविती
आपले अस्तित्व स्थापती, प्रभू शक्तीशी विसरून १९
तर्क शक्ती थोर, आहे चा नाही करणार
नाही ना आहे म्हणणार, ज्ञानाचा खेळ करूनी २०
मार्गाचे करूनी भेद, करीत राही वाद
जीवन करी बरबाद, विसरूनी ध्येयासी २१
ध्येय असे महान, मार्ग हे साधन
साधनास साध्य समजोन वाया जाई आयुष्य २२
साध्य नका समजू साधनासी, ठेवा विश्वास साध्यासी
कोणत्याही साधनाने जातासी, साधका प्राप्त होई ध्येय साध्य २३
निरनिराळ्या मार्गाचे प्रयोजन, ज्ञान शक्ती वापरून
स्वअस्तीत्व ठेवण्या टिकवून, केले असे २४
अस्तित्वाची भावना मोठी, प्रत्येक झगडतो त्यासाठी
आयुष्य खर्ची त्या पोटी, सकळ ज्ञान २५
न कळे त्यास देवपण, भांडण्यास जाई विसरून
आयुष्य मातीमोल, करून टाकीत असे २६
विसरूनी जा सर्व भेद, मिटवून टाका वादविवाद
लहान मोठ्याचा संवाद, नष्ट करा त्वरीत २७
सारेच आहेत छोटे, कुणी नसती मोठे
हे केवळ आपपासातील तंटे, मानवनिर्मित असती २८
जात धर्म होत अनेक, हे मानव निर्मित प्रतिक
सर्व मार्गाचे ध्येय एक, न कळे अज्ञानामुळे २९
म्हणून जाणावा ईश, सार्थकी लावा आयुष्य
जात धर्माचे पाश, सोडून घ्यावे ३०
महान शक्ती तीच ईश्वर, दुसरा नसे कोणी वर
आपणच देतो त्यासी आकार, सगुण रुप देवूनी ३१
मानवता हाच धर्म खरा, आपसातील भेद विसरा
प्रभू देई तयाना आसरा, जीवन सुखी करण्या ३२
दुसऱ्याची दु:खे जाणा, त्यांच्या सुखात आनंद माना
प्रभू अंश त्यासी म्हणा, हीच जीवनाची गुरू किल्ली ३३
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply