‘मुंबई ‘…..
तीन अक्षरांचा शब्द. याच तीन अक्षरांमध्ये कितीतरी अमर्याद,खोल,अथांग,चिरायूशी,अखंड ,अविश्रांत असे जीवन दडलेले आहे . प्रत्येक दिवशी नवे आव्हान पेलून सक्षम पणे मार्गक्रमण करण्याची जिद्द येथील मनुष्याला असते. दिवसाची सुरुवात येथे धावपळीत सुरू होते. वीतभर पोटासाठी सकाळी उठून येथील रहिवाशांना घाई गडबडीत प्रातर्विधी उरकून कसाबसा चहा किंवा बिस्किटे किंवा साधा नाश्ता पोटामध्ये ढकलून रस्त्यावरच्या वर्दळीतून माग काढत ट्रेन साठी धावावे लागते , स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडावे लागते. किड्या मुंग्यांसारखी माणसे, भयानक गर्दी आणि त्यातूनच प्रत्येक माणूस स्वतःला पण त्यातीलच एक कीटक मानत धक्के खात तो मार्गक्रमण करत असतो.
कामावर येताना जाताना पंधरा सेकंदाच्या धक्के खात धक्का बुक्की करत त्याला लोकल मध्ये घुसावे लागते , कधी जीवाशी खेळून लोंबकळतो..लटकतो ,आणि घामाने भिजलेल्या, थिजलेल्या, ओथंबलेल्या गर्दीमध्ये स्वतःला जमेल तेवढे आकसून घेऊन थांबा येईपर्यंत उभे राहतो. दरम्यान मधील थांब्यामध्ये उतरणारी चढणारे प्रवासी धक्काबुक्की करतात ,त्यातून एखाद्या चिवट चिलटाप्रमाणे घट्ट राहून तो डोक्यामध्ये असंख्य विचारात गूंग आपल्या थांब्यावर उतरतो. तेथून पुन्हा आपल्या कामापर्यंत पोचण्यासाठी ती गर्दी , वाहनांची वर्दळ यातून स्वतःला जपत तो आपल्या कामावर वेळेत हजार राहतो. कधी उशीर झाला तर वरिष्ठ लोकांची बोलणी खातो. चुकी त्याची नसते उशिरा येण्याची … चुकी हि मुंबईची असते .. तिथल्या वातावरणाची असते तेथील कधी कधी उशिरा धावणाऱ्या ट्रेन ची असते. मुंबईच्या परिस्थितीची असते, अगणित वाहनांच्या मुळे होणाऱ्या ट्रॅफिक जामची असते ,घरी आज न आलेल्या पाण्याची असते , मुंबईच्या गर्दीची असते .. पण बिचार्याला निमूटपणे ऐकून घ्यावे लागते . आठ, नऊ,दहा, अकरा तास काम करतो ..दुपारी घरून आणलेला डब्बा खातो… काही वेळेस अशी स्थिती येते की त्यांना वडापाव वर आपली भूक भागवावी लागते. सर्वांनाच सकाळी घरून डब्बा भेटेल याची शाश्वती नसते, त्यामुळे बाहेरच बारीक-सारीक खाऊन त्याला दिवस घालवावा लागतो. त्यामध्ये मुंबईच्या ‘वडापाव’ ची कामगिरी फार मोलाची आहे. कितीतरी लोकांची भूक भागविण्याची जबाबदारी त्याच्यावर असते. कित्तेक लोक वडापाव खाऊन दिवस ढकलत असतात. मध्यमवर्गीय आणि त्याहून गरीब असणाऱ्या लोकांना अशा या प्रचंड गर्दीच्या महानगरी मध्ये तग धरून जगण्यासाठी हा वडापाव मोलाची कामगिरी बजावत असतो. संध्याकाळीपुन्हा घरी जायची घाई सुरु. पुन्हा गाड्या , त्या रांगा या सर्वातून वाट काढत ट्रेन साठी धावपळ करून तो ट्रेन पकडतो. काम करून थकवा आलेला असतो . शिन आलेला असतो , मरगळ आलेली असते. त्यातून कसातरी आपल्याच विचारांच्या धुंदीत तो आणि त्याची ती ट्रेन मार्गक्रमण करत असते . घरी आल्यावर फ्रेश होऊन टीव्ही समोर काहीतरी पाहत बसतो.घरी शाळेतून ,कॉलेजमधून मुले आलेली असतात .पत्नी असते. थकून आल्यामुळे शांतपणे टीव्ही पाहत बायकोशी तिची मधूनच मुलांची विचारपूस, अभ्यासाची विचारपूस करत तो टीव्ही समोर बसून राहतो .जेवण होईपर्यंत थोडासाच संवाद त्याच्या आणि मुलामध्ये होतो . जेऊन झाल्यावर थकून आल्याने तो लगेच झोपी जातो कारण पुन्हा सकाळी कामावर जायचं असत .अलार्म लावतो झोपी जातो. दुसऱ्या दिवशी दिवस नवा पण तीच दैनंदिन कामे .उठणे , प्रातर्विधी, चहा, नाश्ता , धावपळ,ट्रेन,गर्दी,गाड्या ,या सगळ्या व्यापातून , टिच भर पोट भरण्याच्या केलेल्या पराकाष्ठेतून त्याला ‘जीवन’ म्हणून जगण्यासाठी कधीच उसंत मिळत नाही. जीवनाचा अर्थ त्याला कधीच उमजत नाही या शिणलेल्या आयुष्या पलीकडेही एखादे जग असते आणि आपल्याला त्याचा उपभोग घ्यायचा आहे, याचा विचार करण्याइतपत ही त्याला उसंत नसते.
कुटुंबासाठी ,मुलांसाठी,त्यांच्या भविष्यासाठी,त्यांच्या शिक्षणासाठी त्याला धडपड करून सकाळी कामावर जायला उठावंच लागत. प्रसंगी तो गाड्यावरचा वडापाव खातो नि आपली भूक भागवतो . हा कुटुंबाच्या जबाबदारीचा भार घेऊन तो आपला प्रत्येक दिवस कंठत असतो.एखाद्या विशाल वटवृक्षासारखा कुटुंबाचे ओझे तो पेलून धरतो. तुटपुंजा पगार . आणि त्याला वाटा हजार अशी एकंदरीत परिस्थिती असते.मुलांचे शिक्षण ,कपडे, त्यांचे क्लासेस, फीस , घरचा उदरनिर्वाह, थोड्याफार बायकोच्या मागण्या असतात . या सगळ्यातून कशीतरी वाट काढत ,त्यांच्या मागण्या पूर्ण करत , एक खंबीर नेतृत्व करत एक एक दिवस तो ढकलीत असतो . या जबाबदारीच्या ओझ्यामुळे त्याला मात्र त्याच्या स्वतःच्या आवडीनुसार जगायला कधीच मिळत नाही. किंबहुना त्याला तसा अधिकारच नसावा ..सर्वांच्या व्यथा तो ऐकून घेतो आणि सोडवतो पण त्याचीच व्यथा तो कोणाला सांगू शकत नाही. हे दुःख पोटामध्येच साठून ठेवतो.अतिशय संकुचित असे साधारण जीवन तो जगतो . दिवस सरत जातात.
मुंबई ….. इथे सवांची हीच अवस्था आहे . जीवन जगण्यातला आनंद ,मजा ,अनुभव ,रस ,अभिरुची त्याला आपल्या जबाबदारीच्या आव्हानापुढे चाखता येत नाही . आठवड्यातून एखादी सुट्टी मिळत असते तो ती कुठे फिरायला ,मौज करायला जात नाही . तेवढीच विश्रांती म्हणून तो दिवस तो झोपून घालवतो . अशीच प्रत्येक कामगाराची , तेथील व्यक्तीची स्थिती असते. येथील जीवन एकदम धावपळीचे आहे . कोणी कोणासाठी थांबत नाही. यादरम्यान दिवसातून कित्येक जीव जातात. अपघात ,आग,ब्रिज कोसळणे,लोकल मधून पडणे,अशी भरपूर कारणे असतात .कित्येक कुटुंबे उध्वस्त होत असतात.फार बिकट अवस्था होऊन बसते मुंबईत .कधी काय घडेल याचा नेम नसतो .. पण त्यातूनही दररोज नव्या उमेदीनं नवा दम घेऊन मुंबई आपलं नेहमीचे काम करत असते, ना कोणासाठी थांबते, ना कोणासाठी रडते, ना कोणाच्या लफड्यात पडते . कितीतरी समस्या असतानादेखील त्यातून मार्ग काढत ती आणि तेथील कामगार ,रहिवाशी, आपले जीवन आनंदाने जगण्याचा प्रयत्न करत असतात . मध्यम वर्गातील लोकांनी तर या सगळ्यातच आपलं समाधान मानलं आहे. अपुरी जागा,राहण्या फिरण्याच्या मर्यादा , सगळं वेळेनुसार, प्रत्येक ठिकाणी रांगा, अपुरे पाणी म्हणजे प्रत्येक ठिकाणी जीवन जगण्याच्या प्रक्रियेला मर्यादा आहेत . मनमुराद मोकळेपणाने श्वास कधीच घेता येत नाही त्यांना .. फार सहनशक्ती असते या लोकांच्यामध्ये.चाललंय ते फक्त जगण्यासाठी संघर्ष,खटाटोप ,उलाढाली, स्वतःच अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड…..आणि त्यातूनही ते स्वतःला ‘मुंबईकरच’ म्हणऊन घेतात ….
Leave a Reply