जीवनपथ सुकर करा गणदेवा हो
सूखशिखरीं दु:खदरीपासुन न्या हो ।।
गडबडतो धडपडतो मी, पडतो मी
बडबडतो कुढतो चिडतो रडतो मी
अजुन घडा कच्चा, परिपक्व हवा हो ।।
अंध तरी, वा लोचन बंद करी मी
मंदबुद्धि आहे, मदमत्त परी मी
अक्षय प्रज्वलित करा ज्ञानदिवा हो ।।
नि:पाता माझ्या मनिंची चंचलता
निश्चल मन होइ, नाम तुमचें घेतां
विफल-जीवनास मिळे अर्थ नवा हो ।।
त्यजिन पदीं मदमत्सर विषयवासना
काम क्रोध लोभ मोह त्यजिन ‘मीपणा’
होउन कृतकृत्य पूर्ण, त्यजिन भवा हो ।।
– – –
भव : जग
–
— सुभाष स. नाईक
Leave a Reply