शहरातील एक नावाजलेले क्लिनिक. तेथील डाॅक्टर परदेशातून शिकून आलेले. त्यांच्या बोर्डवरील अनेक पदव्या त्यांचं विविध मानवी आजार बरे करण्यातील श्रेष्ठत्व दाखवत होते. सकाळी दहा वाजता डाॅक्टर यायचे आणि बारा वाजता पुढील व्हिजीट्ससाठी निघून जायचे.
मला एका जवळच्या मित्राचा नंबर लावायचा होता, म्हणून मी सकाळी आठ वाजताच क्लिनिकच्या पत्यावर पोहोचलो. मित्र उपनगरातून येणार असल्याने त्याला यायला उशीर होणार होता. नऊ वाजता क्लिनिक उघडलं. माझ्या आधी काही पेशंट आले होते. त्यांनी घाईघाईने हाॅलमधील खुर्च्या पकडल्या. मी देखील एका खुर्चीवर बसून टीपाॅयवरील मासिक चाळत बसलो.
थोड्या वेळाने एक झब्बा व पायजमा घातलेली वयस्कर माळकरी व्यक्ती आली आणि माझ्या शेजारील खुर्चीत बसली. ती बहुधा लांबचा प्रवास करुन आलेली असावी. आता येणाऱ्या पेशंटला बसायला एकही जागा शिल्लक राहिलेली नव्हती. मी सहज शेजारील वयस्कर व्यक्तीकडे पाहिलं, ती पेशंट असेल असं मला जाणवलं नाही.
सव्वा नऊ वाजता माझ्या मित्राचा घरुन निघाल्याचा फोन आला. आता रिसेप्शनिस्टने क्लिनिकच्या नियमानुसार प्रत्येकाकडून डाॅक्टरांची आगाऊ फी घ्यायला सुरुवात केली. हे डाॅक्टर स्पेशालिस्ट असल्यामुळे त्यांची पेशंटला पाहण्याची फी हजार रुपये होती. एकेक करून तिने सर्वांकडून फी जमा करून प्रत्येकाला नंबरचे टोकन दिले. मी देखील पैसे देऊन मित्राचे टोकन घेतले.
पावणे दहाच्या सुमारास गरीब दिसणारी एक म्हातारी काठी टेकत टेकत आपल्या बारा वर्षाच्या आजारी नातवाला घेऊन क्लिनिकमध्ये आली. तिने रिसेप्शनिस्टकडे जाऊन टोकन मागितले. रिसेप्शनिस्टने सांगितलेली फी देण्याएवढे तिच्याकडे पैसे नव्हते. ती निराश होऊन जाऊ लागली. तेवढ्यात माझ्याशेजारील व्यक्तीने उठून त्या म्हातारीच्या हातावर स्वतःचे टोकन ठेवले. म्हातारीने त्या व्यक्तीस हात जोडले. त्या व्यक्तीने आपल्या खुर्चीवर म्हातारीला बसविले. मी उठून त्या नातवाला जागा करून दिली. त्या व्यक्तीने रिसेप्शनिस्टचा निरोप घेतला व निघून गेली.
मी रिसेप्शनिस्टकडे गेलो व तिला विचारले, ‘आता गेलेल्या व्यक्तीला तुम्ही ओळखता का? कोण आहेत ते?’ तिने सांगितले, ‘ही व्यक्ती महिन्यातून एकदा क्लिनिकमध्ये येते आणि आज जसं या म्हातारीला टोकन दिलं तसं ज्या पेशंटची परिस्थिती क्लिनिकची फी भरण्याएवढी नसते, त्यांना स्वतःचे टोकन देऊन जाते.’ मला त्या व्यक्तीच्या दातृत्वाचं कौतुक वाटलं. मी उत्सुकतेने तिला रजिस्टरमध्ये नोंदविलेले त्या व्यक्तीचे नाव दाखविण्याची विनंती केली. तिने माझ्या दिशेने रजिस्टर फिरविले. अठ्ठावीस नंबरच्या पुढे नाव लिहिलं होतं…
‘विठ्ठल पंढरपूरकर’
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
१-७-२०.
Leave a Reply