तुमचा लोणचेवाला मित्र जेवायला येत असेल तर मला स्वयंपाकाचं टेन्शन नसतं . बटाट्याची भाजी केली की झालं . ‘
या मित्राची कहाणीच आहे . हा बाबा बटाट्याची भाजी सोडून कोणतीच भाजी खात नाही . कुठे जेवायला गेला की जाताना लोणच्याची बाटली घेऊन जातो आणि बटाट्याची भाजी नसेल तर नेलेल्या लोणच्या बरोबर पोळी खातो , पण इतर कोणत्याही भाजीला बोट लावत नाही .
भाज्या न खाणं ‘ हा समस्त महिलांना भेडसावणारा सार्वजनिक प्रश्न आहे .
मुलांनी आणि इतरांनी सुद्धा सारं काही खायला हवं . आयुर्वेदात सांगितले आहे की नित्यनेमाने गोड , आंबट , तिखट , खारट , तुरट आणि कडू या सर्व चवीचे पदार्थ खायला हवेत . आहार आहेच तितका महत्त्वाचा . म्हटलंच आहे –
आहार प्रभवं वस्तु । रोगाः च आहारसंभवाः ||
म्हणजे हे शरीर आहाराने तयार होतं आणि रोग पण आहारानीच तयार होतात .
मुलांचं खाणं वेगवेगळ्या वयात वेगवेगळं असावं . आयुर्वेदात बालपणाचे तीन भाग केले आहेत
क्षीराद – म्हणजे फक्त दुधावर असलेले
क्षीरान्नाद – दूध आणि आणि इतरही खाणारे
अन्नाद – अन्न खाणारे
वाढत्या वयामध्ये हळूहळू बालकाची अन्नपचनाची क्षमता वाढत जाते , त्याला अनुसरून ही विभागणी आहे .
अगदी लहान मूल फक्त ‘ आईच्या दुधावर ‘ वाढतं . आईच्या दुधात त्याच्या वाढीस आवश्यक असणारे सारे घटक असतात . हल्ली आईला दूध येत नाही किंवा पुरत नाही या कारणास्तव डब्यातले दूध देतात पण जर ‘ गायीचे दूध ’ उपलब्ध असेल तर डब्यातले दूध देण्याच्या ऐवजी गाईचे दूध देणे जास्त चांगले .
या वाढत्या वयात ‘ बालगुटी ‘ देतात . बालगुटीतील औषधे तान्ह्याच्या नियमित वाढीसाठी , त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून उपयोगी ठरतात . सर्दी , खोकला , जुलाब , अपचन , कॉन्स्टिपेशन , पोटफुगी यासारखे विकार बालगुटी देण्यामुळे होत नाहीत .
बाळगुटीतील औषधे साधारण अशी आहेत . यात काही वैद्य कमीजास्त करू शकतात .
वेखंड , मुरुडशेंग , सुंठ , बाळ हरडा , लेंडीपिंपळी , काकडशिंगी , जेष्ठमध , हळद .
यासोबत काहीजण खारीक आणि बदाम पण देतात . सध्या तयार बाळगुटी बाजारात मिळते ती दिली तरी चालते .
मुलं जशी वाढायला लागतात तसं घरातले सारे जास्त खा , जास्त खा म्हणून त्यांच्या मागे लागतात . मूल ‘ हे आवडत नाही , ते आवडत नाही ‘ म्हणून हट्ट करतं . त्यांनी खावं म्हणून त्याचे हट्ट पुरवले जातात . पण खरं सांगू का , मुलांना न खाण्याची सवय आम्हीच लावतो . अगदी न कळत्या वयातील मुलांना काय काय आवडत नाही याची यादी सांगणारे आई – वडील पाहिले की वाटून जातं , या सवयी नक्की कोणाच्या आहेत . खरंच मुलांच्या की आई – वडिलांच्या ?
असे म्हणतात , ‘ मुलांनी तुमचं ऐकलं नाही तर चालेल एकवेळ , पण ते तुमचं अनुकरण करत असतात हे मात्र नक्की ध्यानात ठेवा ‘ . घरामध्ये सहजपणे बोललं जातं , “ कंटाळा आला घरी खाऊन , चला हॉटेलमध्ये जाऊया . ” अनवधानाने उच्चारलेल्या वाक्याने आपण मुलांना घरातल्या नेहमीच्या जेवणाचा कंटाळा करायचा असतो असे शिक्षण देत असतो हे ध्यानात घ्यायला हवं .
हल्ली जेवणं डायनिंग टेबल वर होतात आणि मुख्यत्वे टीव्हीच्या समोर होतात . खरंतर जेवताना शांत जागेमध्ये बसायला हवं . सर्वांनी एकत्रितपणे माफक गप्पा करत जेवण करावं . खाली मांडी घालून बसणं जास्त योग्य . एक ध्यानात ठेवा , आई – वडील जसं जेवतात ते पाहून मुलं जेवायचं कसं हे शिकत असतात . सर्वजण एकत्र बसल्यावर होणारे संवाद आपापसातील संबंधांमध्ये मधुरता आणतात .
माझे वडील कुठेही काहीही खाताना पहिला घास तोंडात टाकला की , “ वा , छान ” असं म्हणायचे . त्यांचं म्हणणं की ज्यांनी स्वयंपाक केला आहे त्याचं कौतुक व्हायलाच पाहिजे . या वागण्याने , कोणी काही करत असेल तर त्याचा अहेतुक सन्मान करावा अशी शिकवण आम्हाला आपोआपच मिळाली .
मुलांना येता – जाता तोंडात टाकण्याची सवय असते . घरी तयार करून ठेवलेलं काही नसतं , मग जे बाजारात विकत मिळतं , ज्याचा जाहिरातींमधून होतो अशा पदार्थांकडे मुलं आकर्षित होतात आणि त्या पदार्थांची त्यांना सवय लागते . खरं सांगायचं तर आपलं काम कमी करण्यासाठी म्हणून आपणच हे सगळे पदार्थ त्यांना देत असतो . एक लक्षात घ्या , लहानपणापासूनच वेगवेगळी बिस्किट , चॉकलेट किंवा फास्ट फूड , जंक फूड हे घरामध्ये आणले गेलेच नाही तर मुलांना त्याची सवय लागणार नाही .
जंक फूड , फास्ट फूड खाऊ नकोस असं मुलांना म्हणताना आई – वडील मात्र ते जर खात असतील तर मुलं त्याच्यासाठी हट्ट करणारच . गरजेचे आहे की मुलांनी जे करू नये असे आपल्याला वाटते ते ते आई वडिलांनी स्वतः करू नये . या ऐवजी मुलांना वेगवेगळे पदार्थ घरी तयार करून द्यायचे . ते करताना त्यांना त्यात सहभागी करून घ्यायचं . त्यामुळे कोणताही पदार्थ किंवा कोणतेही कार्य ‘ केली सुरुवात आणि झालं ‘ असं होत नाही , त्याला त्याचा त्याचा वेळ द्यायला लागतो हे मुलं शिकतील . त्यामुळे मुलांमध्ये दिसणारी ‘ आत्ता आणि ह्या क्षणी मी म्हणतो ते व्हायलाच हवं ‘ ही जी प्रवृत्ती दिसते ती कमी होईल . एक ध्यानात ठेवायचं की जेवण म्हणजे फक्त घशाखाली अन्न ढकलणं नसतं , तर जेवण हे जीवनाचं शिक्षण आहे .
आणखी एक , आम्ही साऱ्यांचाच अतिरेक करतो . अधिक खाण्याचा पण अतिरेक करतो . मुलांना सणसणीत भूक कशी लागते ते आम्ही त्यांना कळू देत नाही . नीट भूक लागली की मुलांचे खाण्याचे नखरे आपसूक कमी होतात आणि ज्या वेळेला तीव्र भूक लागते त्या वेळेला जेवण पूर्णपणे पचतं .
आता मी काही पदार्थ सांगतो ते घरी करून ठेवा .
मुलांना चार वाजता खायला किंवा सकाळी नाश्ता म्हणून हे पदार्थ चांगले आहेत . मात्र शाळेच्या डब्यात हट्टाने भाजी पोळी द्यायची . बाकी काही द्यायचं नाही . ज्या वेळेला खाऊचा डबा देण्याचा दिवस असतो त्या दिवशी बिस्किट वगैरे देण्या ऐवजी वेगवेगळ्या प्रकारची घावनं थालीपीठ असं काहीतरी द्यायचं आता इतर पदार्थ सांगतो.
साळीच्या लाह्यांचा चिवडा
तुपावर जिऱ्याची फोडणी टाकायची आणि त्यानंतर नेहमी आपण चिवडा करतो तसं करायचं .
पंचखाद्य – हा एक पौष्टिक आणि सर्वांनी खायला हवा असा एक पदार्थ आहे , त्याचे लाडू पण करता येतात . त्याच्यामध्ये काय काय असतं ते सांगतो खोबरं , खसखस , किसमिस , खारीक आणि खडीसाखर . या सगळ्यांची पावडर करायची आणि ते एकत्र करायचं त्याला म्हणतात
पंचखाद्य.
आपण मुलांना नाही नाही ती सरबतं देतो . त्यांच्याऐवजी मुद्रयुष द्यायचं हे कसं तयार करायचं त्याची माहिती युट्युबवर मिळते .
खजुरादी मंथ हे आयुर्वेदिक सरबत पण करून देता येईल याचीही माहिती युट्यूबवर आहे . खजूर , डाळिंब , मनुके , आवळा , चिंच , चवीला मीठ यांनी बनणारं हे आंबट – गोड सरबत दिल्यानंतर कोणती इतर सरबतं मुलं मागणार सुद्धा नाहीत .
आता थोडे इतर पदार्थ :
• डब्यात देण्यासाठी मिश्र भाज्यांचा पराठा तुपावर भाजून द्यायचा .
• लहानपणीचे पदार्थ आठवा . एक पदार्थ होता . भाकरी कुस्करायची त्याच्यामध्ये फोडणीचं ताक टाकायचं , खूप छान लागतं .
•भाकरीचा गूळ तुपाचा लाडू करायचा .
• डिंकाचा लाडू सुद्धा हल्ली काहीजण करतात .
• राजगिरा किंवा शेंगदाणे आणि गुळाचे लाडू द्यायला पण काही हरकत नाहीये .
• दलिया हल्ली सगळीकडे मिळते . त्या दलियाचा गोड आणि तिखट शिरा देता येईल.
• रताळ्याचे पॅटिस करायचे , रताळ्याचे काप मस्त लागतात , रताळ्याची खीर करायची .
एक नाही दोन कितीतरी पदार्थ आहेत . असं काही दिलं की मुलांना जेवणामध्ये गोडी वाटायला लागते . मुलांची भूक पण हळूहळू वाढते . करायला वेळ नाही ही सबब बाजूला ठेवून आपली कल्पनाशक्ती चालवून वेगवेगळ्या भाज्या आणि वेगवेगळे पदार्थ करता येतात , ते करायचं .
मुलांचा आहार म्हणजे इतकी प्रथिने , इतके फॅटस् , इतके कार्बोहायड्रेट असं नसतं . मुलं ही मन , बुद्धी , आत्मा असलेली ईश्वराची जिती जागती निर्मिती आहे , कोणते यंत्र नाही .
एक बारीक विचार करा . रस्त्यावरच्या लोकांची मुलं आई – वडील खातात ती सुकी भाकरी तोडत असतात . त्यांना कोणती प्रोटिन्स , कोणती विटामिन्स मिळतात ? तरीही ती कणखर असतात .
खरं सांगायचं तर जेवण म्हणताना नक्की कशाचा विचार करायचा हेच विचारायची गरज आहे . स्वतः स्वस्थ रहा मुलांना स्वस्थ ठेवा .
डॉ . वसंत भुमकर
अथर्व आयुर्वेद चिकित्सालय , डोंबिवली ( पू ) .
७५०६६४१३१२
Leave a Reply