केसरी टुर्स च्या संचालिका झेलम चौबळ यांचा जन्म ३० जून १९६८ रोजी झाला.
केसरी टुर्सच सर्वेसर्वा केसरी पाटील आणि त्यांचे भाऊ आणि राजाराणी ट्रॅव्हल्सचे मालक राजाभाऊ यांच्यात काश्मी्र प्रेम इतके की, दोघांपैकी ज्याला कन्यारत्न प्राप्त होईल तिचे नाव ‘झेलम’ हे ठेवण्यात येईल, हे अगोदरच ठरले होते. शांत, निखळ आणि व्यवसाय प्रवाही ‘झेलम’ केसरी पाटील यांच्या भाग्याला आल्या. घरातूनच प्रवास, भटकंती (टुरिझम) आणि व्यवसायाचे गुण मिळाल्याने झेलम ‘टुर्स’ व्यवसायात नसत्या आल्या तरच नवल.
झेलम यांचे बालपण अगदी सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या मुलांप्रमाणेच होते. मराठी माध्यमात शिक्षण आणि पालघरमधील छोट्याशा मथाने या गावातून शहराच्या ठिकाणी येण्यासाठी ग्रामीण भागातील बैलगाडीचा प्रवास, अगदी सर्वसामान्यांप्रमाणेच. ‘बी.कॉम.’चे शिक्षण पूर्ण करून लग्नानंतर त्या अमेरिकेत स्थायिक झाल्या. मात्र, व्यवसायाची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती आणि त्यातूनच त्यांनी १९९० मध्ये ‘ए टू झेड टुर्स अँड ट्रॅव्हल्स’ नावाची ‘टिकिटिंग आणि सर्व्हिसेस’ कंपनीची सुरवात केली. घर आणि व्यवसाय सर्व काही व्यवस्थित सुरू असताना भारतात येण्याची तीव्र इच्छा असल्याने त्यांनी अमेरिकेतील कॅलिफोर्निया सोडून भारतातील कॅलिफोर्निया म्हणून ‘पुणे’ येथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पुण्यातील केसरी ऑफिसला सुरवात करून नावारूपाला आणले.
केसरीच्या संचालिका असलेल्या झेलम यांना फायनान्स, टिकिटिंग आणि ॲडमिनिस्ट्रेशन या विभागांमध्ये विशेष रुची आहे. मात्र, पर्यटनाच्या नवनवीन योजना आखण्यात त्यांचा हातखंडा आहे. नेहमीच्या ग्राहकांबरोबरच शेतकऱ्यांना पर्यटनाबरोबरच शेती आणि शेतीपूरक व्यवसायासंबंधी नवीन तंत्रज्ञानाची ओळख व्हावी म्हणून ॲग्रो टुरिझम, विद्यार्थ्यांसाठी ‘नासा’ टूर आणि कार्पोरेट क्षेत्रात विशेष लोकप्रिय असलेली माईस (MICE) अशा पूर्णपणे भिन्न आणि लोकप्रिय योजना आखण्याचे श्रेय ‘झेलम’ यांचेच. मात्र, यावरच समाधानी न राहता ग्राहकांना सतत नवनवीन पर्यटनस्थळे दाखविण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply