नवीन लेखन...

झेप – स्वप्न नगरीकडे (माझी लंडनवारी – 7)

‘सफारी’ मधून बाहेर पडले, तेव्हा घड्याळात दुबई वेळेप्रमाणे एक वाजून पंचेचाळीस मिनिटे झाली होती. माझं पुढचं प्लेन अडीच वाजता होत. चला! आता अर्धा तास कसाही जाईल असे म्हणत, मी गेट नंबर 19 कडे आले. पाहतो तर काय! तिथे कोणीच नाही. मला वाटलं बोर्डिंग सुरू केलं की काय? पण गेटवर सिक्युरिटी पण नव्हता. मगाची वर्दळही कुठे दिसेना. ते जोडपं, ती बाई किंवा कोणीच दिसेना. तेवढ्यात मला अनाउन्समेंट ऐकायला आली, फायनल कॉल फॉर EK3 पॅसेंजर्स टू लंडन हिथ्रो. मला वाटले की सर्वांनी बोर्डिंग केले की काय! पण हे कसं शक्य आहे? तिथे तर सिक्युरिटी पण नाहीये.

मग मी गेट नंबर ट्वेंटीच्या सिक्युरिटी वाल्याकडे गेले. तिथे मंचेस्टरला जाणारी फ्लाईट होती. मी त्या सेक्युरिटीवाल्याला विचारले, EK3 फ्लाईट कुठून जाणार आहे? सिक्युरिटीवाल्याने सांगितले, गेट नंबर 23. बघायला गेले तर फक्त तीनच अंकाचा फरक. पण जड बॅग आणि वेळ कमी त्यामुळे ते गेट मला खूप लांब वाटले. थोडसं फास्टच मी गेटवर पोचले. तर तिथे सर्व मंडळी जमलेली होती. त्यात मला ते जोडपे, इन्फोसिसवाला माणूस आणि ती वृद्ध बाई असे ओळखीचे चेहरे दिसले. चला म्हणजे आपण बरोबर ठिकाणी पोचलो. आणि तिथे बोर्ड सुद्धा EK3 चे डिटेल्स दाखवत होता. मी पोचले आणि परत शांतपणे अनाउन्समेंट ऐकली, तेव्हा लक्षात आले, तो फायनल कॉल चेक इन साठी होता. मी पोहोचल्या पोहोचल्या पाचेक मिनिटात बोर्डिंग अनाउन्स केले.

हे विमान लाँग डिस्टन्स जर्नी असल्यामुळे बोईंग 707 होते. गर्दीही बरीच होती. बोर्डींग अनाउन्समेंट झाल्यावर झोन वाईज त्यांनी लोकांना विमानात सोडायला सुरुवात केली. आधी फर्स्ट क्लास पॅसेंजर्स, मग बिझनेस क्लास नंतर पॅसेंजर विथ किड्स आणि ओल्ड लेडीज आणि व्हिलचेअरवाले पॅसेंजर्स असे एकेक करत आत जात होते. माझा झोन E होता. माझा नंबर बराच उशीरा आला. एक पंधरा वीस मिनिटाच्या वेट पिरेड नंतर मी आता विमानात शिरले आणि माझ्या जागेवर जाऊन बसले. यावेळेला सुद्धा मला खिडकी मिळाली होती आणि नशिबाने ती पंख्यावर नव्हती. पंख्याच्या आसपास होती. आता मी अगदी सराईता सारखे विमानात बसले. बेल्ट लावणे, पुढ्यात ठेवलेले कॅटलॉग बघणे असे सर्व करत असताना हळूहळू ‘बोर्डिंग कम्प्लीट’ अनाउन्समेंट ऐकली. मला फार उत्सुकता होती की विमान कुठल्या कुठल्या देशांवरुन जाईल, कुठले समुद्र ओलांडून ’लंडन‘ शहर दिसेल? ते म्हणतात न, सातासमुद्रापार!! ते सात समुद्र कुठले? असे कुतूहल जागे झाले.

मग मी टीव्ही चालू केला आणि चॅनल्स चेक केली. माझ्या डाव्या हाताला एक मध्यमवयीन बाई बसली होती. तिच्याशी बोलण्यात मला असे कळले कि, ती दुबईला असते आणि तिचे दुसरे घर लंडनमध्ये आहे. लंडनच्या ‘समर सीजन’ मध्ये ती लंडन मध्ये राहते. बाकी वेळी ती दुबईला असते. असं पण असू शकतं का अशी एक शंका मनात आली. आपला उन्हाळा, पावसाळ, हिवाळा सगळे ठाण्यात आणि खड्ड्यांमध्ये. असो!

वा फायनली! मी लंडनला जाणाऱ्या विमानात होते आणि माझ आनंद ओसंडून वहात होता. आता प्लेन टेक ऑफ झाल्यावर लंडनमध्येच लॅंड होणार आणि मी माझ्या स्वप्ननगरीत पोचणार!!

या विचारांमध्ये प्लेनने टेक ऑफ घ्यायला सुरुवात केली. आता उत्सुकतेची जागा थोडी अधीरतेने घेतली होती. सात-आठ तास कसे जातील? कधी मी एकदा लंडनमध्ये लॅंड होईन या विचारात मला डोळा लागला. तसेही भरपूर जेवण झाले होते आणि टेक ऑफ बद्दलची हुरहूर किंवा भीती म्हणा, कमी झाली होती. मी चक्क झोपी गेले.

एक-दीड तास मस्त झोप लागली. त्या मधल्या वेळात प्लेनने टेक ऑफ घेतला कधी काही कळले नाही. थोड्या वेळाने ज्युस आला आणि त्या गडबडीमध्ये मला जाग आली. मी डाऊनलोड कॅमेरा ऑन केला पण काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम मुळे येत एअर मॅप नव्हता.

पण अल्टिट्युडआणि टेंपरेचर डिस्प्ले होत होते. आता अल्टिट्युड 32000 फीट आणि टेंपरेचर -32 होते. एअर मॅप चालू नसल्यामुळे कुठल्या प्रदेशावरून जात आहोत हे कळत नव्हते. मग शेवटी मी टीव्ही चालू केला आणि पिक्चर एन्जॉय केला. दोन-तीन पिक्चर चे शेवटचे पार्ट पाहिले. खूप कंटाळा आल्यावर प्लेन मध्ये मागच्या बाजूला जाऊन उभी राहिले. मधेच थोडा वेळ प्लेन वॉक घेतला म्हणजे वॉक इन प्लेन! असो.

मुंबई ते दुबई प्लेन मध्ये जेव्हा प्लेन चे पंखे ढगांवर आपटत होते किंवा खालच्या बाजूने घासून जात होते, तेव्हा मला खूप भीती वाटत होती. पण आता एखाद्या रफ राइड प्रमाणे मी ते प्लेनचे धडधडणे एन्जॉय केले. असं वाटत होतं की रस्त्यावरच्या खड्ड्यांत सारखेच हे आकाशातले खड्डे. मला मुंबईत असतानाच प्राजक्ताने सांगितले होते की, रेस्टरूम वापरून झाल्यावर जेव्हा फ्लश करशील तेव्हा खूप मोठा आवाज येईल. कारण तिथे व्हॅक्यूम क्रिएट करतात. तर तू घाबरून जाऊ नकोस. एव्हढे सांगूनही मी दचकले. नसतं सांगितलं तर कदाचित किंचाळले असते. आता मी मस्त फ्रेश होऊन डोअर ओपनिंगच्या भागात उभी राहिले आणि बाहेरचे दृश्य बघत होते. अशी किती वेळ उभे राहिले कोण जाणे? थोड्यावेळाने बेल्ट लावण्याच्या अनाउन्समेंट मुळे जागेवर जाऊन बसले.

विमानात शिरताना मला बिझनेस क्लासमध्ये तो इन्फोसिसवाला बसलेला दिसला. थोडी पुढे आले तर ए/बी पैकी कुठल्यातरी झोनमध्ये ती लंकेची पार्वती वाटणारी वृद्धा विंडो सीट मध्ये बसलेली दिसली. कधीकधी आपण किती जजमेंटल होतो! मागचा पुढचा विचार न करता एक मत बनवून टाकतो. तिला भाषा येत नव्हती याचा अर्थ ती ट्रॅव्हलिंग करायला अनफिट आहे असे होत नाही. तीही कानात इयरफोन घालून टीव्ही किंवा गाणी ऐकणे करत होती. तिला मदत न केल्याची बोच मनात होतीच. त्यामुळे तिच्याशी नजरा नजर होऊ नये म्हणून मी जरा दुर्लक्ष करूनच पुढे निघाले. असो!

घड्याळ्यात सात वाजले होते आणि दुबई टाईमप्रमाणे साडेनऊ वाजता विमान पोचणार होते. अजून अडीच तास काढायचे होते. बाप रे! अंगावर काटा आला. आता काय करायचं? मी थोड्या कंटाळवाण्या चेहऱ्याने शेजारच्या बाईकडे पाहिले तर ती म्हणाली, आपण आता पाऊण-एक तासात लंडनला पोहोचू. मला आश्चर्यच वाटले. पण मनात विचार आला, ही आता इतक्या फेऱ्या करते, तर तिला माहिती असेल म्हणून थोडीशी सुखावले. मग मी परत डाउनलोड कॅमेरा सुरू केला. मला बघायचं होतं की आपण कुठल्या प्रदेशावरून चाललो आहे. आता तरी दिसतय का? पण एअर मॅप तसाही चालू नव्हता. पण डाउनलोड कॅमेरामध्ये आता हिरव्या रंगाचे चौकोनी त्रिकोणी तुकडे, मध्ये नेटकेपणाने जाणारे राखाडी तुकडे. ते रस्ते असावेत बहुदा. आणि बरेच वेगवेगळ्या रंगाचे चौकोनी/ त्रिकोणी तुकडे दिसले. त्यात निळा, हिरवा, राखाडी, चॉकलेटी असे विविध रंगी तुकडे दिसले. म्हणजे कुठल्या तरी शहरावरून/ गावावरून आम्ही जात होतो. मी मनातल्या मनात नाव देत होते, हे जर्मनी असेल, हे फ्रान्स असेल, सगळीकडे हिरवळ म्हणजे स्वित्झर्लंड असेल. मी माझ्या मनाची अशी समजूत करून घेतली. मग मला असे वाटले कि, ती बाई सांगते ते बरोबर असेल. विविध रंगांची अपूर्वाई बघण्यात आठ वाजले. तरीही लँडिंगची कुठलीही चिन्हे दिसेनात. मग माझी खात्री पटली की अजून एक दीड तास तर नक्कीच आहे. परत नाईलाजाने टीव्ही ऑन केला. टीव्हीवर 101 दालमिशन्स चालू होता. त्यात जरा अर्धा तास निघून गेला. आता घड्याळात साडे आठ वाजले होते.

वेळ अगदी परीक्षा बघत होता. हत्ती गेला आणि शेपूट राहिली अशी अवस्था झाली होती. बसल्याजागी बेचैनी/ अस्वस्थता वाढत होती. प्लेनच्या सततच्या आवाजाने डोके पण जड झाले होते. विमानात संध्याकाळी साडेपाच सहाला जेवण आले होते. लगेच तीन चार तासात मी परत जेवले होते. अधेमधे चहा ज्यूस चालू होते. आता मात्र पुरती कंटाळून गेले. टीव्ही बंद करून टाकला. डोळे बंद करून पाच मिनिटं शांत बसले आणि सहज खिडकीबाहेर नजर टाकली.

मला आकाशाचे तीन रंग स्पष्ट दिसले. मग मी सावरून बसून खिडकीतून बाहेर बघायला लागले.प्लेन ज्या थरातून जात होते, त्याच्या आजूबाजूला ट्रान्सपरंट कलर होता – आकाशाचा रंग! थोडासा काळ्या रंगाकडे झुकणारा. मधल्या थराला मधल्या व्हायलेट मिश्रित पांढरा रंग होता. मला उगीचच विज्ञान आठवलं. सूर्यकिरणांचे वक्री करण वगैरे आठवले. त्यामुळे तो रंग आला असेल. आणि खाली गडद पांढरा रंग दिसत होता.

मी मान तिरकी करून खाली बघत होते खालचे दृष्य बघून भान हरपले! मोठ्या मुश्किलीने अर्ध्या-पाऊण तासाने मान दुखायला लागली म्हणून सरळ केली. खालचे दृष्य काय वर्णावे!!

खाली आपण अंटार्टिका खंडावर असल्यासारखा भास होत होता. ढग एवढे गडद होते की, सर्वत्र बर्फ पसरले आहे असे वाटत होते. कापसासारखे दिसणारे ढग सर्वत्र वेगवेगळ्या आकारात पिंजून ठेवल्यासारखे विखुरले होते. कुठे त्या ढगांचे डोंगर तर कुठे खोल विवर!! खूपच सुंदर दृश्य होते. पण माझ्या तोकड्या शब्दसंपत्ती मुळे जास्त सुंदर वर्णन करू शकले नाही. तो जाड ढगांचा थर जवळ जवळ अर्धा पाऊण तास होता.
अचानक आमचे विमान थांबल्या सारखे वाटले म्हणजे विमानांच्या मशीनचा आवाज कमी झाला. थांबले म्हणता येणार नाही कारण फुल स्पीड मध्ये विमान चालत असले चालत असले तरी ते थांबल्या सारखेच वाटते. विमानाचा आवाज कमी झाला तर मला असे वाटले की, आता विमान विचार करतय की हा दाट थर फोडून खाली कसे जावे?

आणि तेवढ्यात विमानात अनाउन्समेंट झाली कि, We are descending.Please fasten your seat belt. आता त्या जाड थरा मधली आणि आमच्या विमानातली गॅप झपाट्याने कमी होऊ लागली. घड्याळात सव्वा नऊ वाजले होते. मी उत्सुकतेने बाहेर पहात होते.विमानाचे पंखे जाड थरला टच करत होते. मला जरा टेंशन आले, कारण आत्तापर्यंत जेव्हा केव्हा एखादा मोठा ढग प्लेन ला क्रॉस व्हायचा, तेव्हा धाडधाड आवाज व्हायचा आणि पंखे हलायचे.

मी मुंबईहून दुबईला आले, ते लहान प्लेन होते. त्यांना एकच पंखाची जोडी होती. हे विमान तेवढ्या अजस्त्र पंखांसह कसे काय उडणार? किती पावर लागत असेल? असा मी विचार करत होते. इथे दोन जोड्या होत्या. बापरे! बोइंग चे पंख त्या पंखांच्या दीडपट वगैरे असावेत. तर आता असे हे पंख जाड थराला जवळ जवळ चिकटले होते.

पुन्हा एकदा विमान थोडे थांबल्या सारखे वाटले. मग परत तो धाडधाड आवाज, पंखांचे हलणे. मी खिडकी पटकन बंद करून घेतली. पण न राहून थोड्यावेळाने परत उघडली. अचानक सूर्यकिरण अंगावर आले. सूर्यकिरणात बरोबर ढगही आत घुसू पाहत होते असे वाटले. ते ढगांचे वादळ आता आतच शिरणार असे वाटून मी पटकन बाजूला झाले. मग माझे मलाच हसायला आले. सूर्यकिरणे- ढगांची एकमेकांबरोबर मौज मस्ती चालू होती. आम्ही त्या दाट थराच्या आत मध्ये होतो. शांत समुद्रात बोट चालली आहे आणि अचानक पाण्याची प्रचंड भिंत समोर यावी आणि त्या बोटीला त्या लाटे मधून वाट काढायला लागावी असाच हा प्रकार! पण ही पाण्याची भिंत म्हणजेच ढगांचा थर खूपच दाट होता.

जवळपास पाच- दहा मिनिटे आम्ही त्या थरांमध्ये होतो. शेजारी फक्त ढगच दिसत होते. आता लँडिंग जवळ आले असावे कारण प्लेन ने अचानक टर्न घेतला आणि एका मोठ्या ढगातून झपाट्याने खाली जायला लागले. आणि माझे डोके गरगरायला लागले.

नो वंडर! हे लँडिंग होते. दुबईच्या लँडिंग च्या वेळेस मी डोळे मिटून घेतले होते. पण मला इथे तसे करायचे नव्हते मी खूप उत्सुक होते लंडनचे पहिले दर्शन घ्यायला…

— यशश्री पाटील.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..