पती आणि पत्नी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असं आपण म्हणतो…मात्र प्रत्यक्षात सर्वांना दर्शनी बाजू ही पत्नीचीच दिसते. संसाररथाची ही दोन चाकं एकसारखी, एक विचाराने चालली तरच प्रवास सुखाचा होतो.
जे खेड्यातच लहानाचे मोठे झाले, संसार केला, वार्धक्य आल्यानंतर काही वर्षांनी आजारी पडून निजधामाला गेले.. त्यांच्या बाबतीतील काही कटू, मात्र सत्य असणाऱ्या काही गोष्टी…
पुरुष हा साठीनंतर म्हातारा होतो. स्त्रिया या वयस्कर होतात. . . . पुरुषाने आयुष्यभर कष्ट करुन आपल्या मुला-मुलींची लग्नं उरकल्यानंतर त्याचे कुटुंबातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ स्थान संपुष्टात येते. नंतर त्याला कुटुंबावर एक ‘ओझं’ असल्यासारखंच वागवले जाते. एक विक्षिप्त, कटकट्या म्हातारा म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं.
त्याने पूर्वी बायको, मुलांच्या बाबतीत घेतलेल्या कठोर निर्णयांची वेळोवेळी चिरफाड केली जाते आणि त्याला कोणत्या ना कोणत्या कारणास्तव दोषीच ठरविले जाते. त्याने खरोखरच जर भयंकर चुका केल्या असतील तर, प्रत्यक्ष परमेश्वरही त्याला वाचवू शकत नाही.
वयस्कर स्त्रीकडे मात्र ‘झुकतं माप’ म्हणून मुलांकडून व सुनांकडून सहानुभूतीने पाहिले जाते. कारण तिच्याकडून अजूनही काही लाभ होण्याची त्यांना शक्यता असते.
या म्हाताऱ्याने पूर्वायुष्यात कितीही कर्तुत्व गाजविलेले असले तरी त्याची पुण्याई त्याच्या कामी येत नाही. त्याची बायको मात्र पूर्व पुण्याईचे व्याज निरंतर मिळवू शकते.
जरी या म्हाताऱ्याची भरपूर शेतीवाडी असली, त्या शेतीचे आपल्या मुलांमध्ये समान वाटप केलेले असले तरी देखील त्याच्या नशिबी दुःखच येतं. आजारी पडल्याचं कळल्यावर हाॅस्पिटलमध्ये कोण अॅडमिट आहे, हे नातेवाईकांच्या पाणावलेल्या डोळ्यांवरुन लक्षात येते. ढसाढसा रडणारे नातेवाईक, म्हातारीच अॅडमिट आहे हे दर्शवतात.. म्हातारा असेल तर गंभीर चेहरे समोर येतात.
यातून बोध एकच घ्यायचा की, वय झाल्यानंतर पुरुषाने स्वतःसाठी इतरांकडून कोणत्याही अपेक्षा न करता जगण्याचे कौशल्य शिकावे. आपण इतरांसाठीच आयुष्यभर जगलो, हे आठवत बसू नये, ते उगाळत तर अजिबात राहू नये. लक्षात ठेवा, पुराणात कोणत्याही स्त्रीने वानप्रस्थाश्रम स्विकारल्याचा दाखला नाहीये. संन्यास व वानप्रस्थाश्रम हे पुरुषांसाठीच पूर्वापार चालत आलेले आहेत. यावरुन हे लक्षात येते की, आपले पूर्वज दूरदृष्टीचे होते….
मला व्यवसायाच्या निमित्ताने अनेक माणसं भेटली. त्यातील काही वरील प्रकारात मोडणारी होती. एक राष्ट्रीयीकृत बॅन्केत नोकरी करणारे मित्र होते. त्यांना तीन मुली व एक मुलगा होता. मुलांची शिक्षणं झाली. दरम्यान यांना दोनवेळा बदलीच्या गावी जाऊन नोकरी करणे भाग पडले. परिणामी मुलांशी संपर्क कमी झाला. तिसऱ्या बदलीच्या वेळी यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. हे काही घरच्यांना पटले नाही. त्यांनी यांना घराबाहेर काढले. बिचारे एकटे राहू लागले. मोठ्या मुलीच्या लग्नाला त्यांनी यांना नाखुशीने सामील करुन घेतले, मात्र सर्वांनी अबोला धरला. त्यानंतर राहिलेल्या लग्नांना यांना दूरच ठेवले. शेवटी वृद्धापकाळाने हे निवर्तले. त्यांचा फ्लॅट, बचत मिळविण्यासाठी तेच पाचही जण पुन्हा एकत्र आले….
दुसरे एक मित्र चित्रपट व्यवसायातील होते. त्यांना पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे चित्रपटांची रिळं घेऊन परगावी जावं लागायचं. तो चित्रपट जितके दिवस चालेल तितके दिवस त्या थिएटरवर मुक्काम करुन चित्रपटाच्या शों चा दिवसाचा हिशोब निर्मात्याला कळवायचे काम असे. असं त्यांनी पंचवीस तीस वर्षे काम केलं. महिन्यातून कधी आठवडाभर घरी यायला जमायचं, अन्यथा गाव, तालुका, शहरी मुक्काम बदलत रहायचा. या दरम्यान मुलं मोठी झाली, त्यांची शिक्षणं पूर्ण झाली. नोकरी लागली. मुलांच्या जवळ कोण होतं? आई! जेव्हा यांची फिरती बंद झाली. ते आॅफिसमध्ये बसून काम करु लागले, तेव्हा घरच्यांना ते नकोसे वाटू लागले. यांना मानसिक धक्का बसला व ते एकटे राहू लागले. खाण्यापिण्याची आबाळ होऊ लागली. तब्येत बिघडली की, पहायला कोणीही जवळ नाही. तरी त्यांनी काही वर्षे काढली. शेवटी घरातच चक्कर येऊन पडल्याचे निमित्त झाले आणि ते कोमात गेले. चार दिवसांच्या उपचाराला प्रतिसाद न देता परलोकी निघून गेले….
असं कुणाच्याही बाबतीत घडू नये असं वाटतं. जीवनाचा आनंद घ्या. हे जीवन पुन्हा पुन्हा मिळणार नाही हे लक्षात घ्या. काही समस्या असेल तर तिचे वेळीच निवारण करा. उद्या हा कधीच उगवत नसतो, उद्याचे काम आजच तडीस न्या…
– सुरेश नावडकर २५-१२-२०
मोबाईल ९७३००३४२८४
Leave a Reply