नवीन लेखन...

जिकडे तिकडे खड्डेच खड्डे..!

भूतलावर कोठेही जा खड्डा पाहायला मिळतोच या खड्ड्याला ना देशाचे बंधन असते ना प्रांताचे ना प्रदेशाचे.. फरक एवढाच की कुठला खड्डा मोठा असेल तर कुठला लहान… कुठला खड्डा मुद्दामहून पडलेला असेल तर कुठला निसर्गतः तयार झाला असेल.. अशी खड्डा निर्मितीची खूप कारणे सांगता येतील..

वीज, भूकंप इत्यादी तसा खड्ड्याच्या अस्तित्वाला सुद्धा फारसा कुणाचा विरोध नसतो परंतु हेच खड्डे जर रस्त्यात असतील तर मात्र नक्कीच विरोध असणार यात वाद नाही कारण एक तर त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते किंवा प्रवासात जास्त आदळे बसतील.. तर एक दोन खड्डे असतील तर तेही चालते परंतु हल्ली खड्डेही वस्ती करू लागलेत तेही भर रस्त्यात, तसेच खड्ड्यांच्या भोवती त्यांच्या पेक्षाही मोठे मोठे खड्डे जन्म घेऊ लागलेत..

चला एक तरी बरे झाले आपल्या देशात शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी स्वतंत्र कार्यक्रम राबवूनही शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण झाले नाही परंतु खड्ड्यांचे मात्र कुठलाही कार्यक्रम न राबवता सार्वत्रिकीकरण झालेले आहे. अगदी वाडी तांडे दुर्गम भागापासून ते काळ्या कुळकुळीत डांबरी रस्त्याच्या शहरांपर्यंत सगळीकडे खड्डेच खड्डे दिसून येतात.

खड्डा…खड्डा म्हणजे तरी काय? रस्त्यावरचा अडसर.. सुसाट वेगाने धावणाऱ्यानां पायबंद घालणाऱा दोर.. अथवा पडणाऱ्यांला निमित्तमात्र कारण… म्हणजे खरं तर सावधानतेचा इशारा… जमिनीच्या अंगावरचा निघालेला खवला… पेंगणा-याची तंद्री मोडतो कधी खड्डा.. तर हवेत तरंगणार्‍या फुगीर लोकांना जमिनीवर आणण्याचंही काम करतो खड्डा.. झपाट्याने वाढते खड्ड्यांची लोकसंख्या होय त्यांचे पाय घट्टं रोवलेले असतात.. जमिनीत.. थोडा कुठे जरा बुझवला तर लगेच पुन्हा डोकं वर काढून तयार असतो खड्डा.. कधी डांबरी रस्त्यावर दिसतो तर कधी साध्या रस्त्यावर…त्याला नसते कशाचेच वावडे …

कधीकधी तर कळत नाही की खड्डे रस्त्यात आहेत की रस्ते खड्ड्यात आहेत इतकं दोघांचं प्रेम अतूट आहे… आता या खड्ड्यांची एवढी सवय झाली आहे की खड्ड्याशिवाय रस्ता दिसला तर मनाला रुखरुख लागून राहते कधी खड्डा येईल याची…असे होऊन जाते. म्हणूनच रस्ते तयार करणारे कंत्राटदार सुद्धा जीवापाड जपत असतात या खड्ड्यांना . प्रत्येकाचा जवळून संबंध असतो खड्ड्यांशी , नव्हे तो ठेवावाच लागतो…

कधी कधी खड्डा हा अतिशय शुभ समजला जातो.कोणत्याही कामाची सुरुवात ही खड्डा करूनच करतात. एखादी मोठी वास्तू उभारताना देखील सुरुवातीस खड्डाच केला जातो.

सांडपाणी पसरू नये म्हणून सुद्धा आपण खड्डाच करतो अशावेळी खड्डा हा उदार अंतकरणाने सामावून घेत असतो सारी जमा होणारी घाण त्याला स्पर्श करत नसतात कुठल्याच प्रकारच्या भेदभावाच्या तिरप्या रेषा… अगदी सरळ मनाने खड्डा पोटात घेत असतो सारे काही…कधी नसते खड्ड्याला कुणाबद्दलही तक्रार… खड्डा जसा निर्मळ मनाचा असतो तसा तो विशाल मनाचा देखील असतो. काहीही झाले तरी आपल्या मध्ये सामावून घेत घेत खड्डा जगत असतो आपले जीवन.. कधी नसतो खड्ड्याला टेकडीचा हेवा अथवा कुठल्या डोंगरा बद्दल मनामध्ये आकस…

खरं तर कुठल्याही डोंगराचा,टेकडीचा जन्म हा खड्ड्यापासून झालेला असतो.. स्वतःचे कण-कण देऊन वाढवलेले असते एखाद्या टेकडीला खड्ड्याने….. तेव्हा कुठे आपल्याला हिरवळ उगवलेली दिसते टेकडीवर.. जसा जसा खोल खोल होत जातो खड्डा तशी तशी टेकडी उंच जात असते…

मुले खेळण्यासाठी गल करतात, तोही एक छोटा खड्डा असतो. तहान लागल्यावर नदीवर नितळ पाणी व्हावे यासाठी वाळूत खड्डा केला जातो… वृक्षारोपण करायचे झाले की अगोदर खड्डाच करतात… मनुष्याच्या जीवनातील अंतिम क्षणीही पुन्हा धावून येतो मदतीला खड्डा…अशा काही प्रसंगी आपणास खड्डा भेटत असतो… अगदी अनपेक्षितपणे भेटणाऱ्या खड्ड्याला कधीकधी एवढे प्रेम दाटून येते की मग एखाद्या माणसाला खस्कन ओढून आपल्याकडे घेतो खड्डा… मग त्या खड्ड्यात पडलेल्या माणसाला खड्डा सोडताना अतिशय दुःख होते… काहीजण तर अक्षरशः रडू लागतात.. खड्ड्याचे जास्त प्रेम असते‌ ते बेसावध आणि बावळट माणसावर…कधीही बघा ही माणसं खड्ड्यांशी दोस्ती करत करत खड्ड्यात पडतात…

जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, पाडीसी बरोबर हाती धरुनिया… याप्रमाणे सदैव खड्डा आपल्याबरोबर असतोच…

आणखी एक गोष्ट खड्ड्याच्या बाबतीत अशी की खड्डे कधी आपले अस्तित्व नाकारून अंगावर काडीकचरा पांघरून बसले की मग मात्र काही खरे नाही…. येणाऱ्या माणसाची सरळच गळाभेट घेण्यासाठी आसुसलेले असतात खड्डे….न समजणारी भाषा असते ही खड्ड्याची…. कधीकधी खड्डे कुणालाही न भेटता दूर दूर रानात एकटे … स्वतःची दरी होईपर्यंत संघर्ष चालू असतो …खड्ड्यांचा…. पावसाळ्यातच तहान असते या खड्ड्यांना जोराची….. साठा करुन ठेवतात… खड्डे….. खड्डा खोदत जावा तसा मातीचा संसार सुरू होतो असतो.. ढिगारे होतात एकीकडे दुसरीकडे मात्र खड्ड्यांची आवस्था अतिशय बिकट होते. मातीचे आवरण गेल्यावर खड्ड्याची सुरू होते ससेहोलपट.. तशाही परिस्थितीत सावरु पाहतात स्वतःला खड्डे…

चालतच आलेले आहे हे युगानुयुगे खड्ड्यांना …कधीच बुजवण्याची भीती वाटत नाही.. डगमगत सुद्धा नाहीत खड्डे पावसाला किंवा कुठल्या भयान वादळाला…. त्यांना नसते माहित कुठलेही गटातटाचे राजकारण…. माणसासारखे ! अथवा खड्ड्यांना नुसते कुठल्याही जाती धर्माचे लेबल… फक्त खड्डे …खड्डेच असतात… भेटतात तिथेच विसरून जातात … कधी डूख धरत नाहीत सापासारखे! कधी जाणवतही नाही ..एवढे प्रकर्षानं…

काही खड्डे मात्र अगदी निराळे असतात त्याचे आकार तर अनंत प्रकारचे, त्यांची ठेवण अशी की जणू काही एखादा सुंदर देखावा मग ही माणसे या खड्ड्यांच्या जाळ्यात अडकतातच… येतात हळूच बाहेर अंगावरची बेसावध तेची शाल झटकून सावधपणे….

कोण असतो खड्ड्यांना दगड-गोट्यांशिवाय..! काट्याकुट्या शिवाय वाली..! टाकाऊ सार्‍या वस्तू .. त्यांनाही जीव लावतात खड्डे… कधी चालू असतो त्यांचा हा खेळ..भेटाभेटीचा माणसे भेटत असतात खड्ड्यांना.. माणसे सांगत नाहीत परंतु भेट झालेली… शक्यतो… सांगत नाही… कारण माणसाचे फार जवळचे संबंध असतात खड्ड्यांशी…खड्डे म्हणूनच घर करून राहतात माणसाच्या मनामध्ये….

— संतोष सेलूकर

Avatar
About डॉ.संतोष सेलूकर 25 Articles
प्राथमिक शिक्षक जि.प.परभणी येथे कार्यरत असून दूरचे गाव हा कविता संग्रह प्रकाशित आहे.अनेक ठिकाणी कविसंमेलने व साहित्यसमेलनात सहभाग. सातत्याने १९९५ पासून कविता व ललितलेख लेखन विविध काव्यलेखन स्पर्धेत पारितोषिक प्राप्त.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..