मनसि वचसि काये पुण्यपीयूषपूर्णा: ।
त्रिभुवनमुपकार श्रेणिभिः प्रीणयन्तः ।।
परगुणपरमाणून्पर्वती कृत्य नित्यम ।
निज हृदि विकसन्तः सन्ति सन्तः कियन्तः ॥
-भर्तृहरि
ज्याचे मन, वचन व शरीर पुण्याच्या अमृताने परिपूर्ण आहे, आपल्या परोपकारी वृत्तीने जे सर्वांना आनंदित करतात, दुसऱ्याच्या गुणांचे आचरण करतात, रंजल्या गांजल्या लोकांना आसरा देतात, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होतात, निरपेक्ष वृत्तीने राहतात अशी सज्जन माणसे जगात कोण असतील? हा प्रश्न जेव्हा माझ्या समोर उभा राहतो तेव्हा ‘जिम कॉर्बेट’ माझ्या नजरेसमोर प्रथम उभा राहतो. हा मूळ ब्रिटिश आयरिश माणूस. पण याचा सर्व जन्म भारतात गेला.
आपले जवळजवळ सर्व आयुष्य हिमालयाच्या कुशीत गोरगरीब, गिरीजनांच्या सहवासात त्याने व्यतीत केले. हे लोक त्याचे सर्वस्व होते. या सर्वांच्या प्रेमात तो आकंठ बुडाला होता. सर्वसाधारण लोक त्याला शिकारी म्हणून ओळखतात.
त्याने शिकारकथांवर लिहिलेल्या पुस्तकांनी तर साहित्याचे एक दालन खोलले आहे. जिम कॉर्बेटची नरभक्षकावरची पुस्तके म्हणजे केवळ अभिजात साहित्य नाही तर तो स्वतंत्र वाङ्मय प्रकार आहे असे मानले जाते. या माणसाच्या आयुष्याचे एक एक पैलू पाहताना आपण थक्क होतो आणि नकळत त्याच्याबद्दलचा आदर उमलू लागतो. शेवटी या व्यक्तिमत्त्वात आपण कसे गुरफटू लागतो हे कळतच नाही. त्याने वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी केलेले प्रयत्न, त्याने स्थापलेली ‘छोटा हल्दवानी’ ही वसाहत. त्याचे जंगलांचे सखोल ज्ञान, त्याची निरीक्षण व आकलन शक्ती, प्राण्यांच्या सवयी इत्यादीबाबतचा त्याचा अभ्यास मनाला थक्क करून टाकतो. पण त्याचा केंद्रबिंदू होता तो म्हणजे ‘गरीब लोक’ त्यांचे सुख, आनंद व त्यांचे संरक्षण! आजही कुमांऊ हिमालयातील लोक त्याच्या स्मृती समोर आदराने मान लवतात. त्याची स्तुती गातात. पर्यावरण प्रेमींच्या हृदयात तर तो अढळ स्थान प्राप्त करून बसला आहे.
जिम कॉर्बेटचा जन्म २५ जुलै १८७५ रोजी नैनिताल या ठिकाणी झाला. त्याचे पाळण्यातील नाव ‘एडवर्ड जेम्स कॉर्बेट’. त्याचे वडील ख्रिस्तोफर विलियम नैनितालला पोस्टमास्तर होते. त्याच्या आईचे नाव मेरी जॉन. सख्खी सावत्र अशी ही बारा भावंडे. या जिम कॉर्बेटच्या जन्माची एक मजेशीर गोष्ट सांगितली जाते. मातेच्या उदरातून जन्म घेण्यास हे महाशय तयारच नव्हते. सर्वजण काळजीत पडले. जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला. एवढ्यात जवळच व्याघ्र गर्जना गरजली व बाळाचे ट्यहाँ, ट्यहाँ ऐकू आले. थोडक्यात जन्मापासूनच या बाळाची नाळ वाघांशी जोडली होती.
जिम कॉर्बेटचे शालेय शिक्षण नैनितालला झाले. खेळात विशेषत: नेमबाजीत त्याने प्रावीण्य मिळवले होते. १८४३ च्या सुमारास ब्रिटिशांनी नैनिताल वसवले. त्या काळात नैनितालला युरोपियन लोकांची जास्तीत जास्त वस्ती होती. हिवाळ्यात प्रचंड थंडी व हिमवर्षाव! त्यामुळे नैनितालचे बहुतेक लोक हिवाळ्यात स्थलांतर करून पर्वतरांगांच्या पायथ्याच्या मैदानी प्रदेशात वास्तव्य करत. जिम कॉर्बेटच्या वडिलांना त्याकाळचे कुमाऊं विभागाचे कमिशनर हेन्री रॅमसे यांनी कालाढुंगी या ठिकाणी जमीन दिली होती व त्या ठिकाणी त्यांनी घर बांधले होते. या घराला नाव दिले ‘अरूंडेल’. या अरुंडेलच्या परिसराला फार्म यार्ड म्हणत. कॉर्बेट कुटुंबाचे वास्तव्य उन्हाळ्यात नैनिताल तर हिवाळ्यात कालाढुंगीला. हा सर्वच परिसर जंगलानी व्यापलेला होता. वन्यपशू, हिंस्त्र श्वापदे यांचा या परिसरात वावर होता व जिमने आपल्या आयुष्याची सुरुवात या ठिकाणी केल्यामुळे त्याला जंगलाची मनापासून आवड! किंबहुना या जंगलाने, फार्म यार्डने जिम कॉर्बेटला बरेच काही शिकविले! हे जंगल म्हणजे त्याच्या निसर्गज्ञानाची शाळाच होती.
जिम कॉर्बेटचे लहानपण या फार्म यार्डशी निगडित आहे. याच ठिकाणी त्याने अनेक सुंदर पक्षी न्याहाळले. त्यांचे कुंजन आस्वादले. निरनिराळे पशू, श्वापदे पाहिली. बहरलेली झाडे पाहिली. निरनिराळ्या ऋतूतील त्यांचे खुलणारे सौंदर्य पाहिले. निसर्गाचे वेड त्याच्या अंगात भिनू लागले. जंगलाची भीती कमी होऊ लागली. किंबहुना जंगल हेच त्याचे सर्वस्व ठरू लागले. हा लहान मुलगा एकटाच जंगलात फिरत असे. एखादे वेळेस रात्री शेकोटी पेटवून, शेकोटीच्या उबेत आराम करीत असे. मधेच एखादी वाघाची डरकाळी ऐकू येई, पण या सर्व प्राण्यांबद्दल त्याला पूर्ण विश्वास होता. जंगलाचे ज्ञान तो शोषत होता. पशु-पक्षी काय बोलत आहेत त्यापेक्षा ते काय सांगत आहेत हे तो शिकत होता.
नेमबाजीचे व शिकारीचे ज्ञान त्याला त्याचा मोठा भाऊ टॉम याच्याकडून प्राप्त झाले. प्रथम लगोरी, मग धनुष्यबाण व शेवटी बंदूक! शिकारीचे धडे त्याने टॉमच्या हाताखाली गिरवले. १९ व्या शतकाच्या पूर्वार्धात तर शिकारीला प्रतिष्ठा प्राप्त झाली होती. राजे-रजवाडे, अमीर-उमराव, सरकारी अधिकारी शिकारीकडे एक प्रतिष्ठित खेळ म्हणून पहात. शिकार करणे हे एक प्रतिष्ठेचे लक्षण ठरले होते. वयाच्या ८ व्या वर्षी जिमने आपल्या आयुष्यातील पहिला बिबळ्या वाघ मारला.
आर्थिक परिस्थितीमुळे वयाच्या १७ व्या वर्षी त्याने आपले घर सोडले व रेल्वेमध्ये फ्युएल इन्स्पेक्टर म्हणून रुजू झाला. त्याची नियुक्ती बिहारमधील ‘मोकामा घाट’ या ठिकाणी करण्यात आली होती. पुढे तो ट्रान्सशिपमेंट इन्स्पेक्टर म्हणून काम करत होता. यावेळी त्याच्यातील एक हुशार कार्यकुशल, कुशल संघटक असे उत्कृष्ट प्रशासकीय गुण प्रकट झाले. लोकांचे, कामगारांचे प्रेम त्याने संपादन केले व त्याच्या या गुणामुळे मोकामा घाट येथील कामाची गती किती तरी पटीने वाढली. १९१७ साली त्याने रेल्वेतील ही नोकरी सोडली व तो आपल्या घरी परत आला.
जिम कॉर्बेटला शिकारीची आवड होती पण एके दिवशी त्याच्या या आवडीला कलाटणी देणारा एक प्रसंग घडला. एके दिवशी त्याचे दोन मित्र व तो शिकारीला म्हणून बाहेर पडले. जंगलाचा निसर्ग खुलला होता. ते एका तळ्यापाशी आले. तिथे असंख्य पाणकोंबडे, पक्षी बागडत होते. तिघांनी आपल्या बंदुका उगारल्या. बंदुकीचे आवाज सुरू झाले. पक्ष्यांची किलबिल थांबली होती. पक्षी जीव वाचवण्यासाठी सैरावैरा उडू लागले. बंदुकीच्या आवाजाबरोबर निष्पाप पक्ष्यांचे मृतदेह चोच वासून जमिनीवर तडफडत पडू लागले. काही वेळाने ती तडफड कायमची बंद होत होती. काही वेळात तळ्याचा काठ पक्ष्यांच्या मृत देहाने भरून गेला.
जिमच्या मित्रांनी २-३ मरून पडलेले पक्षी खाण्यासाठी उचलले. जिम १३६/ हिमशिखरांच्या सहवासात विचार करू लागला, हे पक्षी म्हणजे निसर्गाचे देणे! हे पक्षी निसर्गाची बाग हे फुलवतात! मला खाण्यासाठी २-३ पक्ष्यांची गरज असताना, इतक्या पक्ष्यांचा जीव घेण्याचा मला काय अधिकार आहे? जिम बेचैन झाला. त्याच्या डोळ्यासमोर ते पक्षी येत होते. त्याला विचारत होते, तू आम्हाला का मारलेस? आमचा काय गुन्हा होता?
जिमला हे सर्व असह्य होत होते. तो चर्चमध्ये गेला. त्याने परमेश्वरापाशी आपली चूक सांगून माफी मागितली व परमेश्वराला सांगितले की, या पुढे जे प्राणी लोकांना घातक ठरतील, त्यांचे नुकसान करतील किंवा मला अन्न म्हणून ज्या प्राण्यांची आवश्यकता आहे तेवढ्या प्राण्यांची मी शिकार करीन. परमेश्वराला दिलेला शब्द जिमने शेवटपर्यंत पाळला.
जिम कॉर्बेट प्रसिद्ध आहे तो शिकारी म्हणून! पण त्याने शिकार केली ती नरभक्षकांची व ती सुद्धा कोणतीही अपेक्षा न ठेवता! केवळ लोकांचे जीवन सुरक्षित व्हावे, हीच भावना त्या पाठीमागे होती. शिकार करतानासुद्धा प्राण्याचा वेदनाविरहित मृत्यू होईल, असाच त्याचा कल असे. आपल्या आयुष्यातील ३२ वर्षे त्याने नरभक्षकांच्या शिकारीत घालवली. वाघ नरभक्षक का बनतात याची कारणमिमांसा करण्याचा पहिला प्रयत्न हा जिम कॉर्बेटनेच केला आहे. कॉर्बेट म्हणतो, कोणताही वाघ जन्मत: नरभक्षक नसतो. वाघ केवळ अपघाताने नरभक्षक बनतात. त्यापैकी ९० टक्के वाघ असह्य वेदना देणाऱ्या किंवा अपंगत्व आणणाऱ्या जखमांमुळे तर उरलेले १० टक्के वाघ वृद्धत्वामुळे नरभक्षक बनतात. तसेच त्यांच्या नैसर्गिक भक्ष्यांची दुर्मिळताही तो नरभक्षक बनण्याचे एक प्रमुख कारण आहे. माणूस हे वाघाचे नैसर्गिक खाद्य नाही पण वस्ती वाढल्याने व जंगलतोडीमुळे हरणांसारख्या प्राण्यांच्या संख्येवर विपरीत परिणाम झाला. त्या काळात रोगाच्या साथी फैलावत. असंख्य लोक मृत्यूमुखी पडत. अंत्यसंस्कारासाठीसुद्धा लोक मिळत नसत. अशावेळी मृताच्या तोंडात विस्तव ठेऊन मृतदेह दरीत फेकला जाई. असा मृतदेह एखाद्या भुकेल्या वाघाच्या खाण्यात आला तर तो वाघ नरभक्षक बनण्याची खूप शक्यता असे.
नरभक्षकांना जिम कॉर्बेटमुळे तर जिम कॉर्बेटला नरभक्षकांमुळे प्रसिद्धी मिळाली. जिम कॉर्बेट व नरभक्षक हे एक समीकरणच आहे.
जिम कॉर्बेटने १० नरभक्षकांना यमसदनाला पाठवले. त्याने मारलेल्या नरभक्षकांनी १५०० पेक्षा जास्त लोकांना पचवले होते. त्याने मारलेला पहिला नरभक्षक म्हणजे चंपावतची वाघीण. या वाघीणीने ४३६ लोकांना मारले होते. मूळची ही वाघीण नेपाळची. तिथे तिने २०० लोकांचा बळी घेतला होता. तिचे पारिपत्य करण्यासाठी नेपाळच्या नरेशांनी सैनिकांची एक तुकडी नेमली होती. ही तुकडी वाघिणीला मारू शकली नाही पण तिने त्या वाघिणीला भारतात पिटाळले. भारतात या वाघिणीने २३६ बळी घेतले. शेवटी १९०७ साली जिम कॉर्बेटने तिचा बळी घेतला. पानारच्या बिबट्याने तर ४०० बळी घेतले होते पण या सर्व नरभक्षकात प्रसिद्धी मिळाली ती रूद्रप्रयागच्या चित्त्याला! सरकारी अहवालांनुसार त्याने १२५ माणसे मारली होती. या चित्त्याने जवळजवळ ८ वर्षे रूद्रप्रयाग परिसरात प्रचंड दहशत निर्माण केली होती. केदारनाथ, बद्रीनाथच्या यात्रेवर त्यामुळे विपरीत परिणाम झाला होता. सर्व भारतभर या चित्त्याला प्रसिद्धी मिळाली होती. ब्रिटिश सरकारने या चित्त्याला मारण्यासाठी देशातील शिकाऱ्यांना आव्हान केले होते व बक्षिस म्हणून १०,००० रुपये व २ गावे इनाम देऊ केली होती. लंडनच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सुद्धा या चित्त्याबद्दल सरकारला प्रश्न विचारले जात होते. शेवटी जिम कॉर्बेटवर या चित्त्याला मारण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. तेव्हा त्याने सरकारला दोन अटी घातल्या. एक म्हणजे मी कोणतेही बक्षिस स्वीकारणार नाही. कारण लोकांना भयमुक्त करणे तो आपले कर्तव्य समजत होता तर दुसरी अट म्हणजे तेव्हा इतर शिकाऱ्यांनी हस्तक्षेप करता कामा नये. कारण अशा उत्साही शिकाऱ्यांच्या गोळीला बळी पडण्याची जिमची इच्छा नव्हती. शेवटी १ मे १९२६ रोजी हा चित्ता जिमने रूद्रप्रयाग जवळील गुलाबराय या ठिकाणी मारला.
या घटनेची स्मृती म्हणून उभे केलेले स्मारक आजही पहायला मिळते. ज्या आंब्याच्या झाडावर बसून जिमने हा चित्ता टिपला ते झाड या घटनेचे साक्षीदार म्हणून आजही उभे आहे. जिमने मारलेला शेवटचा म्हणजे ‘ठाकचा नरभक्षक!’ १९३८ साली हा नरभक्षक मारून त्याने आपली बंदूक खुंटीला अडकवली.
-–प्रकाश लेले
Leave a Reply