गाणे हा एक योग असतो, हे विलासचे म्हणणे मला पटले. कारण अजून दोन उत्तम योग यापुढील काळात आले. मुंबई विभागाच्या संस्कृत विभागासाठी पं. वेलणकर यांनी लिहिलेले आणि संगीतकार प्रभाकर पंडित यांनी स्वरबद्ध केलेले माझ्या आयुष्यातील पहिले संस्कृत गीत गायलो. रेकॉर्डिंगच्या वेळी पं. वेलणकर यांना भेटलो. पत्रावर पत्ता लिहिताना आपण जो पिनकोड नंबर लिहितो, त्याचे जनक पं. वेलणकर आहेत, असे प्रभाकर पंडितांनी सांगितल्यावर मी अवाकूच झालो. माझ्या गाण्यामुळे विविध क्षेत्रात काम करणाऱ्या किती नामवंत व्यक्तींना भेटण्याची संधी मिळाली, याची यादी केली तर एक वेगळेच पुस्तक लिहावे लागेल. संगीताच्या आराधनेमुळे झालेल्या अगणित फायद्यांपैकी एकही फायदा गाणे शिकायला सुरवात करताना मला माहीत नव्हता.
आर्टिग ॲडव्हर्टायझिंग प्रायव्हेट लिमिटेडचे श्री. उजगरे यांच्यामुळे अजून एक योग आला. त्यांनी काही जाहिरातींसाठी गाण्याची ऑफर दिली. जाहिरातींच्या मागे जे गाणे असते त्यांना ‘जिंगल्स’ असे म्हणतात. नामवंत गायिका कविता कृष्णमूर्तीला अनेकदा स्टुडिओत मी जिंगल्स गाताना पाहिले होते. या क्षेत्रातील ती आघाडीची गायिका होती. एक जिंगल ही जास्तीत जास्त वीस ते तीस सेकंदाची असते. पण स्टुडिओत त्याचे काम कित्येक तास चालते. कारण इतक्या कमी वेळात परिणाम साधायचा असतो. जाहिरातीचे व्यावसायिक रेकॉर्डिंग असल्यामुळे जिंगल्सचे मानधन बरेच जास्त असते. आर्टिग अॅडव्हर्टायझिंगने स्टारडस्ट इमर्जन्सी बॅटरीजूच्या जाहिरातीचे काम घेतले होते. या बॅटरीच्या वेगवेगळ्या नऊ जिंगल्स माझ्या आवाजात रेकॉर्ड झाल्या. या सर्व जाहिराती भारताबाहेर दुबई आणि इतर आखाती देशात वाजणार होत्या. त्यामुळे आपल्या टीव्ही किंवा रेडिओवर ऐकू येणार नव्हत्या. पण या जिंगल्समुळे जाहिरातीच्या क्षेत्रात माझा शिरकाव झाला. या जिंगल्सचे रेकॉर्डिंग ऐकून काही संगीतकारांनी मला काम दिले.
यानंतर गवाणकर ट्रस्टसाठी साईबाबांची दोन भजने मी गायलो. सुरेश वाडकर, अनुपमा देशपांडे आणि त्यागराज खाडिलकर असे मान्यवर गायकही या कॅसेटमध्ये गायले होते. विशेष म्हणजे या कॅसेटचे प्रकाशन शिर्डीमध्ये साईबाबांच्या मंदिरात झाले आणि शिर्डीत या गाण्यांचा एक कार्यक्रमही झाला. त्यामुळे शिर्डीला जाण्याचा योग आला.
एके दिवशी सकाळी माझी काकू दीपा जोशीचा फोन आला. तिने सुलोचनादेवी सिंघानिया हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक श्री. नागराज राव यांना तातडीने भेटायला सांगितले. रावसरांनी Geeta’s witness या नावाचे छोटे पुस्तक लिहिले होते. संकल्पना अशी होती की, भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जेव्हा गीता सांगितली, तेव्हा त्याचा एकच साक्षीदार होता, तो म्हणजे अर्जुनाच्या रथावरील ध्वजाशेजारी बसलेला मारुती. भक्त मारुतीरायांना विनंती करतो की, गीता समजायला जड जाते. त्याचा अर्थ नीट उमगत नाही. तू गीतेचा एकमेव साक्षीदार आहेस. तरी ही गीता सोप्या शब्दात मला समजावून सांगा. सुप्रसिद्ध लेखक श्री. विद्याधर गोखले यांनी या पुस्तकाचे मराठीत भाषांतर केले. ‘गीतेचा तो साक्षी वदला’ची एकूण २६ गाणी झाली. आता या गाण्यांचे रेकॉर्डिंग करून त्याची कॅसेट करण्याचा प्रोजेक्ट होता. यासाठी माझ्याबरोबर तरुण संगीतकार कौशल इनामदार याला बोलावण्यात आले होते. रावसरांनी ही संकल्पना आम्हा दोघांना सविस्तरपणे समजावून दिली. रावसरांची हातोटीच अशी होती की, नकळत त्यांनी आम्हाला या प्रोजेक्टमध्ये सामील करून घेतले. या पुढील दीड महिन्याचा काळ रावसरांच्या सान्निध्यात आम्ही चक्क गीता शिकलो. कौशलने सर्व गाण्यांना अतिशय छान चाली लावल्या. आम्ही रेकॉर्डिंग स्टुडिओत पोहोचलो. गाण्यांचे वाद्यवृंद संचालन कमलेश भडकमकरने केले. सुरुवातीची दोन गाणी गायक अजित परब याने, तर मारुतीवाणीची चोवीस गाणी माझ्या आवाजात रेकॉर्ड झाली. ‘गीतेचा तो साक्षी वदला’ या कॅसेटचा प्रकाशन समारंभ ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये संपन्न झाला. कॅसेटबरोबर त्यातील गाण्यांच्या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. या कार्यक्रमात कॅसेटमधील काही गीते आम्ही सादर केली. कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली आणि रसिकांचा भरपूर प्रतिसादही मिळाला. या आगळ्या-वेगळ्या प्रोजेक्टमध्ये सहभागी केल्याबद्दल मी दीपा जोशी आणि नागराज राव या दोघांचाही कायम ऋणी राहीन. यानंतर कौशलने आणि मी अनेक कार्यक्रम आणि रेकॉर्डिंग्ज एकमेकांबरोबर केली.
यानंतर जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे खेड-मंचर येथील अधिवेशनात माझा गझलचा कार्यक्रम झाला. इंद्रधनूतर्फे अनिल मोहिले यांनी वाद्यवृंद संचालन केलेल्या विविध संगीतकारांच्या गाण्यांचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात संगीतकार कल्याणजी-आनंदजी, श्रीनिवास खळे, यशवंत देव, माझे गुरू श्रीकांत ठाकरे, भूपेन हजारिका अशा अनेक मान्यवर संगीतकारांसमोर त्यांनीच स्वरबद्ध केलेली काही गाणी मी सादर केली. या कार्यक्रमात माझे गाणे ऐकून संगीतकार कल्याणजी आनंदजी यांनी त्यांच्या एका कार्यक्रमात मला गाण्यासाठी बोलावले. या कार्यक्रमात संगीतकार अनिल मोहिले यांनी स्वरबद्ध केलेले आगामी मराठी चित्रपटातील गाणेही मी सादर केले.
टेलिव्हिजनवरही माझे कार्यक्रम सुरू होतेच. दूरदर्शनच्या निर्मात्या किरणताई चित्रे यांनी माझ्यावर खूपच विश्वास टाकला. विलास डफळापूरकरच्या ‘शब्दांच्या पलीकडले’मध्ये मी गायलो. त्यानंतर काही महिन्यातच संगीतकार दत्ता डावजेकर यांच्या शब्दांच्या पलिकडले या कार्यक्रमासाठी मी गीतकार सुधीर मोघे यांचे गीत गायले. या गाण्याने त्या काळात मला बरीच लोकप्रियता दिली. ‘संगीतावली’ या नॅशलन नेटवर्कवरील दीपावलीच्या खास कार्यक्रमासाठी लोकप्रिय गायक हरीहरन यांच्याबरोबर गाण्याची संधी मला मिळाली. गीतकार शंकर वैद्य यांचे गाणे मी गायलो. यानंतर निर्माते शरण बिराजदार यांच्या ‘सूरसंगम’ या कार्यक्रमात मी काही गाणी सादर केली.
१९९८ हे वर्ष माझ्यासाठी एक नवे क्षितीज घेऊन अवतरले. बऱ्याच वेळा आपल्याला कल्पनाही न देता नशीब आपल्याला एक सुखद धक्का देते. डॉ. विजय बेडेकर हे ठाण्यातील एक प्रथितयश डॉक्टर होतेच, पण त्याचबरोबर ठाणे भारत सहकारी बँक लिमिटेड या बँकेचे अध्यक्षही होते. बेडेकर परिवाराशी माझ्या वडिलांपासून आमचे घरगुती संबंध होते. या बँकेशी आमच्या कंपनीचे व्यवहार होते. त्यामुळे डॉक्टरांची भेट वरचेवर होऊ लागली. डॉक्टरांचा कामाचा झपाटा, त्यांची सामाजिक कामांबद्दलची तळमळ याचा विलक्षण प्रभाव माझ्यावर पडला. एक दिवस त्यांनी घरी बोलावले.
“अनिरुद्ध आता बँकेच्या निवडणुका जवळ येत आहेत, तुला बँकेच्या डायरेक्टर पदासाठी निवडणूक लढवायची आहे.”
डॉक्टरांच्या शब्दांवर माझा विश्वासच बसेना. एक ग्राहक आणि भागधारक म्हणून व्यक्तिगत आणि कंपनीचे बँकेबरोबर व्यवहार करणारा मी कधी या बँकेचा डायरेक्टर होईन, असे मला स्वप्नात देखील वाटले नव्हते. केवळ डॉक्टरांच्या प्रेरणेने हे नवीन आव्हान पेलायला मी तयार झालो. मला निवडणूक लढवावी लागली नाही. आमचे पॅनल बिनविरोध निवडून आले. मी ठाणे भारत सहकारी बँक लि. या सहकारी बँकेचा डायरेक्टर झालो. आमचे अध्यक्ष श्री. मा.य. गोखले, तर उपाध्यक्ष श्री.. उत्तम जोशी होते. त्यांच्याबरोबरच इतर डायरेक्टर्स श्री. माधव नातू, श्री. चंद्रशेखर परांजपे, श्री. महाजन, श्री. मिलींद गोखले, डॉ. रणदिवे, श्री. वसावडा अशी सर्वच ठाणे शहरातील नामवंत मंडळी होती. यांच्यापेक्षा सर्वार्थाने मी लहान होतो. त्यावेळी मी फक्त ३६ वर्षांचा होतो. इतक्या कमी वयात इतकी मोठी मानाची पोझिशन मला मिळाली होती. या सर्वांकडूनच त्या काळात मला भरपूर शिकायला मिळाले. बँकेच्या अनेक कार्यक्रमात गायक म्हणूनही मी सहभाग घेतला. बँकेमुळेच मुख्यमंत्री मनोहर जोशी, माजी मुख्यमंत्री शरद पवार यांच्या भेटीचा योग आला. फक्त या वाढीव जबाबदारीमुळे माझे कामाचे वेळापत्रक जास्तच व्यस्त बनले.
त्या वर्षी राजभवनावर आणखी एक कार्यक्रम मी केला. महात्मा गांधी जयंतीनिमित्त ‘भजन प्रभात’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यपाल पी.सी. अलेक्झांडर यांच्याबरोबर ऑस्ट्रेलिया, केनिया, झांबिया आणि बांग्लादेश यांचे राजदूत या कार्यक्रमाला उपस्थित होते. सरस्वती विद्या मंदिराच्या क्रीडासंकुलातील लोकमान्य टिळक सभागृहाचे उद्घाटन लोकमान्यांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते करण्यात आले. न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी श्रीमती कर्वे यांनी लिहिलेल्या लोकमान्यांवरील एका खास गाण्याचे गायन मी केले.
-अनिरुद्ध जोशी
Leave a Reply