नवीन लेखन...

जिंकावेसे वाटले म्हणून

शायर लतीफ़ म्हणतो,
हम सादामिज़ाजों के लिए ये भी बहोत है
क्या होता है जीने का हुनर सोचना होगा ।
“व्यक्ती आणि वल्ली” मधे दोन वस्तादांच्या ( टिल्यावस्ताद आणि ज्योतिमामा ), ज्याला हिंदीमध्ये ‘जीने का बहाना’ म्हणतात,त्याला अनुलक्षून लिहिताना भावूक भाषेत “पुल” म्हणतात… “तिथे एकाच क्षणाने आपला अजिंक्यपट कोरुन त्या काळजाचा जणू एक दगडी विजयस्तंभ करुन ठेवला आहे. दोन वस्तादांच्या आयुष्यातले ते दोनच दिव्य क्षण.तेच क्षण ते जगले ……शरीराने आणि मनानेही.”

पण लक्षात घ्या, हे क्षण आले ते त्यांच्या भौतिक आयुष्यात.मात्र जसा पुलंचाच बापू काणे जन्माला आला तोच मुळी सेक्रेटरी म्हणून, त्याचप्रमाणे माझ्यासारखे लाखो लोक या देशात जन्माला आले तेच मुळी क्रिकेटप्रेमी म्हणून. आणि असंख्य क्रिकेटप्रेमींच्या हृदयाप्रमाणे माझ्या हृदयातदेखिल “ते” दोन क्षण एखाद्या अर्वाचिन शिलालेखाप्रमाणे कायमचे कोरले गेले आहेत.ते मिटले जाणे किंवा त्यावर काळाची धूळ जमणे हे किमान सीताराम येचुरी या देशाचे पंतप्रधान होईपर्यंत तरी अशक्य आहे.

हिंदुस्थानचा शेवटचा बादशहा शायर बहादुरशाह ज़फर म्हणतो,
जिंदगी मे दो ही लमहे मुझपे गुज़रे है कठिन
इक तेरे आने से पहले,
इक तेरे जाने के बाद ।
त्यांतील पहिला दिवस म्हणजे अर्थातच २५ जून १९८३ आणि दुसरा २ एप्रिल २०११. नाही….२४ सप्टेंबर २००७ (पहिल्या 20-20 वर्ल्डकपमधिल भारताचा विजयदिन) नाही.

९९९ रुपयाला मिळणारा डॉमीनोज् पिझ्झा ( मनोजकुमार निर्मित सिनेमात ‘चुकून’ दिग्दर्शक दिसावा तसे मला एकदाच डॉमीनोज् पिझ्झामधे चिकनचे पाव इंचाचे सहा तुकडे दिसले होते.), लिव्हइन रिलेशनशिप आणि 20-20 क्रिकेट या तीन गोष्टी आमच्या पिढीच्या DNA मधे नाहीत. यात चांगल्या वाईटाचा प्रश्न नाही , पण आमच्या स्त्रीसौंदर्याच्या व्याख्येमध्ये माधुरी दीक्षित व श्रीदेवी बसतात पण कलकी शर्मा बसत नाही आणि मर्दानी पुरुषी सौंदर्याच्या व्याख्येत धर्मेंद्र आणि विनोद खन्नाची गणती होते पण अर्जुन रामपालची होत नाही, हा आमच्या पिढीचा ल.सा.वि.असावा.
२५ जून १९८३….लॉर्डस्.

सहसा जलदगती वा मध्यमगती गोलंदाज गोलंदाजी करताना धाव घ्यायला हळू सुरुवात करतात व यष्टींजवळ येतायेता त्यांचा वेग वाढत जातो. पण ‘जिमी’ अमरनाथ हा जगातील एकमेव गोलंदाज असावा की जो धाव घ्यायला तर वेगाने सुरुवात करी, पण अर्ध्या रस्त्यात आल्यावर कंटाळा आल्यागत त्याचा वेग त्याच्या गोलंदाजीप्रमाणेच मंदावत असे. त्याच्या सातव्या ( व वेस्टइंडिज डावातील ५२ व्या ) षटकातील अखेरचा चेंडू मायकेल होल्डिंगला टाकून,त्याच्या फसलेल्या पूलच्या फटक्यावर , पायचीतचे अपील करण्यासाठी तो १८० कोनात वळण्याआधीच उत्साही पंच डिकी बर्डचे उंचावलेले बोट मी आतापर्यंत निदान १०० वेळा तरी पाहिले असेन. आणि सहज शक्य आहे की माझ्या नातवंडांबरोबर मी तो विजयी क्षण अजून १०० वेळा त्याच उत्साहाने अनुभविन.( त्यानंतर विजयचिन्ह म्हणून हातात यष्टी घेऊन ज्या वेगाने “जिमी” पॅव्हेलीयनकडे धावला,त्या वेगाने तो मैदानात संपूर्ण कारकिर्दीत धावला असता तर त्याच्या नावावर , आता असलेल्या धावांपेक्षा दीडपट धावा नक्कीच जमा झाल्या असत्या.)

आनंदलेला सनी गावस्कर वर्ल्डकपनंतरच्या पहिल्याच मुलाखतीत म्हणाला होता…”मी अजून ती ‘फायनल’ टीव्हीवर पाहिलेली नाही. मला अजूनही भीती वाटते की कपिलच्या हातून किंग रिचर्ड्सचा झेल सुटेल आणि आपण सामना हरु.”
१९७३ साली आलेला “बॉबी” आणि १९८३ साली जिंकलेला वर्ल्डकप,या दशकभराचा कालखंड ( व्हाया शोले,आणीबाणी आणि विम्बल्डन ) हा आमच्या पिढीला मिशी,शिंगं व मतं फुटण्याचा कालखंड होता.

शायर नासिर काज़मी म्हणतो,
दिल मे इक लहर सी उठी है अभी
कोई ताजा हवा चली है अभी ।

तुम्हाला लहानपणी वाचलेल्या ‘अरेबियन नाईट्स’ मधल्या अदभूत गोष्टी आठवतात ? त्यातील एका गोष्टीत धाडसी, पराक्रमी व आत्मविश्वास ठासून भरलेला ( म्हणजे जवळपास ‘माही’ धोनीसारखा ) नायक हातीमताई सात प्रश्नांची उकल करण्याच्या शोधार्थ निघतो.त्यातील एक प्रश्न असतो…”एकवार पाहिले आहे…. पुन्हा पहायची इच्छा आहे !”…या वाक्याचा अर्थ शोधणे. हातीमताईचे पुढे काय झाले ते बगदादनिवासीच जाणोत पण आमचा तो शोध मात्र २८ वर्षांनी “वानखेडे स्टेडियम”वर संपला.
२ एप्रिल २०११…..वानखेडे स्टेडियम.

चेहेऱ्यावर तीच तगमग. हृदयात तीच धडधड. बोटांची नखं तशीच कुरतडलेली. जणू मधे २८ वर्षे गेलेलीच नाहीत. आमच्या डोळ्यावर चष्मा लागलेला नाही. आमच्या कानावरचे केस पिकलेले नाहीत आणि आम्हाला इन्कम टॅक्सची शो कॉज् नोटीसदेखिल आलेली नाही.मधल्या काळात अटलबिहारीजी पंतप्रधान झालेलेच नाहीत.’मोबाईल’ हे काय प्रकरण आहे याचा आम्हाला गंधदेखील नाही,त्यामुळे ‘डॉ. मनमोहन सिंग’ आणि ‘सायलेंट मोड’ हे समानार्थी शब्द आहेत की नाहीत असा गहन प्रश्नच आम्हाला पडलेला नाही.अजूनही ‘बरखा’ला मॅटीनीला प्लेबॉय शम्मी कपूरचा “तिसरी मंझील”,बुळ्या विश्वजितचा “बीस साल बाद” आणि चिरतरुण देव आनंदचा “तेरे घरके सामने” तुफान गर्दी खेचताहेत.आणि बघा अजूनही,उंच खुर्चीवर बसलेल्या खत्रूड अंपायरने “गेम,सेट अँड मॅच टू मिसेस ( ख्रिस एव्हर्ट ) लॉइड” म्हंटल्यावर आम्हाला फुटलेल्याआनंदाच्या उकळ्या पुरत्या विरलेल्यासुद्धा नाहीत.काहीकाही म्हणून बदललेलं नाही.

‘वानखेडे’चा आणि आमचा फार जुना ऋणानुबंध होता.१९७५ साली नवख्या वानखेडेवरच्या मुहूर्ताच्या सामन्यात,क्लाइव्ह लॉइडच्या हेविवेट वेस्टइंडिज संघांविरुद्ध भारताचा निःसंशय सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ( रवींद्र जाडेजाची बिल्कुल क्षमा न मागता ) फॉरवर्ड शॉर्टलेगचा ढाण्या वाघ एकनाथ सोलकरला, त्याच्या आयुष्यातले एकमेव शतक काढताना आम्ही आदराने पाहिले होते. फक्त एकदाच ‘वानखेडे’वर आम्हाला दगाफटका झाला होता. पण १९८७ च्या वर्ल्डकपच्या इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्याच्या आदल्या दिवशी , सिटीलाईटच्या ‘गोपीटँक’ व दादरच्या मासळी बाजारात टनानी ताजी मासळी मिळत असताना, दिलीप वेंगसरकरला,पोट बिघडवणारा, बर्फातला ‘उतरलेला’ बांगडा खायला घालायची दुर्बुद्धी त्याच्या पत्नीला झाली ( व दिलिप संघात नसल्यामुळे आपण तो सामना हरलो ) त्यात बिचाऱ्या ‘वानखेडे स्टेडियम’चा काय दोष ?

“हरे रामा हरे कृष्णा” नंतर देव आनंदचे सर्व सिनेमे,शेवटच्या कर्जत लोकलमधले प्रवासी कल्याणनंतर गाढ झोपावेत तसे ओळीने झोपले तर त्यात निष्पाप “बिजली” थिएटरचा काय गुन्हा ?

आणि हो….१९९३ साली इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात प्रविण आमरे, विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर हे आचरेकरसरांचे तीन पट्टशिष्य भारतीय संघातून खेळत असताना माझ्या (कट्टर) “बालमोहन”कर मित्राने वानखेडेवर बॅनर फडकविला होता..

“Sharadashram vs England !”
ते काही केवळ दोन वार कापड नव्हते तर, क्रिकेटच्या मैदानात ज्या प्रतिस्पर्ध्याशी कायम दोन हात केले त्या प्रतिस्पर्ध्याच्या क्रीडावैभवाला दिलेल्या मानवंदनेचे,मुंबईच्या खिलाडूवृत्तीच्या “क्रीडासंस्कृती”चे ते उज्वल प्रतिक होते.
नुवान कुलशेखराच्या नवव्या ( व भारतीय डावातील ४९ व्या ) षटकातील दुसऱ्या चेंडूवर कर्णधार धोनीने ( ७९ चेंडूत ९१ धावा ) “तो” ऐतिहासिक षटकार ठोकला आणि त्या क्षणाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या कोट्यवधी विस्फारलेल्या डोळ्यांना आपल्याच भाग्याचा हेवा वाटला. झालेल्या आनंदाचा महापूर त्यांनी मग कोणाची नजर लागू नये म्हणून, पापण्यांच्या मदतीने जागेवरच थोपवून धरला.

शायर साहिर लुधियानवी म्हणतात,
हर एक दौर का मज्ह़ब नया खुदा लाया
करें तो हम भी , मगर किस खुदा की बात करें ।
पुन्हा एकदा आपल्या लाडक्या सनीचीच साक्ष काढतो. तो मध्यंतरी म्हणाला….”मी घरच्यांना ( म्हणजे रोहनला ) सांगून ठेवलंय,मी रुग्णशय्येवर असेन ( रुग्णशय्येवर जावो ××× जावेद मियाँदाद. सनी आताही इतका तंदुरुस्त आहे की आजही तो कसोटी खेळला , तर जय शहाची शपथ , तो कमीतकमी चेतेश्वर पुजारासारखा धावबाद तरी होणार नाही हे निश्चित !) तेव्हा माझ्यासमोर माहीच्या ‘त्या’ षटकाराची क्लिप लावा आणि रवी शास्त्रीची कॉमेंटरी ….फुल्ल व्हॉल्युम मधे.

“INDIA LIFT THE WORLD CUP !”
विषय संपला.
अमजदखानचा सर्वार्थाने ‘बाप’असलेला अभिनेता जयंत आज असता तर गळ्यातील चट्टेरीपट्टेरी रुमालाने डोळे पुसत, लाखो-करोडो भारतवासीयांची भावना बोलून दाखविणाऱ्या सनीला रुद्ध कंठाने म्हणाला असता…”कसम गंगामैय्याकी, सौ साल जिओ बरखुर्दार , आपने तो हमारे मुँह की बात छिन ली !”
शायर आदम म्हणतो,
ये इक दो दिन जो नादानी के दिन है
यही खुशीयों की तुग़्यानी ( बाढ ) के दिन है!

संदीप सामंत
१०/०७/२०२०
९८२०५२४५१०.

Avatar
About संदीप सामंत 13 Articles
संदीप सामंत हे फेसबुकवरील लोकप्रिय लेखक आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..