आपल्या लहानपणापासून आयुष्यात काही व्यक्ती अशा येतात ज्यांना आपण कधीही विसरू शकत नाही. त्यांच्या विशिष्ट लकबीमुळे म्हणा, त्यांच्यातील चांगल्या वाईट गुणांमुळे म्हणा, त्यांच्या परोपकारी वृत्तीमुळे म्हणा या व्यक्ती आपल्या मनःपटलावरून कधीही पुसल्या जात नाहीत. त्यातल्या काही आज या जगातही नाहीत. कुणाची आठवण आली की हसू येतं, डोळे भरून येतात, आनंद होतो, राग येतो.
माझं लहानपण दादर या मुंबईच्या मध्यवर्ती भागात गेलं. आमचा घरचा गणपती माहीमला माझ्या चुलत भावांकडे असतो. माझी सहा चुलत भावंड सगळीच माझ्यापेक्षा मोठी. गणेश चतुर्थीला काकांकडे नुसती धमाल असायची. थट्टा मस्करीला उधाण आलेलं असायचं. या सगळ्यात आपली खणखणीत वाणी सुरु ठेवत ओट्याकडे उभी असलेली माझी चुलत काकी आजही मला दिसते. माझ्या चुलत भावंडात रविदादा हा प्रचंड गंमत्या आणि मिश्किल कोट्या करणारा होता. त्यांची बोलण्याची एक विशिष्ट ढब होती. डोळे उघडबंद करत त्याच्या विनोदी कोट्या सुरु असायच्या. आणि त्यामधून अगदी त्यांची आई सुद्धा सुटायची नाही. आज नाही तो या जगात. पण कधीतरी तो माहोल नजरेसमोर तरळतो, आठवणी जागतात आणि ओठावर हसू फुटतं.
पुढे म्हणजे माझ्या सातवी इयत्तेपासून आम्ही ठाण्याला राहायला गेलो. वर्गात माझा एक मित्र होता. नरेंद्र ठाकुरदेसाई. दिसायला गोरापान आणि अभ्यासात हुशार. त्याला सतत थुंकण्याची वाईट सवय होती. नशीब वर्गात नाही थुंकायचा. दुसरी सवय तर डोक्याला ताप होती. त्याला चित्रपट पाहण्याचा फार नाद होता. एकच चित्रपट अनेकदा पहायचा. कधी आम्ही दोघं चित्रपट पाहायला गेलो तरी त्याने तो आधी पाहिलेला असायचा. मग तो त्यातले संवाद चित्रपटातल्या पात्रासोबत म्हणायचा आणि त्याच्यावरही कळस म्हणजे सस्पेन्स असेल तर आधीच सांगून मोकळा व्हायचा. आता काय बोलणार या माणसाला ? त्याच्या आईला मी फार आवडायचो. कधीही घरी गेल्यावर हातात काही ना काही खाऊ ठेवायची.
आम्हाला गणित विषयासाठी सावे सर होते. या विषयाशी आधीच आमचा छत्तीसचा आकडा, कायम शत्रुत्व. सावे सर उंच, गोरेपान, शिडशीडीत शरीरयष्टी आणि वृत्तीने मवाळ. मुलं त्यांच्या तासाला फार मस्ती करायची. खाली बघून तोंडाने आवाज काढायची. फळ्यावर लिहिणारे सावे सर वळायचे आणि विद्यार्थ्यांकडे अगदी केविलवाणं तोंड करून म्हणायचे,
“नका रे, करू नका असं, बरं नाही ते.”
मुलं काय ऐकतायत ? कधीतरी त्यांचाही संयम संपायचा. कुणी विद्यार्थी केडकेपणा करताना त्यांच्या हाताला लागलाच तर त्याला कमरेत वाकवून पाठीवर धपाधप फटके मारायचे. पण त्यांचं मारणं इतकं विनोदी असायचं की सगळा वर्ग आणि अगदी शिक्षा झालेला विद्यार्थी सुद्धा तोंड दाबून हसत असायचा. त्याचंही सरांना वाईट वाटायचं. याच सावे सरांनी शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात मी नटसम्राट नाटकातला एक प्रवेश सादर केला होता, त्यावेळी मनापासून माझं कौतुक करत स्टेजच्या मागे येऊन मला आपल्या खिशाला लावलेलं फाउंटन पेन भेट दिलं होतं.
आमच्या सोसायटीमध्ये एक शरदचंद्र आगाशे म्हणून राहायचे. आगाशे पती पत्नी आणि त्यांची दोन मुलं असा त्यांचा परिवार. मिस्टर आगाशे उंचीला ठेंगू. त्यांची पत्नीही त्यांना साजेशीच होती. शरदचंद्र स्वच्छ, शुद्ध आणि अस्खलीत मराठी बोलायचे. समोरचा माणूस बोलायला लागला की मान आणि डोळे तिरके करून त्याच्याकडे पहात त्याचं बोलणं ऐकायचे. त्यांना एक गंमतीदार सवय होती. ते सकाळी ऑफिसला जायला घराबाहेर पडले की बाहेरून (ते तळमजल्यावर राहायचे ) पत्नीशी खणखणीत आवाजात पूर्ण बिल्डिंगला समजेल असे बोलायचे.
उदा. “अगं! संध्याकाळी जायचंय ना अमुक ठिकाणी ? आपण अमुक वाजता जाऊया बरं का. आणि केदारला सांग, म्हणावं शाळेतून आल्यावर अभ्यास पूर्ण केल्याशिवाय बाहेर जाऊ नकोस. ती तमुक गोष्ट बाहेरच्या टेबलवर ठेवलीय ग मी. बरं! गेलो ग मी.”
आता हे सगळं घरात नाही का बोलता येत? पण हे नेहमी असच चालायचं. पुढे ते मी ज्या बँकेत होतो त्या शाखेचे मॅनेजर झाले. आम्हा मित्रांची ठाण्यात एक हौशी नाट्यसंस्था होती. आमचा काही कार्यक्रम असला की मी त्यांच्या घरी रजेसाठी मस्का मारायला जायचो. आधी म्हणायचे,
“काही रजा मिळणार नाही !”
आणि मग डोळे मिचकावून म्हणायचे,
“बरं घें रजा ! तुमचा कार्यक्रम आहे ना?”
मनाने खूप साफ स्वच्छ होते. कुणाला उगाच त्रास देण्याचा त्यांचा पिंड नव्हता.
माझ्या आईचा एक मावसभाऊ आहे. अशोकमामा म्हणून. आज तो पंचाहत्तरीच्या घरात आहे. पण देवाच्या कृपेनें अगदी आजही फिट, उत्साही आणि तरतरीत. आवाजही स्पष्ट आणि खणखणीत. त्या काळात म्हणजे 1974-75 सालातली गोष्ट. तो त्यावेळी अविवाहित होता. गावाहून मुंबईत येऊन नोकरी करून काटकसरीने वागून त्याने आपली रहाणी आणि विचारसरणी अत्यंत नेटकी ठेवलेली होती. कुणाच्याही मदतीला वेळेला धावून जाणं हा त्याचा स्वभाव होता. मुंबईतले सगळे रस्ते, बसचे मार्ग, पत्ते त्याला मुखोद्गत होते. प्रामाणिकपणा हे त्याच्या जीवनाचं सूत्र होतं. जवळच्या अनेक नातलगांच्या लग्नात तो अगदी आपलं घरचं कार्य असल्यासारखा राबत असायचा. कुणासाठी काही केल्याचा डंका मात्र तो कधीही पिटताना दिसायचा नाही, कारण तो त्याचा स्वभावही नव्हता. कुणाच्या चांगल्या वाईट दोन्ही प्रसंगी तो हजर असायचा. त्यावेळी तो एकटाच असल्यामुळे कधीतरी ऑफिसमधून परस्पर ठाण्याला आमच्याकडे यायचा. मला त्याच्या गजाली फार आवडायच्या. आईबरोबर त्याच्या कोंकणी भाषेत गप्पा सुरु असायच्या आणि मी तोंड उघडं टाकून त्या ऐकत बसलेला असायचो. मग आई त्याला जेवूनच जायला सांगायची. घरी वाट पहाणारं त्यावेळी कुणीच नव्हतं. मग मी ही त्याला आग्रह करायचो,
“आज राहा ना रे! उद्या इकडूनच ऑफिसमध्ये जा.”
मग आई सुद्धा म्हणायची,
“अशोक राहा आता. उशिरा जातोयस कशाला?”
तो तयार झाला राहायला , की मला फार आनंद व्हायचा. रात्री उशिरापर्यंत गप्पा ऐकायला मिळणार याचा. तसंही आमच्या घराला पाहुण्यांची, आप्तांची असोशी कधीच नव्हती. सकाळी लवकर उठून तो ऑफिसमध्ये गेलेला असायचा. अगदी आजही तो माझ्या संपर्कात आहे. आजही अधूनमधून त्याचा फोन येतो आणि अगदी मनापासून आम्हा सगळ्या भावंडांची तो विचारपूस करतो. आजही त्याच्याचकडे नात्यातल्या चांगल्या वाईट बातम्या असतात आणि याचं कारण आजही तो प्रत्येकाशी संपर्क ठेऊन आहे. आजही त्याचा उत्साह पूर्वीसारखाच आहे. अशी सरळ मनाची माणसं फार थोडी असतात. देवा त्याला उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना.
शिक्षण संपून मी एका परदेशीं बँकेत लागलो आणि तिथे मला एक जिवाभावाचा सखा मिळाला, उपेंद्र गोसावी. आम्हा दोघांचे सूर छान जुळले, आणि पुढे अनेक वर्ष ती मैत्री टिकली आणखी पक्की झाली. या टिकण्यामागे सारख्या आवडीनिवडी, मध्यमवर्गीय रहाणी, खाण्याची आवड, विचारांची जुळणी ही कारणं असावीत. त्याच्या लग्नानंतरही हे नातं दुरावलं नाही, कारण त्यांची बायको सुद्धा त्याला साजेशीच लाभली होती. आम्ही उभयतांनी त्याच्या घरी कधी माझ्या घरी खूप धमाल, मज्जा आणि खवय्येगिरी केली. 2011 साली अगदी अचानक हा माझा जिवलग हृदयक्रिया बंद पडून या जगातून निघून गेला. आजही त्याची आठवण मात्र जराही पुसट होतं नाही.
ठाण्यात आमचा एक नाट्यप्रेमी कंपू होता. आणि आमच्या या कंपूने नाट्यछंदी या हौशी नाट्यसंस्थेची स्थापना केली होती. नाट्य, अभिनय क्षेत्रात अनेक उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून आम्ही करत होतो. सगळेच नाट्यकंडू. आमच्या या कंपूतच अभिजित कानडे होता. तसा तो माझा मित्र असं नाही म्हणता येणार , पण अभिजीत कानडे हा जगमित्र होता. प्रचंड उत्साही आणि बोलघेवडा. तसा वयाने आमच्यापेक्षा लहान पण वागायचा समवयस्कासारखा. कुठल्याही कामाला कधीही नाही न म्हणणारा. पुढे तो एका अग्रगण्य co-operative बँकेत लागला आणि आपल्या हुशारीने उपमहाव्यवस्थापक पदावर गेला. एव्हढ्या वरच्या पदावर गेल्यावरही त्याच्या स्वभावात जराही बदल झाला नाही. त्याच्याशी फोनवर बोलताना तोच पूर्वीचाच अभिजित जाणवायचा. जुलै 2020 मध्ये कोरोनाची लागण होऊन अभिजित या जगातून गेला. त्याचं असं अचानक जाणं मनाला मोठाच धक्का देऊन गेलं.
माझ्या लग्नानंतर मी मुंबईच्या पश्चिम उपनगरातील दहिसर इथे राहायला आलो. इथेच माझा विभास नरम या व्यक्तीशी परिचय झाला. आम्हा दोघांच्याही लेकी एकाच वर्गात होत्या. विभासची आणि माझी पत्नी या पालक मैत्रिणी. त्यांचा एक छानसा ग्रुप होता. विभास ही व्यक्ती पहाताक्षणी आवडणारी होती. गोरंपान, स्मार्ट व्यक्तिमत्व. त्यांचे कपडे, रहाणी सगळ्यातच एक व्यवस्थितपणा जाणवायचा. गप्पा मारायची, खवय्येगिरीची आणि पर्यटनाची त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला प्रचंड आवड. आमच्याकडे कधी पत्नीसहवर्तमान यायचे किंवा आम्हीही कधी जायचो. गप्पा मस्त रंगायच्या आणि वेळ कधी उलटून जायचा कळायचही नाही. त्यांच्याकडे गणेशचतुर्थीला अकरा दिवस गणपती असायचा. विभासची वृत्ती चिकित्सक होती. कोणतीही वस्तू ते नीट पारखून खरेदी करायचे. कोणत्याही विषयाची, गोष्टीची, वस्तूची व्यवस्थित माहिती करून घ्यायला त्यांना आवडायचं. छान सुंदर चौकोनी कुटुंब आणि सुखाचा संसार. दोन्ही लेकी आपापल्या क्षेत्रात हुशार, सुस्वभावी पत्नी. पण हे सगळं सोडून विभास आजाराचं निमित्त होऊन हे जग सोडून गेले, आणि आमच्या कुटुंबाचा एक फार चांगला मित्र आम्ही गमावला.
डीके आजोबा ही वल्ली आमच्या आयुष्यात तशी अचानकच आली. डीके हे त्यांचं आडनाव. त्याचं झालं असं, सूर नवा ध्यास नवा हा बालगायकांचा रिऍलिटी शॊ सुरु होता त्याचं चित्रीकरण मीरा रोड इथल्या स्टुडिओत सुरु होतं. एकदा माझ्या एका परिचितांचा फोन आला की तुम्हाला चित्रीकरण पाहायला जायचं असल्यास डीके आजोबा घेऊन जातील. त्यांची तिथे ओळख आहे. म्हटलं जाऊया. त्यामध्ये असलेला छोटा मॉनिटर (हर्षद नायबळ ) माझ्या पत्नीला फार आवडायचा. आम्ही ठरलेल्या ठिकाणी पोहोचलो. इतक्यात डीके आजोबा आपल्या एका मित्रासह आले. अगदी आल्यापासून आमची जुनी ओळख असल्यासारखी त्यांनी बडबड करायला सुरवात केली ती संपेचना. त्यामुळे आपण जाणार की नाही चित्रीकरण पाहायला हे आम्हाला कळेना. अखेर दोन रिक्षा करून आम्ही पोहोचलो. आम्हाला वाटलं गेल्याबरोबर आत जायला मिळणार. तर कसलं काय ! डीके आत जाण्यासाठी ओळख असणाऱ्या व्यक्तीचा नंबर शोधायला लागले. नंबर मिळेना, मग म्हणाले घरी बायकोला फोन करूया. म्हणे पण माझा फोन उचलणार नाही ती (केव्हढी खात्री स्वतःबद्दल )तर तुम्ही करा फोन. एव्हाना आम्हाला समजेनासं झालं होतं की आपण यांच्या शब्दावर विश्वास ठेऊन चूक तर नाही ना केलीय. आता आम्हालाही कंटाळा येऊ लागला होता. नंबर मिळवून ओळख असणाऱ्या व्यक्तीला फोन लावला तर ते कुठे कामात व्यस्त होते. डीके आजोबा स्टुडिओच्या आवारात जो दिसेल त्याच्याशी ओळख करून आम्हाला आत जायचंय म्हणून सांगत होते. आणि ती माणसंही ज्येष्ठ व्यक्तीला उगाच का दुखवा म्हणून,
“हो हो!” असं म्हणत सटकत होते. मध्येच ते भराभरा चालत एकटेच स्टुडिओत गेले, आणि लगेचच परतून लांबूनच,
“चला ! या या ! झालं काम म्हणत अंधारातून आम्हाला आत घेऊन गेले. आम्ही म्हटलं, चला गंगेत घोडं न्हायलं.
आत कार्यक्रमाची तयारी सुरु होती. तिथे बसल्यावरही यांची तोंडाची टकळी सतत सुरु होती. कोणाशीही ओळख काढून बोलत होते. यात स्पर्धक मुलांच्या आईवडिलांनाही त्यांनी सोडलं नाही. इतक्यात काही लोकं पास तपासायला आले. आमच्याकडे पास नव्हते. त्यावर ते म्हणाले की पासाशिवाय तुम्हाला बसता येणार नाही. आम्हालाही आता खुपच ओशाळल्यासारखं आणि कुठून यांच्यावर विश्वास ठेऊन आलो असं वाटायला लागलं. पण एव्हढी शोभा होऊनही डीके आजोबा म्हणू लागले,
काही होतं नाही. आपण बसुया. कोणी नाही उठवणार आपल्याला. आम्ही दोघं आणखी शोभा नको म्हणून सरळ बाहेर आलो. डीके आजोबा मात्र अजुन ठाम होते. म्हणायला लागले,
“बरं जायचंच घरी तर जेऊन जाऊया. आता इथे लंच होईलच. यावर काय बोलणार ? आम्ही काहीही न बोलता निघालो. रस्त्यातही स्टुडिओ आवाराबाहेर पडेपर्यंत ते दिसेल त्याला सांगत होते. कोण दाद देणार? बाहेर येऊन सरळ ऑटो करून घरी आलो. पुन्हा डीके आजोबांच्या फंदात म्हणून पडलो नाही.
माझ्या ऑफिसमध्ये काम करणारी, माझ्यापेक्षा वयाने पाच सहा वर्षांनी मोठी असलेली अस्मिता, जिने मला एके काळी खूप प्रेम, माया दिली. हे निरपेक्ष आणि सुंदर नातं माझ्या सख्ख्या बहिणीच्या लग्नानंतर आलेल्या एकटेपणामध्ये मला खूप खूप आधार देऊन गेलं.
कसं विसरणार या नात्यांना, या व्यक्तींना या जीवनाच्या वाटेवर भेटलेल्या साऱ्यांना???
प्रासादिक म्हणे,
प्रसाद कुळकर्णी.
Leave a Reply