१९५९ सालातील गोष्ट आहे.. महाराष्ट्रातील एक तरुण युवक मद्रासमध्ये प्रकाशित होणाऱ्या ‘चांदोबा’ मासिकासाठी भाषांतरापासून ते संपादनापर्यंत काम करीत होता.. महाराष्ट्र मंडळाच्या एका कार्यक्रमात त्याची सिनेदिग्दर्शक राजा परांजपे यांच्याशी ओळख झाली.. त्यानं राजा परांजपे यांचेकडे, चित्रीकरण पहाण्याची आपली सुप्त इच्छा व्यक्त केली.. मग दिवसा चित्रीकरण पहाणे व रात्री ‘चांदोबा’साठी काम करणे सुरू झाले..
मद्रासमधील चित्रीकरण पूर्ण होईपर्यंत दोघांचे सूर जुळले व राजा परांजपे यांचे सोबत तो तरुण पुण्याला आला व त्यांच्या ‘जगाच्या पाठीवर’ या चित्रपटातून सहायक दिग्दर्शक म्हणून त्याने चित्रपट सृष्टीतील ‘श्रीगणेशा’ केला… तो तरुण म्हणजेच आज एक्क्याण्णव वर्षांचे तरुण असणारे ज्येष्ठ दिग्दर्शक, ऋषितुल्य राजदत्तजी!!!
२१ जानेवारी १९३२ साली विदर्भातील, धामणगाव येथे राजदत्त यांचा जन्म झाला. वडील अंबादास हे रेल्वेमध्ये नोकरीला होते. आई, प्रभावती गृहिणी होती. नोकरीच्या बदल्यांमुळे राजदत्त यांच्या शिक्षणाची गावं बदलत राहिली.. वर्ध्याला असताना त्यांनी बी.काॅम.ची पदवी प्राप्त करुन पत्रकारितेची आवड असल्याने पुण्यातील ‘दै. भारत’ मध्ये नोकरी केली. काही महिन्यांतच ‘दै. भारत’ बंद पडल्यावर ‘चांदोबा’ मासिकासाठी ते मद्रासला गेले…
‘जगाच्या पाठीवर’ यशस्वी झाल्यानंतर त्यांनी ‘सुवासिनी’, ‘पाठलाग’ चित्रपटासाठी दिग्दर्शन सहाय्य केले. राजा परांजपे यांचे हाताखाली तयार झाल्यावर दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट ‘मधुचंद्र’ हा साकारला.. चित्रपट यशस्वी तर झालाच शिवाय त्यांच्यावर चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांनी ‘घरची राणी’ या चित्रपटाची जबाबदारी सोपवली..
त्यानंतर राजदत्त यांनी मागे वळून पाहिले नाही. ‘भोळी भाबडी’, ‘या सुखांनो या’, ‘वऱ्हाडी आणि वाजंत्री’ असे एकाहून एक सरस चित्रपट केले. ‘अपराध’ या चित्रपटाने राजदत्त यांना पहिला राज्य शासनाचा पुरस्कार मिळवून दिला.
त्यानंतर ‘देवकी नंदन गोपाला’, ‘भालू’, ‘अष्टविनायक’, ‘सर्जा’, ‘शापित’, ‘हेच माझे माहेर’, ‘राघू मैना’, ‘अरे संसार संसार’, ‘पुढचं पाऊल’, ‘सासू वरचढ जावई’, ‘मुंबईचा फौजदार’ असे उत्तम चित्रपट राजदत्त यांनी दिले..
एकूण कारकिर्दीत त्यांनी २८ चित्रपटांसाठी दिग्दर्शन केलं, राज्य शासनाचे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी १४ वेळा पुरस्कार स्विकारले. केंद्र सरकारकडून तीन वेळा ‘रजत कमल’ पुरस्कार मिळाला. फिल्मफेअरचा मानाचा पुरस्कार मिळाला.
१९५९ सालापासून राजदत्त यांनी सुरु केलेली ही वाटचाल, २०१२ पर्यंत अविरत चालू राहिली. या मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ व कलाकारांसोबत त्यांनी काम केले. आज त्या काळातील सुलोचना दीदींसारखी मोजकीच व्यक्तिमत्त्वं हयात आहेत. आता तो काळही गेला आणि ती दिग्गज माणसंही..
या रंगीबेरंगी चित्रपटाच्या दुनियेत.. खादीचा झब्बा, पांढरा पायजमा व खांद्यावर शबनम बॅग घेऊन अत्यंत साधेपणानं रहाणारा, मृदु आवाजात बोलणारा, कधीही कुणाशीही न भांडणारा, मिळालेल्या मानधनात समाधान मानणारा हा ऋषितुल्य माणूस, त्या सुवर्णकाळाचा एकमेव साक्षीदार आहे!!
कारण.. महाभारतातील कथेतील अर्धवट सोनेरी झालेल्या मुंगूसाप्रमाणेच मी त्या सुवर्ण काळातील एक मुंगूसच आहे… त्या वीस-पंचवीस वर्षाच्या काळात अनेक दिग्गज निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञांच्या संपर्कात मी राहिलो, त्यांचा अभूतपूर्व सहवास मला लाभला.. त्यामुळे माझे अर्धे अंग सोनेरी झालेले आहे.. मलाही त्या सुवर्णकाळातील दत्ताजींचा सहवास जवळून लाभला, हे माझं परमभाग्य आहे…
© – सुरेश नावडकर २१-१-२२
मोबाईल ९७३००३४२८४
या रचनेचे सर्वाधिकार रचयिता © सुरेश नावडकर यांच्याकडेच आहेत
Leave a Reply