विजय आणि यामिनी बाहेर फिरून रात्री उशिरा घरी येतात… घरातील बंद केलेले दिवे सुरु करतात आणि सोफ्यावर बसतात…
यामिनी : खूप दिवसांनी आपण असे रात्री बाहेर फिरायला गेलो नाही ?
विजय : हो ! ना ! काय करणार तुला वेळ असतो तेंव्हा मला वेळ नसतो आणि मला वेळ असतो तेंव्हा तुला वेळ नसतो..
यामिनी : यापुढे आपलयाला आपल्यासाठी असा वेळ काढावाच लागेल नाहीतर आपण आयुष्यात आनंद असतो हेच विसरून जाऊ…
मागच्या चार – पाच वर्षांपासून आपण फक्त आणि फक्त काम एके काम करतो आहोत ! तुला कामाचा कंटाळा येत नसेल कारण तू तुझ्या आवडीचे काम करतोस आणि मी पैशासाठी काम करते.
विजय : मी माझ्या आवडीचे काम करत असलो तरी तुमच्या कामाची वेळ ठरलेली असते, माझ्या कामाचे तसे नाही , मी तर स्वप्नातही माझ्या कामाचाच विचार करत असतो.
यामिनी : तुला काय गरज आहे हा इतका त्रास करून घ्यायची ? माझ्या पगारात आपले सर्व उत्तम चालू शकते
विजय : मी तू विकत घेतलेल्या घरात राहत असलो तरी मला बायकोच्या जीवावर मजा मारणारा नवरा व्हायचे नाही.
यामिनी : तू काहीही काय बोलतोस ? माझे घर ते तुझे घर नाही का ?
विजय : तसे नाही ! माझ्या लहानपणापासून माझ्या मालकीचे एक घर असावे अशी माझी खूप इच्छा होती ,का माहीत आहे ?
यामिनी : का ?
विजय : आता आपल्या घरातील एक कपाट पुस्तकांनी भरलेले आहे, भिंतीवर मला मिळालेले प्रमाणपत्र फ्रेम करून लावलेले आहेत, शोकेसमध्ये मला मिळालेल्या टॉफी आहेत… पण मला हे सर्व माझ्या मालकीच्या घरात हवे होते…
यामिनी : हे घर मी तुझ्या नावावर करू का ?
विजय : उगाच विनोद करू नकोस ! हे घर तुझ्या नावावर आहे पण तुझ्या मालकीचे व्हायला अजून वीस वर्षे लागतील…
यामिनी : विजय ! इतका पुढचा विचार नको करुस ? आता आपल्याला हात पाय पसरायला हक्काची जागा आहे ना ! बस्स…
विजय : बरं ! झोपूया आता ! तुलाही उद्या लवकर ऑफिसला जायचे आहे ना !
यामिनी आणि विजय फ्रेश व्हायला आत जातात… दोघेही फ्रेश होऊन बाहेर येतात… यामिनी विजयला ” गुड नाईट ” म्हणून बेडरूममध्ये झोपायला जाते विजय तेथेच हॉलमध्ये सोफा कम बेडचा सोफा करून लाईट बंद करतो आणि त्यावर झोपी जातो…
दुसऱ्या दिवशी सकाळी विजय आणि यामिनी सोफ्यावर बसून चहा पित असतात इतक्यात दारावरची बेल वाजते… विजय जागेवरून उठून दरवाज्या जवळ जातो तर दारात प्रतिभा उभी असते तिला आत घेत तो दरवाजा बंद करतो… तो प्रतिभाची ओळख यामिनीशी करून देत…
विजय : यामिनी ! ही प्रतिभा ! काल तुला म्हणालो होतो ना ! कामासाठी एक बाई मिळाली आहे , ती हीच प्रतिभा !
त्यावर प्रतिभाने यामिनीला हात जोडून नमस्कार केला
प्रतिभा : नमस्ते मॅडम !
यामिनी : नमस्ते ! आणखी कोठे कामे करतेस ?
प्रतिभा : आपल्या इमारतीतील चार घरातील धुणी – भांडी करते मी.. . माझ्या ओळखीची एक बाई म्हणाली कि तुम्हाला कामासाठी बाई पाहिजे म्हणून मी आले होते तर साहेब म्हणाले उद्या सकाळी ये !
यामिनी : हो ! साहेब म्हणाले मला, तुला घरातील सर्व कामे करायला लागतील मी तुला १०,००० रुपये पगार देईन ! इतर वेळेत तू दुसरी कामे केलीस तरी चालेल ! तसे आमच्या घरात आम्ही दोघेच राहतो आमच्या घरात तिसरा माणूस आला तरी तो राहायला येत नाही ! रविवारी तुला सुट्टी मिळेल ! सकाळची धुणीभांडी करायची, साहेबांसाठी दुपारचे जेवण करायचे, आणि संध्याकाळी येऊन रात्रीचे जेवण करायचे… बस… मी तुला घराची एक चावी देऊन ठेवेन ! साहेबांचा काही भरोसा नाही ते कधी घरी असतात कधी नसतात..
प्रतिभा : बरं ! मॅडम मी कधी पासून कामाला सुरुवात करू ?
यामिनी : आज पासूनच कर…
प्रतिभा : बरं ! म्हणून त्यांच्या समोरील चहाचे कप उचलून ते घेऊन स्वयंपाक घराच्या दिशने गेली.
यामिनी : विजय ! प्रतिभा मला आवडली…
विजय : ती कामसू ही आहे, बिचारी कळत्या वयापासून घरकाम करतेय !
आता लग्न झालं तरी घरकाम सुटलं नाही ! तस ते कोणत्याच बाईच्या वाट्याचं कधीच सुटत नाही ..
पण ! तू तिला रविवारी सुट्टी का दिलीस ?
यामिनी : तिला थोडा आराम नको का कामातून ? आणि आपलीही घरकाम करायची सवय मोडायला नको ! त्यात मला तुझ्या हातचा चहा – नाश्ता आणि खिचडी खायला आवडते.
विजय : मलाही ते तुला करून खायला द्यायला आवडते.
यामिनी : आपल्या या गप्पा अशाच सुरु राहतील आणि मला ऑफिसला जायला उशीर होईल ! चल मी तयारी करते आणि निघते !
विजय तेथेच सोफ्यावर पेपर वाचत बसला.. यामिनी तयार होऊन आली आणि विजयला बाय ! करून.. बाहेर पडत पडता
यामिनी : प्रतिभा ! चल मी निघते ! तुझी कामे आटपली की तू जा !
प्रतिभा : ( स्वयंपाक घरातूनच ) ठिक आहे मॅडम !
यामिनी निघून गेल्यावर प्रतिभा स्वयंपाक घरातून बाहेर येत..
प्रतिभा : साहेब दुपारी जेवायला काय करू ?
विजय : जास्त काही नको ! चार चपात्या आणि बटाट्याची भाजी कर बस..
प्रतिभा : ठिक आहे साहेब !
विजय : तू मला पूर्वीसारखी नावाने हाक मारली असती तरी मला चालले असते.. पण ! त्यामुळे यामिनीचा आणि लोकांचाही गैरसमज होईल …
प्रतिभा : कळतंय ! मला साहेब ! तशीही आता सर्वांनाच साहेब आणि मॅडम म्हणायची मला सवय झाली आहे…साहेब तुमच्यासाठी चहा आणू का ?
विजय : माझ्यासाठी तर घेऊन येच.. . पण तू ही घे… खाण्यापिण्यात काहीही संकोच करू नकोस… मी तुला म्हणालो ना ! या घराला तू आपलेच घर समज !
प्रतिभा : ठिक आहे ! मी चहा घेऊन येते , प्रतिभा स्वयंपाकघरात जाऊन विजयासाठी चहा घेऊन येते… आणि विजयला म्हणते .. . माझी सर्व कामे आटपली आहेत ती झाली की मी निघते… संध्याकाळी परत येते….रात्रीचा स्वयंपाक करायला…
विजय : ठिक आहे !
प्रतिभा आपली सर्व कामे आटपून निघून गेल्यावर विजय त्याचा लॅपटॉप हातात घेऊन तेथेच सोप्यावर बसून आपली कामे करायला सुरुवात करतो… मधे – मधे तो प्रतिभाने त्याच्यासाठी तयार करून ठेवलेला चहा गरम करून पित असतो … जेवणाची वेळ टळून गेल्यावर विजय.. दुपारी तीनच्या दरम्यान स्वयंपाक घरातून जेवणाचे ताट भरून आणून बाहेर सोफ्यावर बसूनच काम करता करता जेवतो… आणि जेवून झाल्यावर ताट पुन्हा स्वयंपाक घरात नेऊन ठेवतो. स्वयंपाक घरातून बाहेर आल्यावर तो पुन्हा संगणकात डोकं खुपसून बसतो… घड्याळाचा काटा पुढे सरकत असतो… संध्याकाळ होताच दारावरची बेल वाजते आणि विजय त्याच्या कामाच्या गुंगीतून बाहेर येतो…सोफ्यावरून उठत अंग झडत तो दरवाज्या जवळ जातो आणि दरवाजा उघडतो तर दरवाज्यात प्रतिभा उभी असते, तो तिला आत घेतो..
विजय : प्रतिभा ! तू आलीस ते बरं झालं ! पहिल्यांदा आपल्यासाठी छान फक्कड चहा बनव !
प्रतिभा : बरं साहेब ! तुम्ही जेवला ना ? भाजी बरी झाली होती ना ? मला माहीत आहे, तुम्हाला पदार्थांची चव उत्तम कळते !
विजय : भाजी छान झाली होती , मलाही माहीत आहे तू उत्तम सुगरण आहेस ते !
त्यावर काहीही न बोलता प्रतिभा स्वयंपाक घरात गेली आणि विजयासाठी चचा तयार करून घेऊन आली !
विजय : प्रतिभा ! तू घेतलास का चहा ?
प्रतिभा : घेईन नंतर ! कामे आटपल्यावर …
विजय : प्रतिभा तू तुझी कामे आटपली की तू लॉक करून तुझ्या घरी निघून जा ! मी बाहेर जाऊन जरा पाय मोकळे करू येतो तसाही ! माझ्या पोटाचा घेर आता वाढू लागला आहे तो थोडा कमी करावा लागेल…
विजय निघून गेल्यावर प्रतिभा तिची कामे आटपून हॉलची साफसफाई करून झाल्यावर स्वतःला जरा व्यवस्थित करून दरवाजा ओढून घेत निघून जाते…
— निलेश बामणे
Leave a Reply