जोडे म्हणजे आपल्या दोन पायांसाठी वापरलेल्या जाणाऱ्या लेदरच्या चपला.. पूर्वी खेडेगावात, गावातील चांभाराकडून चामड्याच्या मजबूत वहाणा तयार करुन घेतल्या जायच्या. चांगल्या जाड सोलाचे दोन थर असलेल्या त्या वहाणा उन्हा-पावसात, शेतात कामं केली तरीही कधी झिजायच्या नाहीत. त्या दिखाऊ नसायच्या, टिकाऊ मात्र नक्कीच असायच्या.
आदिमानव काळात मनुष्य अनवाणीच हिंडायचा. हळूहळू प्रगती होऊ लागली व तो पावलांच्या संरक्षणासाठी झाडाच्या सालींपासून तयार केलेली पायताणं वापरु लागला. कालांतराने माणसं चामड्याच्या जोड्यांचा वापर करु लागली. शिवाजी महाराजांच्या काळात मोजडींचा वापर होत होता. इंग्रज भारतात आल्यानंतर सरकारी नोकरदार, लेदरचे बुट वापरु लागले.
पन्नास वर्षांपूर्वी लहान मुलांसाठी कॅनव्हासचे रंगीत छोटे बुट मिळायचे. तसे मला लहानपणी वडिलांनी घेतले होते. नंतर प्लॅस्टिकच्या रंगीत सॅण्डल आल्या. माध्यमिक शाळेत जाऊ लागल्यावर स्वस्तिक कंपनीच्या सॅण्डल वापरु लागलो, ज्या पावसाळ्यातच नाही तर बाराही महिने वापरल्या जायच्या. कॉलेजला लेदरची चप्पलच असायची. कॉलेजच्या शेवटच्या वर्षी आम्हा सर्व मित्रांच्या ग्रुपने एकाचवेळी, कोल्हापुरी चपला खरेदी करुन वापरल्या होत्या.
त्याकाळी निळ्या रंगाच्या स्वस्तिक कंपनीच्या स्लीपर म्हणजेच सपाता, बहुसंख्येने वापरल्या जात असत. एकतर त्या स्वस्त असायच्या व बंध तुटला तर नवीन बंध बसवून पुन्हा वापरल्या जायच्या. चपलांचा दुकानात ते बंध, स्वस्तात मिळायचे. बंध तुटायचा, तो अंगठ्याच्या जवळचाच. त्यांचा जो गट्टू असायचा तो तुटला की, बंध बाहेर यायचा. अशावेळी तात्पुरती दुरुस्ती करण्यासाठी एखादी टाचणी किंवा सेफ्टिपिन उपयोगी पडायची. या स्लीपर जर पावसाळ्यात वापरल्या तर टाचांच्या बाजूने पॅन्टवर पाण्याचे शिंतोडे उडून पॅन्ट खराब होत असे.
चप्पल ही हमखास चोरीला जाणारी वस्तू आहे. मंदिराच्या बाहेर चपला काढून दर्शनासाठी आत गेल्यावरही, आपली चप्पल चोरीला तर जाणार नाही ना? ही शंका, मनात रेंगाळत राहते..आणि कित्येकदा घडतेही तसेच..माझी देवळाबाहेर काढलेली नवी कोरी चप्पल अशीच एकदा चोरीला गेली होती.. यावर उपाय म्हणून काहीजण आपली चप्पल जवळच्या पिशवीत ठेवून मग देवदर्शन घेतात, मात्र हे मनाला पटत नाही..
पूर्वी शालेय जीवनात मी सारसबागेतील गणपतीला रोजच जात असे. तेव्हा लोकांनी एका चप्पलचोराला रंगेहाथ पकडले व जाणाऱ्या येणाऱ्यांनी, कधी काळी आपली चप्पल देखील यानेच चोरली असावी, अशा समजुतीने त्याला चपलांनी बेदम मारले.
कालांतराने आता प्रत्येक देवळाच्या बाहेरील बाजूस चप्पल स्टॅण्ड ठेवलेला असतो, तिथे चपला ठेवून आपल्याला निर्धास्त देवदर्शन करता येते. काही ठिकाणी टोकन देऊन चपलांची अदलाबदल होणार नाही याची काळजी घेतली जाते.
आता लहान मुलांसाठी प्रत्येक पाऊल टाकल्यावर आवाज करणारे बुट मिळतात. त्याशिवाय काही बुट हे टाचेच्या खाली डिस्को लाईट लागणारे असतात. त्यामुळे मुलांना चालण्याची आवड निर्माण होते.
माणसाच्या पायातील पादत्राणे पाहून, त्याची पारख केली जाते. म्हणजेच साधी स्लीपर असेल तर सर्वसामान्य, बऱ्यापैकी चप्पल असेल तर मध्यमवर्गीय, चकाकणारे पाॅलीशचे बुट असतील तर श्रीमंत, स्पोर्टसचे बुट असतील तर खेळाडू, कोल्हापुरी चपला असतील तर बहुरंगी-रसिक व्यक्तिमत्त्व.. असा प्राथमिक अंदाज काढता येतो..
जोडे ही अशी गोष्ट आहे की, त्याद्वारे समोरच्या व्यक्तीबद्दलची कृतज्ञता व कृतघ्नपणा, दोन्हींचं मोजमाप होऊ शकतं.. म्हणजे एखाद्यानं समोरच्या व्यक्तीला मदत करुन, त्यांच्या आयुष्याचं कल्याण केलं असेल तर ती व्यक्ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘माझ्या कातडीचे जोडे करुन तुमच्या पायात घातले तरी हे उपकार फिटणार नाहीत’ असं बोलून दाखवते…आणि याउलट जर समोरच्या व्यक्तीने विश्वासघात केला असेल तर पायातील जोडे, मारण्यासाठी त्याच्यावर उगारले जातात..
वधुपित्याला मुलीचं लग्न जमविण्यासाठी स्थळं बघताना त्याचे जोडे झिजून जायचे.. एखादं नवपरिणीत जोडपं पुजेसाठी एकत्र बसलं की, पहाणारा त्या दोघांचं कौतुक ‘लक्ष्मीनारायणाचा जोडा’ म्हणून करायचा…
पूर्वी चपलेचा अंगठा तुटला की, चांभाराकडे जाऊन दुरुस्ती करुन घेतली जात असे. कधी बुटाचा सोल निघाला असेल तर तो नवीन लावून घेतला जात असे. त्यावेळी शहरातील पेठांमधून, चौकात एखादा तरी चांभार फुटपाथवर बसलेला दिसायचा. त्याच्याकडे गेल्यावर तो त्याच्याकडील एक चप्पल जोड घालायला देऊन आपल्या चप्पलची दुरुस्ती करायचा. कुठे दोऱ्याने शिवून किंवा खिळा मारुन काम पूर्ण झालं की, पॉलीशच्या ब्रशने चप्पल चमकवून द्यायचा. त्यासाठी मिळणाऱ्या पाच दहा रुपयांत त्याला समाधान असायचं.
अलीकडे ‘युज अॅण्ड थ्रो’चा जमाना आला आहे. तुळशीबागेत स्वस्तातल्या फॅशनेबल चपला दोन चार महिने जरी वापरता आल्या तरी पैसे वसूल झाले, अशी तरुण पिढीची मानसिकता आहे. त्यामुळेच आता दुकानदार चप्पल, बुटाची वॉरंटी देत नाही. जर दुरुस्ती करण्याची वेळ आली तर, पूर्वीसारखे चांभारही भेटत नाहीत.
एक काळ होता की, घेतलेल्या चपलांचा जोड वर्षानुवर्षे वापरला जायचा. आता एकाच व्यक्तीचे चार पाच जोड असतात. त्याकरिता दाराजवळ शू रॅक असतं. ब्रॅण्डेड बुटांच्या किंमती पाच दहा हजारांपर्यंत असतात. आता टाचा दुखू नयेत म्हणून खास बनविलेल्या चपला, बुट मिळतात. एकेकाळची उंच टाचेच्या लेडिज चप्पल, सॅण्डलची फॅशन आता इतिहासजमा होऊ लागलेली आहे.
काळ कितीही बदलला तरीही पायात ‘पायताण’ हे लागणारच. तोही एक पावलांच्या देखणेपणाचा ‘दागिना’च आहे..
© सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
३०-६-२१.
Leave a Reply