एक सुखी कुटुंब असते. ते कुटुंब सुखवस्तू असते. नवरा बायको आणि त्यांचा लहान मुलगा. त्यांच्या सुखी संसाराची दहा बारा वर्षे चांगली जातात.
एक दिवस सकाळी बायको नवऱ्याला नाश्ता देत असते. नवरा नाश्ता खाता खाता तिला शांतपणे म्हणतो “मला तुझ्याकडून घटस्फोट हवा आहे. आपले नाते आता शिळे झाले आहे. माझे माझ्या ऑफिसमधल्या एका मुलीवर प्रेम आहे. मी तिच्याशी लग्न करणार आहे.”
बायकोला धक्का बसतो. परंतु ती चेहऱ्यावर कुठलाच भाव दाखवत नाही. ती फक्त नवऱ्याला म्हणते “ठीक आहे.”
नवरा पुढे म्हणतो “मी तुला वाऱ्यावर सोडणार नाही. आपल्या एवढ्या वर्षांच्या नात्यानंतर मी माझी जबाबदारी पूर्ण करुन जाईन. हे घर, आपली गाडी आणि माझ्या कंपनीतले तीस टक्के शेअर्स मी तुझ्या नावाने केले आहेत. एवढे तुला पुरेसे आहे ना? ”
बायको आपले अश्रू आवरत त्याला म्हणते “मला यातले काहीच नको. माझ्या फक्त काही अटी आहेत. त्या तू पूर्ण कराव्यास एवढीच माझी इच्छा आहे. तिची पहिली अट असते की त्याने आजपासून तीस दिवस तिच्याजवळ रहावे. त्या दोघांचे नाते पहिल्यासारखे असल्याचे त्याने दाखवावे. या दरम्यान तिच्या मुलाची परीक्षा असते. मुलाच्या मनावर विपरित परिणाम होऊ नाही म्हणून तिने ही अट घातलेली असते.
तिची दुसरी अट अशी असते की त्यांच्या मुलाला यातले काही कळता कामा नये. तो असे समजत असतो की आपल्या आई वडीलांचे एकमेकांवर फार प्रेम आहे. त्याचा मनोभंग होऊ नये अशी तिची इच्छा असतें. तिची तिसरी अट जरा विचित्र असते. ती म्हणते “जसे लग्नानंतर तू मला उचलले होतेस तसेच रोज सकाळी तू मला आपल्या बेडरुममधून बाहेरच्या खोलीत उचलून आणायचेस.”
नवऱ्याला ही अट विचित्र वाटते तरी तो होकार देतो. रोज सकाळी आपल्या बायकोला उचलून तो बाहेर आणून बसवतो. बायकोशी प्रेमाने वागतो. मुलाला त्यांच्यातल्या कराराबद्दल काही कळू देत नाही. मुलगा रोज हे पहातो की त्याचे आई वडील किती आनंदात आहेत. रोज तो आनंदाने टाळ्या पिटतो.
पहिले दोन तीन दिवस नवऱ्याला हे जड जाते. परंतु चौथ्या दिवशी त्याला तिच्या शरीराचा परिचित गंध जाणवतो. त्याला तो आपलासा वाटतो. पुढच्या दिवसांमध्ये त्याला आपल्या बायकोचे पुन्हा आकर्षण वाटू लागते. हळू हळू त्याला असे वाटू लागते की आपण आपल्या नात्याचा पुनर्विचार करायला हवा. या तीस दिवसात बायकोचे वजन कमी कमी होत असल्याचे त्याला जाणवते. तिचे अंगही गरम लागत असते. तरी तो त्याकडे गांभिर्याने लक्ष देत नाही.
कराराचे तीस दिवस जसे संपतात तसे नवरा ठरवतो की आज आपण आपल्या मैत्रिणीला सांगायचे की मी घटस्फोटाचा निर्णय रद्द केला आहे. तिच्याशी लग्न करायला नकार द्यायचा असे ठरवून तो मैत्रिणीकडे जातो.
ठरल्याप्रमाणे तो आपल्या मैत्रिणीकडे जाऊन तिला सांगतो की “मला तुझ्याबरोबर लग्न करता येणार नाही. लग्नाच्यावेळी मी शपथ घेतली होती की मृत्यू जोपर्यंत आम्हा दोघांना विलग करणार नाही तोपर्यंत आम्ही एकमेकांना साथ देऊ.” मैत्रिणीला त्याच्या वागण्याचे आश्चर्य वाटते.
मैत्रिणीकडून घरी परत येताना तो आपल्या बायकोसाठी खूप सारी फुले व भेटवस्तू घेतो. आनंदाच्या भरात घरात येतो आणि तिला हाक मारतो. ती तिच्या पलंगावर मृत होऊन पडलेली असते. तिला कॅन्सरचे दुखणे असते हे त्याला त्यावेळी समजते. त्या अगोदर त्याला तिच्या आजाराचा पत्ताही नसतो. त्यांच्या मुलाला मात्र असेच वाटते की केवळ मृत्यूमुळे त्याचे प्रेमळ आई वडील एकमेकांपासून दुरावले आहेत.
लग्नानंतर काही वर्षांनी पती पत्नींचे नाते शिळे होते खरे परंतु त्यातही सौंदर्य शोधायचे आपल्या हातात असते. नात्यात काय उरले नाही याचा विचार करण्यापेक्षा आपल्याला काय मिळाले आहे याचा विचार केल्यास आयुष्य सुखी आणि सुसहय होते. दुसरा जोडीदार शोधला तरी काही वर्षांनी ते ही नाते शिळे होणारच आहे. मग पहिल्याच नात्याला जोपासायला काय हरकत आहे? अखेर आयुष्य म्हणजे तडजोडच असते ना? मिळालेले आयुष्य आणि जोडीदार आनंदाने स्विकारावे हेच खरे सुखी जीवनाचे इंगित आहे.
— नीला सत्यनारायण
अनघा प्रकाशनच्या मैत्र या लेखसंग्रहातील हा लेख. हे पुस्तक मार्च २०१७ मध्ये प्रकाशित झाले.
Leave a Reply